तुम्ही कधी बसमध्ये जागा पकडलीय का? गर्दीतला प्रत्येक जण दस्ती (हातरुमाल) आणि पिशवी टाकून जागा पकडण्याच्या प्रयत्नात असतो. काहींचे रुमाल जागेवर पडतात. काहींचे मिसमॅच होतात. काही खाली पडतात. मग एकएक करून गर्दी बसमध्ये चढते. त्यात काहींना रुमालामुळे जागा मिळते, तर काही बलदंड, टगे लोक रुमाल नसतानाही जागा बळकावतात. असंच काहीसं अजित पवारांच्या अकाली जाण्यानंतर त्यांची स्पेस स्वतःकडे घेण्यासाठी होताना दिसतंय. महायुतीतच कुरघोडी सुरू आहे. अजित पवारांच्या जाण्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला पॉलिटिकल स्पेस खुणावतेय. तर, एकेकाळी दादांना चक्की पिसिंग करायला पाठवायला निघालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षालाही अजितदादांची स्पेस हवी आहे, अजितदादा हवे आहेत; पण अर्थातच ते जसे होते, तसे नाही, तर काही निवडक भागच त्यांना हवाय.
सत्ताधारी महायुतीमध्ये अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. कुरघोडी केली जातेय. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप हे एकीकडे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा संपूर्ण गट कामाला लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या घडामोडींपेक्षाही आजघडीला अजितदादांचा वारसदार होण्यासाठी महायुतीतलं राजकारण खूप इंटरेस्टिंग बनलं आहे. २०२९मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल, ते कोणत्या टोकाला जाईल, याचा अंदाज आपल्याला या घडामोडींमध्ये येतो.
शरद पवारांचा वारसदार कोण?
अजितदादांचा वारसदार होण्यासाठी तीन पातळ्यांवर घडामोडी सुरू आहेत. पहिल्या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारसदार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा फॅमिली बिझनेस आहे आणि अजित पवार
हे या बिझनेसचे फॅमिली मॅन होते. त्यामुळे वारसदार निवडीची ही सगळी प्रक्रिया कुटुंबातच सुरू आहे. गेल्या आठवडाभरातल्या घडामोडी बघितल्या, तर कुटुंबाबाहेरही खूप काही होताना दिसतंय, पण सारं काही कुटुंबातच सुरू आहे, असं या सगळ्या प्रोसेसचं वर्णन करू शकतो. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा आता काहीशी थांबलीय. पण दादांच्या वारसदार निवडीची प्रक्रिया अत्यंत वेगानं सुरू आहे. पवार कुटुंबाचे मूळ पुरुष म्हणून नावारूपाला आलेल्या शरद पवारांनीच अक्षरशः रोज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांच्या गाठीभेटी घेऊन या सगळ्या प्रोसेसला गती दिलीय.
नातू पार्थ आणि आजोबा शरद पवार यांच्यामध्ये प्रचंड बेबनाव आहे, दोघं एकमेकांना पाण्यात बघतात, अशा चर्चा गेली ६-७ वर्ष सातत्याने एका गोटातून सुरू होत्या. तसे दाखलेही दिसत होते. त्याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आजोबा आणि नातू यांच्यातला जिव्हाळा अधोरेखित करणारे व्हिज्युअल्स समोर आले. त्यात शरद पवार हे आपल्या नातवाला ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ पद्धतीने काहीतरी अनुभव शेअर करताना, सल्ला देताना दिसतात. हा सगळा प्रकार अजित पवारांचा वारसदार निवडण्यासोबत शरद पवारांच्या वारसदार निवडीचाही आहे. कारण अजित दादांच्या अकाली जाण्याने शरद पवारांचा राजकीय वारसा कोण सांभाळणार, हाही प्रश्न निर्माण झालाय. दादांच्या सहयोग या निवासस्थानी आणि शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी सुरू असलेल्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस या फॅमिली बिझनेसचा दीर्घकालीन वारसदार निवडीच्या हिशोबाने घडामोडी सुरू आहेत. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीने सत्तेचं सूत्र कुटुंबात आलं. त्यामुळे आता कुटुंबाचा, पक्षाचा वारसदार निवडण्याची कोणतीही घाई नाही. ही प्रोसेस खूप काळ चालेल, असं दिसतंय. सध्या विलीनीकरणाचा विषयही थंडबस्त्यात जमा झालाय. कुटुंबाबाहेर पण पक्षातलं वातावरणही आता बर्यापैकी स्थिर झालंय. सुनेत्रा पवार यांनीच पक्षाची सूत्रं ताब्यात घ्यावीत, यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेतेमंडळींचं एकमत बघायला मिळालं. वर वर पाहता विलीनीकरणाच्या विरोधातली भूमिकाही काहीशी बोथट झालीय. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे की कायमची शांतता, याचं उत्तर काळच देईल.
दुसर्या आणि तिसर्या पातळीवर मात्र अजितदादांचा वारसदार ठरवण्यापेक्षा, वारसदार बनण्यासाठी खूप सार्या घडामोडी सुरू आहेत. इथे अजितदादांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेल्या निर्वात पोकळीत स्वतःला फिट करण्याची धडपड सुरू आहे.
शिंदेंची आक्रमक खेळी
दुसर्या पातळीवरच्या हालचाली या सर्वात जास्त आक्रमक आणि काहीशा उघड स्वरूपाच्या आहेत. त्या घडतायत एकनाथ शिंदे यांच्या गोटात. अजितदादा हे महायुतीमधले केवळ एका घटक पक्षाचे नेते नव्हते, तर ते ‘मराठा चेहरा’ आणि ‘ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज’ म्हणूनही ओळखले जायचे. त्यांची हीच जागा भरून काढण्यासाठी शिंदेंनी कंबर कसलीय. यासाठी शिंदे गटाची दुहेरी रणनीती अमलात आणलीय.

२८ जानेवारीला दादांचं अकाली निधन झालं. २९ तारखेला अंत्यविधी पार पडले आणि एका दिवसाच्या गॅपनंतर ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी दादांच्या जागेवर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरूनच सुनेत्रा पवारांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. हिंदू रीतीरिवाजाच्या विरोधात जाणार हा प्रकार असल्याचे दाखले देण्यात आले. मराठा समाजातल्या बाईने नवर्याच्या चितेवरची राख शांत होण्याआधीच, असं शपथ घेणं योग्य आहे का, असे नैतिकतेचे प्रश्न विचारण्यात आले. आणि हे प्रश्न विचारण्यात, नैतिक पेच निर्माण करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही तर महायुतीतला घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाचे मंत्री, नेतेच आघाडीवर होते.
शिंदे गटाच्या या नेत्यांनी प्रामुख्याने शपथविधीच्या ‘टायमिंग’वर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘अजितदादांच्या चितेची आग अजून शांत झाली नाही, विझली नाही. असं असताना वहिनींना (सुनेत्रा पवार) मंत्रालयात आणून शपथ घ्यायला लावता? हा प्रकार निंदाजनक आणि क्लेशदायक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंनी हे गलिच्छ राजकारण केलंय.’ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी तर ‘माणुसकी हरली आणि खुर्ची जिंकली’ अशा शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली. त्यांच्या मते, ‘राजकारणात माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व दिलं जातंय आणि सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही.’ आणखी एक मंत्री उदय सामंत यांनी तर ‘सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचं समाधान आहे. पण शपथविधी एवढ्या घाईघाईत का झाला? हा शपथविधी लवकर कोणी करायला सांगितला?’ अशा शंका उपस्थित केल्या.
वरकरणी पाहता शिंदे गट सुनेत्रा पवार यांच्या घाईघाईने झालेल्या शपथविधीवरून ‘संस्कृती’ आणि ‘नैतिकते’चे धडे देत असला, तरी पडद्यामागे सुरू असलेला खेळ हा २०२९च्या विधानसभेची तयारी आणि ग्रामीण महाराष्ट्रावरील वर्चस्वाचा आहे. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल नैतिक प्रश्न उपस्थित करणार्या एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील आपल्याच ज्येष्ठ सहकार्याच्या निधनानंतर मात्र लगेच धुमधडाक्यात झंझावाती प्रचार केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत अवघ्या पाच दिवसांत १२ जिल्हे पिंजून काढत तब्बल २२ जाहीर सभा घेतल्या. ज्या आठवड्यात अजित पवार यांच्या पार्थिवावरील निखारे अजून धुमसत होते, त्याच आठवड्यात शिंदे मात्र ग्रामीण महाराष्ट्राच्या आखाड्यात स्वतःच्या पक्षाचा ‘पाया’ भक्कम करण्यासाठी रात्रीचा दिवस करत होते, हेही लक्षात घ्यायला पाहिजे.
अजितदादांच्या निधनानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे शिंदे गटाची वाढलेली अस्वस्थता आणि त्यातून जन्मलेली आक्रमक रणनीती. शिंदे यांच्या पक्षाची ताकद प्रामुख्याने ठाणे, मुंबई आणि मुंबई महानगर परिक्षेत्रात आहे. त्यांच्याकडे ५७ आमदारांचं बळ असलं तरी ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसपट्ट्यात आणि सहकार क्षेत्रात शिंदेंचा पक्ष अजूनही बाल्यावस्थेत आहे. नेमकी हीच तूट भरून काढण्यासाठी शिंदेंकडून अजितदादांच्या पोकळीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिंदेंना २०२९च्या विधानसभेला भाजपसमोर ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवायची असेल, तर त्यांना मुंबईबाहेर पडून ग्रामीण महाराष्ट्राचा नेता बनावं लागेल आणि त्यासाठी अजितदादांची ‘स्पेस’ काबीज करणं, हे त्यांचं प्रमुख लक्ष्य आहे, ही बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली.
त्याचवेळी भाजपकडे आता महायुतीत शिंदे वगळता चेहरा असलेला दुसरा मराठा नेता नाही. दादांच्या निधनाने सत्तेत आपलं प्रतिनिधित्व करणार्या मराठा चेहर्याच्या शोधात समाज आहे. मराठा समाजाला पर्याय हवा आहे. या दौर्याच्या निमित्ताने शिंदेंकडून मराठा नेता म्हणून नावारूपाला येण्याची महत्त्वाकांक्षाही जगजाहीर झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर यासारख्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये जाऊन त्यांनी ‘मीच तुमचा तारणहार’ असल्याचा संदेश दिला.
शिंदे गटाने आणखी एक खेळी केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल अजित पवारांनी मला काहीच सांगितलं नाही, असं फडणवीसांनी पत्रकारांना सांगितलं. तर नेमकी याच्या उलट भूमिका ही शिंदेंचे निकटवर्तीय मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कुजबुज गेल्या काही दिवसांपासून कानावर होती, असं सांगत सरनाईकांनी भाजपची, फडणवीसांची कोंडी केली.
फडणवीसांना हवे असणारे दादा
तिसर्या पातळीवर मात्र सर्व गोष्टी पडद्यामागे सुरू आहेत. वरकरणी शांत वाटणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या निधनानंतर अत्यंत सावध आणि दूरगामी परिणाम करणारी पावलं उचलली आहेत. अजितदादांचा वारसदार होणं म्हणजे त्यांच्या खुर्चीवर बसणं हा एक भाग झाला. पण अजितदादांची ताकद ताब्यात घ्यायची असेल, तर त्यांच्या ‘राजकीय सत्ते’वर कंट्रोल मिळवला पाहिजे, हे फडणवीसांना पक्कं ठाऊक आहे. दादांच्या निधनानंतर फडणवीसांच्या रणनीतीचे दोन भाग समोर आले.

फडणवीस सातत्याने राष्ट्रवादींचं विलीनीकरण ही दोन्ही पक्षांची अंतर्गत बाब आहे, अशी भूमिका मांडत आलेत. पण शरद पवार गटाची बाजू ही अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासाठी अडचणीची ठरत असल्याचं दिसताच फडणवीसांची प्रतिक्रिया आली. या विषयावर कोणतीही चर्चा झाली असती तर अजित पवारांनी आपल्याला त्या घडामोडींची कल्पना दिली असती, असं फडणवीस म्हणाले. यावर शरद पवारांनी दिलेलं उत्तर खूप बोलकं आहे. ते म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही या चर्चेचा भागच नव्हता, तेव्हा तुम्हाला विलीनीकरणाबद्दल कसं काय माहीत असेल?’ एक प्रकारे फडणवीसांनी विलीनीकरण हा निव्वळ दोन पक्षांतला विषय नाही, तर त्यामध्ये आपलंही म्हणणं विचारात घ्यावं लागेल, असं सूचित करण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे महाराष्ट्र भाजपने दादांच्या निधनानंतर सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. विकासकामाची दृष्टी असलेला कामाचा माणूस ही त्यांची प्रतिमा आणखी उजळ झाली. या जाहिरातीच्या निमित्ताने ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करणार्या, चक्की पिसिंग म्हणणार्या फडणवीसांसाठी भाजपने दादांच्या याच चांगुलपणाच्या प्रतिमेवर क्लेम केला. ‘प्रशासनावरील पकड’ आणि ‘गतिमान निर्णय’ यासाठी अजितदादांवर प्रेम करणारा वर्ग फडणवीसांकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत फडणवीसांनी दुखवटा म्हणून प्रचार टाळला. शिंदे ग्रामीण महाराष्ट्रात पाळंमुळं पक्कं करण्यासाठी धावपळ करत असताना फडणवीस मात्र शांतपणे दादांना मानणार्या वर्गामध्ये स्वतःची प्रतिमा उजळ करण्याचं काम करत होते. विकासकामं करणारे दादा फडणवीसांना आवडतात. पण त्यांच्यावरील आरोपांचा भाग मात्र त्यांना नकोय. केकवरचं क्रीम हवंय. पण बेस नको, अशी ही सिलेक्टिव्ह भूमिका आहे.
मग अजित पवारांचा वारसदार कोण? वारसदार होण्यासाठी शिंदे-फडणवीस दोघांनीही रुमाल टाकलाय. २०२९च्या विधानसभेला महाराष्ट्र सामोरा जाईल, तेव्हा अजितदादांच्या फोटोंचा वापर तिन्ही गट करतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भावनेसाठी, शिंदे ग्रामीण-मराठा अस्मितेसाठी आणि भाजप ते विकासासाठी करेल. पण शरद पवारांचा वारसदार कोण असेल, तो कसं काम करेल यावरच अजित पवारांचा वारसा शिंदे किंवा फडणवीसांना हायजॅक करता येईल की नाही, बसमध्ये जागा मिळेल की नाही? याचं भवितव्य अवलंबून आहे.
