• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तेल, तूप आणि इभ्रत!

मर्मभेद

marmik by marmik
March 21, 2026
in भाष्य, मर्मभेद, विशेष लेख
0
तेल, तूप आणि इभ्रत!

साधारण महिनाभरापूर्वी जगातल्या काही देशांची आणि त्यांच्या नेत्यांची परिस्थिती काय होती, ते पाहा.

एक डोनाल्ड ट्रम्प. माथेफिरू, उथळ वृत्तीचे अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचे प्रमुख. ते अमेरिकेशी व्यापारी संबंध असलेल्या सर्व देशांना टॅरिफच्या तालावर नाचवत होते. खासकरून भारताला. कारण इथे त्यांचे ‘अरेतुरे’तले जिव्हाळ्याचे मित्र सत्तास्थानावर आहेत आणि त्यांच्या नाड्या यांच्या हातात आहेत.

दुसरे होते नेतान्याहू. हिटलरनंतरचा जगातला सर्वात मोठा क्रूरकर्मा ही कुप्रसिद्धी एका ज्यू नेत्याने मिळवावी, याइतके लांच्छनास्पद काहीही नाही. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या तिथल्या ज्यूधर्मीयांच्या हातात असतात. त्यामुळे, अमेरिकेच्या वतीने तेलसमृद्ध आखाती प्रदेशांवर भाईगिरी करायला सोडलेला हा पिट्याभाई आहे की हा चिमुकला देशच ताकदवान अमेरिकेला ‘चालवतो’ हे अजून कळत नाही. पण, इस्रायल बोले आणि अमेरिका हाले, असं चित्र स्पष्ट दिसतं. ट्रम्प यांचा जावईच ज्यू असल्याने ते सत्तेत आल्यानंतर नेतान्याहू बलदंड आणि बेबंद होत गेले, त्यांनी आधी पॅलेस्टाइनची राखरांगोळी करण्याचा उद्देश जवळपास तडीला नेला आणि आता इराणची आगळीक काढली.

तिसरे होते इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खामेनेई. ते नेमकं काय करत होते, ते तेव्हा जगाला माहिती नव्हतं. त्याच्याआधी ते इराणचे शक्तिशाली नेते होते. मात्र, त्यांच्याविरोधात अचानक देशात असंतोष उसळला होता आणि त्याचा फायदा घेऊन अमेरिका त्यांना पायउतार करून आपल्या सोयीचं बाहुलं त्यांच्या जागी बसवणार, याची जगाला खात्री होती. तशी नेपथ्यरचना झाली होती.
आणि आता आपले नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ते इथे स्वत:ला काय म्हणवून घेतात आणि त्यांचे चेले त्यांना काय म्हणतात, याला जगाच्या मंचावर किंमत नाही. तिथे ते काय कृती करतात याला किंमत असते. आताच्या युद्धस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की जगातला संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे, हे अमेरिकाही जाणून आहे. हे मोदींचं कौतुक आहे की त्यांच्या पायात पाय घालण्याचा प्रकार आहे, ते तेच जाणोत! पण, ट्रम्प यांना मराठी येत असतं, तर एव्हाना भारतावर त्यांनी आताच कमी केलेलं टॅरिफ पुन्हा वाढवलं असतं… यांच्या आपापसातल्या स्तुतिपाठांची किंमत देशाला चुकवायला लागली असती… जशी इतर बर्‍याच गोष्टींची चुकवतो आहे तशी! तर मोदी हे युद्ध सुरू होण्याच्या आधी एपस्टीन फाइल्सने गांजलेले, संसदेत यायला घाबरणारे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निस्तेज होत चाललेले नेते होते… त्यांचं तथाकथित तेजही अन्य राष्ट्रप्रमुखांच्या सहिष्णुतेतून आणि भारताच्या, मोदीपूर्व नेत्यांनी घडवलेल्या, प्रतिमेतून परावर्तित झालेलं होतं, हेही आता उघड होत चाललं होतं.

या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर हल्ला चढवला आणि त्या देशाचे प्रमुख आयातुल्ला खामेनेई यांना टिपलं. आपण मुख्य नेताच मारल्यानंतर आधीच असंतोषाने खळबळलेल्या इराणमध्ये गोंधळ उडेल आणि आपल्या राक्षसी लष्करी ताकदीपुढे दोन दिवसांत इराण शरण येईल, अशी या दोन आक्रमणकर्त्या देशांची समजूत होती. पुढच्या खेळाचं स्क्रिप्ट तर सगळ्या जगाला पाठ आहेच… पण, कहानी में ट्विस्ट आला. खामेनेई यांचा मृत्यू हे एक प्रकारचं हौतात्म्य ठरलं. ८६ वर्षांच्या या नेत्याने सुरक्षित बंकरचा आसरा घेणं टाळलं आणि शहादत स्वीकारली. आपल्या मृत्यूला हजारो वर्षांच्या परंपरेत नेऊन बसवणारं धार्मिक स्वरूप मिळवून दिलं. शिवाय, त्यांनी जवळपास २० वर्षे या युद्धाची तयारी केली होती. आपण इराणवर हल्ला केला असं नेतान्याहू आणि ट्रम्प यांना वाटलं होतं. प्रत्यक्षात ते इराणच्या सापळ्यात चालत गेले होते. इराणने चीन आणि रशियाच्या मदतीने आधीच युद्धाची संपूर्ण तयारी केलेली होती. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविरोधातला उद्रेक शमला आणि इराणी जनता एकदिलाने नव्या नेत्यांच्या मागे उभी राहिली. आपण आणखी १० वर्षे हे युद्ध लढू असं इराण सांगतो आहे. अशा कडव्या प्रतिकाराची अपेक्षा अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी केली नव्हती. इराणने होर्मुझची खाडी हे व्यापारी जगाचं नाक अशा प्रकारे दाबलेलं आहे की आता अनेक देशांची तोंडं अमेरिकेच्या युद्धखोरीच्या विरोधात उघडतील, खुद्द अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता रसातळाला पोहोचली आहे आणि आपण या युद्धात का पडलो आहोत, असा प्रश्न जनता विचारू लागली आहे.

आता युद्धाच्या या टप्प्यावर या नेत्यांची स्थिती काय आहे?

चार दिवसांत युद्ध निपटण्याच्या वल्गना करणारे डोनाल्ड ट्रम्प तोंडावर आपटले आहेत. त्यांच्याकडे आता इराणशी समझौता करण्यापलीकडे काही पर्याय राहणार नाही. त्यातही ते बडबोलेपणा करतीलच, पण त्यांची हवा निघालेली आहे.

नेतान्याहू कुठे आहेत, जिवंत आहेत का, याबद्दल संशयाचं वातावरण आहे. नेतान्याहू जिवंत असल्याचं ;सिद्ध’ करण्यासाठी जे व्हिडिओ प्रसृत होत आहेत, ते एआयनिर्मित असण्याची शक्यता दिसते आहे. इस्रायलचं, खासकरून राजधानी तेल अविवचं प्रचंड नुकसान झालं आहे. ते दिसू नये म्हणून इस्रायलने स्वत:चं सीसीटीव्ही नेटवर्क उद्ध्वस्त करून टाकलं आहे.

आणि आता भारताची स्थिती.
ती केविलवाणी आहे.

आपल्याला आपल्या पैशाने रशियाचं तेल घेण्यासाठी अमेरिकेची परवानगी लागते. रशियाही आता साठेबाज शेठजीप्रमाणे वाढीव दराने तेल देतो आहे. इस्रायलच्या नादी लागून आपण इराणचा विश्वास गमावलेला आहे. होर्मुझच्या खाडीतून भारतीय तेलवाहू जहाजांना परवानगी आहे का, याबद्दल अजूनही निश्चित स्पष्टता नाही. ना आपण इराणच्या नेत्याच्या हत्येचा निषेध केला, ना आपण निमंत्रित केलेली त्यांची युद्धनौका बुडवणार्‍या अमेरिकेला खडे बोल सुनावले. आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये पाठिंबा देणारा इराण भारताच्या विश्वासघातामुळे कमालीचा दुखावला गेला आहे. आपण इस्रायल आणि अमेरिकेचे साथीदार आहोत, अशीच इराणी नेत्यांची समजूत झालेली आहे, हे त्यांच्या कठोर वर्तनातून दिसतंय.

कुणाच्याही गळ्यात पडून, मिठ्या मारून ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ हसणं, कुणालाही माय फ्रेंड म्हणून एकेरीत संबोधणं, त्या त्या ठिकाणची वाद्यं वाजवणं आणि निरर्थक पदकं गळ्यात घालून मिरवणं याला आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणत नाहीत, हा धडा आपण शिकलो असू, अशी शक्यता कमीच दिसते.

तेल, तूप आणि बाणेदार अलिप्त राष्ट्राची इभ्रत आपण गमावलीच आहे… आता गाढव आणि ब्रह्मचर्य यांचा दृष्टांत लवकरच वेगळ्या संदर्भात वापरण्याची वेळ न येवो म्हणजे मिळवली!

Previous Post

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.