
हाती होन दावी बेना। करिती लेकीच्या धारणा।।१।।
ऐसे धर्म जाले कळी। पुण्य रंक पाप बळी।।२।।
सांडिले आचार। द्विज चाहाड जाले चोर।।३।।
टिळे लपविती पातडी। लेती विजारा कातडी।।४।।
बैसोनिया तक्ता। अन्नेविण पिडीती लोका।।५।।
मुदबख लिहिणे। तेलतुपावरी जिणे।।६।।
नीचाचे चाकर। चुकलिया खाती मार।।७।।
राजा प्रजा पिडी। क्षेत्री दुश्चितासी तोडा।।८।।
वैश्यशूद्रादिक। हे तो सहज नीच लोक।।९।।
अवघे बाह्य रंग। आत हिरवे वरी सोंग।।१०।।
तुका म्हणे देवा। काय निद्रा केली धावा।।११।।
वारकरी संप्रदायातील संत हे समाजशिक्षक होते. त्यांनी लोकांना भक्ती शिकवली. त्याचबरोबर त्यांनी समकाळाची कठोर चिकित्साही केली. संसाराच्या आहारी गेलेल्या सांसारिकांबरोबरच परमार्थाच्या नावाने ढोंगबाजी करणारे योगी, जपी, तपी, पुरोहित, पुराणिक, वेदपाठक, कीर्तनकार, शाक्तपंथीय आणि अशाच पोटार्थी बुवाबाजीची अत्यंत जहाल चिकित्सा संतांनी केली आणि उच्चवर्णीय सत्ताधीशांचे वास्तवही परखडपणे मांडले. त्यात तुकोबाराय आघाडीवर होते. त्या काळात महाराष्ट्रात इस्लामी सत्ता होती. दक्षिणेत बहामनी राजवट होती, तर उत्तरेत मुघल होते. बहामनी राजवटीतून आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही अशा नव्या पातशाह्या निर्माण झाल्या होत्या. तुकोबारायांच्या काळात त्यांच्यात आपापसात लढाया होत होत्या. अधूनमधून उत्तरेकडच्या मोगलांच्या स्वार्याही होत होत्या. यातून महाराष्ट्र भरडून निघत होता. त्यातच तुकोबारायांच्या काळात दुष्काळही पडला. अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात अडकलेला शेतकरी शिपाईगिरीकडे वळत होता. तो सैन्यात शौर्य गाजवून काही प्रमाणात सरदारकी वगैरे मिळवत होता. त्याच काळात ब्राह्मण वगैरे उच्चजातीय लोक इस्लामी सत्तेच्या प्रशासनात नोकरी करायला लागले. इथून पुढे यवनांचीच सत्ता राहणार असं धर्मशास्त्राच्या आधारे सांगायला लागले. स्वाभिमानाची भावना पार लोपून गेली. लाचारीचा कळस गाठला गेला. एका बाजूने इथल्या शूद्रातिशूद्रांना आणि स्त्रियांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देणारे हे लोक दुसरीकडे निर्लज्जपणे अन्यायी राजवटीत नोकरी करत होते. ‘सांडुनिया राम राम। ब्राह्मण करती दोम दोम। ‘ अशी उच्चवर्णीय समाजधुरीणांची स्थिती झाली.
स्वयंघोषित क्षत्रिय या राजवटीत सरदारकीच्या तुकड्यांसाठी झगडत होते. या कथित क्षत्रियांच्या पराक्रम वतनदारी मजबूत करण्यासाठी आपापसात झगडण्यात वाया चालला होता. मात्र, एका बाजूला उच्चवर्णीय लोक जरी परकीयांच्या सेवेत गुंतून लाचारीचे जीवन जगत होते तरी शूद्रातिशूद्रांनी मात्र स्वाभिमानाचा रस्ता निवडला होता. कारण या शूद्रातिशूद्रांची आत्मिक उन्नती साधण्यासाठी जवळपास ४०० वर्षे वारकरी संप्रदाय कार्यरत होता. त्यामुळेच तुकोबारायांनी या राजवटीतील कथित उच्चवर्णीयांच्या लाचार आणि स्वाभिमानशून्य जगण्याचं वास्तव प्रस्तुत अभंगात मांडलेलं आहे. तुकोबाराय सांगतात की लोक इतक्या अधम पातळीला पोचले आहेत की ते हाताने होनाची किंमत दाखवत पोटच्या मुली विकण्यासाठी त्यांचा भाव ठरवतात. कलियुगात खरा धर्म गायब झाला. त्यामुळे पुण्य गरीब झाले आणि पाप वरचढ झाले. द्विजांनी म्हणजे उच्चवर्णीयांनी आचारधर्म सोडून दिला. ते चहाडी आणि चोरी करून जगायला लागले. चहाडी करुन जगण्याचा संदर्भ त्या काळातील उच्चवर्णीय लोक परकीय सत्ताधीशांसाठी हेरगिरी करत असत त्या अनुषंगाने वापरला असावा. प्रशासनातल्या लोकांबद्दल तुकोबाराय सांगतात की ते तख्तावर बसतात आणि लोकांची अन्नान दशा करून पिडतात. गावोगावचे कुलकर्णी-पाटील शेतकर्यांंकडून महसुलाच्या नावाखाली भरमसाठ शेतसारा अन्नधान्याच्या रूपाने आकारत असत. त्याच आधारे तुकोबाराय सांगतात की हे लोक तख्तावर बसून लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेतात. राजे रजवाड्यांच्या आणि सरदारांच्या मुदपाकखान्यातला म्हणजेच स्वयंपाकघरातला हिशेब करून त्यावर जगतात. आज स्वयंपाक या शब्दातील ‘पाक’ शब्द काढून तिथे ‘श्री’ शब्द लावा म्हणणार्या लोकांचे पूर्वज होते हे. एका बाजूला हे लोक त्यांच्या धर्मग्रंथात ज्या ‘म्लेंच्छांना’ अत्यंत नीच आणि हीन मानत होते, त्यांचीच चाकरी करताना त्यांना थोडीही लाज वाटत नव्हती. त्यात चूक झाली तर ते फटकेही खात. मग हे आधीच उद्विग्न झालेल्या शेतकर्यांवर जुलूम करत.
वैश्य आणि शूद्रातिशूद्रांना नीच लेखून धर्म आणि राजकारणाची सूत्रे ब्राह्म-क्षात्र युतीने उच्चवर्णीयांच्या ताब्यात ठेवली होती. जन्माखेरीज कसलीच कर्तबगारी नसलेल्यांनी ही गुलामी पत्करलेली असताना वैश्य-शूद्रातिशूद्रांनी मात्र स्वाभिमानाचा रस्ता निवडला होता. याच शूद्रातिशूद्रांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजात खरा धर्म जिवंत ठेवला. नीतीमत्तेची शिकवण दिली. विठ्ठलभक्तीचा मार्ग दाखवला. स्वाभिमानाची प्रेरणा दिली. धर्माचा खरा उपदेश पोचवला. धर्मभ्रष्ट उच्चवर्णीयांना धर्मनिष्ठ बनवण्याचं कामही संतांनी केलं. त्यावर मात्र काही सनातनी उच्चवर्णीयांनी आक्षेप घेतला. धर्मतत्त्वांच्या उपदेशाचा अधिकार शूद्रातिशूद्रांना नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. खरंतर ज्यांना हा अधिकार आणि ज्यांची ही जबाबदारी होती ते त्या कर्तव्यापासून कधीच च्युत झाले होते. आणि वर तो खरा धर्म सांगणार्या वारकरी संप्रदायाच्या कामात खोडा घालण्याचं काम करत होते. ते वारकरी संतांना छळत होते. संतांवरच धर्मभ्रष्टतेचे आरोप करत होते. तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून याच वृत्तीवर ताशेरे ओढले आहेत.
कोणताही रोग बरा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या रोगाची लक्षणं ओळखणं. त्या लक्षणातून रोगाचं अचूक निदान करणं आणि त्यावर उपचार करणं या पुढच्या पायर्या असतात. तुकोबारायांनी अशा अभंगातून समाजमनाला जडलेल्या लाचारीच्या आजाराची लक्षणं मांडली. त्यामुळे मराठी समाज जागृत होत गेला. त्यांच्यात स्वाभिमानाची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर वारकरी संतांनी समाजातील उच्चनीचताही कमी केलेली होती. जातीय दुरावा कमी झाला होता. वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने अठरापगड जातीतील लोक एकत्र आले होते. समाज एकसंघ झाला होता. अशा अभंगांनी त्यांच्यातल्या स्वाभिमानाच्या भावनेला फुंकर घातली गेली. आधी एकनाथ महाराज आणि त्यानंतर शेख महंमदबाबा-तुकोबाराय अशा संतांच्या अभंगवाणीने समाजमन ढवळून निघालं. परिणामी मावळ भागातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनही बरेच स्वाभिमानी लोक उभे राहू लागले. त्यांना एका नेतृत्वाची गरज होती. त्या काळातील भ्रष्ट राजकारण, प्रशासनातील उच्चवर्णीय नोकरशाही आणि कमालीची लाचारी याला छेद देत स्वराज्य निर्माण करू शकेल अशा राजाच्या अपेक्षेत लोक होते.
तुकोबाराय या अभंगाच्या अखेरच्या चरणात ही परिस्थिती बदलण्यासाठी देवाचा धावा करतात. ती बदलण्याचं आव्हान तुकोबारायांच्या काळातच एका महान आणि असामान्य व्यक्तिमत्वाने स्वीकारलं. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर वारकरी संतांचा संस्कार होताच. त्यांचं बालपण पुण्यात गेलं. याच परिसरात आणि अर्थातच त्यांच्या जहागिरीत देहू गाव येत होतं. तिथे तुकोबारायांची कीर्तनं होत होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून विसाव्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांनी तुकोबारायांची कीर्तनं ऐकली होती असं म्हणायला जागा आहे. निरपेक्षता, रयतेची काळजी आणि जातीय समतोल राखण्याची प्रेरणा त्यांना तुकोबारायांकडून मिळाली असणार.
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून शिवाजी महाराजांनी स्वराज्यनिर्मितीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. त्यांनी वारकरी संतांच्या मांदियाळीप्रमाणेच विविध जातीतील मावळ्यांची फौज निर्माण केली. त्यात कुणबी, रामोशी, नाभिक, दलित, मुस्लिम आणि धनगरही होते. ब्राह्मण, कायस्थ आणि मराठाही होते. छत्रपती शिवरायांनी कोणत्याही जातीला झुकतं माप दिलं नाही. त्यांनी स्वराज्याचा शत्रू कोणत्याही जातीचा असला तरी त्याची पर्वा केली नाही. चंद्रराव मोर्यांंसारख्या तथाकथित मातब्बर क्षत्रियांनाही त्यांची जागा दाखवली. अफजलखानाचा वकील असलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णीलाही त्यांनी सोडलं नाही. ‘ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो’ असं ठामपणे म्हणण्याची ताकद त्यांनी दाखवली. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी चालवलेल्या या स्वराज्यनिर्मितीच्या प्रयत्नालाही उच्चवर्णीयांनी खोडा घातलाच. तुकोबारायांना वेदांचा अधिकार नाही असं म्हणत त्यांना छळणार्या याच प्रवृत्तीचा सामना पुढच्या काळात छत्रपती शिवरायांनाही करावा लागला. याच मंडळींनी निर्लज्जपणे दक्षिणेसाठी अफजलखान जिंकावा म्हणून शतचंडी यज्ञ केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्याच्या अधिकृत मान्यतेसाठी त्यांना राज्याभिषेकाची आवश्यकता होती. परिस्थितीची जाण नसणार्या लोभी, स्वार्थी आणि भ्रष्ट लोकांनी त्यांना परत अडचणीत आणलं. शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वाचा मुद्दा पुढे आणत त्यांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. १६७४च्या डच कागदपत्रात त्याची नोंद आहे. ज्या प्रवृत्तीने तुकोबारायांना वेदाचा अधिकार नाही असं सांगितलं तीच प्रवृत्ती पुढे शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळीही उभी राहिली. त्यांना न जुमानता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला.
छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्यनिर्मितीच्या कार्याची पार्श्वभूमी तयार करण्यात वारकरी संतांची मोलाची भूमिका होती. त्यातही एकनाथ महाराज हे शिवरायांच्या लगतपूर्व काळातले तर शेख महंदबाबा आणि तुकोबाराय त्यांचे समकालीन. शेख महंमदबाबांच्या ठिकाणी तर शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांची फार श्रद्धा होती. तुकोबारायांविषयी असाच पूज्यभाव छत्रपतींच्या ठिकाणी होता. साहजिकच वारकरी संतांची विचारधारा आणि स्वराज्यनिर्मितीमागची विचारधारा यात बरीच जवळीक आहे. जातीगंडाने ग्रासलेल्या काही इतिहासकारांना मात्र हे समजलं नाही. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘संतांनी समाजाला पंगू बनवलं’ असा हास्यास्पद निष्कर्ष काढला. तुकोबारायांचा हा एकच अभंग त्यांचा निष्कर्ष खोडून काढायला पुरेसा आहे. या अभंगाच्या अखेरच्या चरणात तुकोबाराय परिस्थिती बदलण्यासाठी देवाला आवाहन करतात, म्हणून काही लोकांना ते दैववादी वाटतील. वास्तविक पाहता देवाला आवाहन करण्यात कोणताही दैववाद नाही. ती एक प्रामाणिक श्रद्धा आहे. स्वतः शिवरायांनी स्वराज्य व्हावं ही ‘श्रींची इच्छा’ आहे असं म्हटलंय. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात तसं तेहतीस कोटी देवांची फलटण बाद करण्याची ताकद शिवरायांच्या नावात आहे. लोक छत्रपती शिवाजी महाराजांना ईश्वरी कार्य करणारे राजे म्हणून पाहत होते. त्यामागची मूळ भावना आपल्याला तुकोबारायांच्या अशा अभंगातून सापडते. त्याचाच राग उच्चवर्णीयांना होता, त्याचा दाखला आपल्याला महात्मा जोतिबा फुल्यांच्या चरित्रात सापडतो. त्यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी उजेडात आणली. रायगडावर पसरलेल्या वेली आणि झाडंझुडपं बाजूला करुन त्यांनी शिवरायांच्या समाधीची पूजा केली. त्यावेळी रायगडावरचा एक ग्रामजोशी त्या ठिकाणी आला. त्या ग्रामभटाने ‘पूजा करायला शिवराय देव नव्हते’ म्हणत ती पूजा उधळण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवरायांना देवाच्या जागी मानण्याची कल्पना त्याला सहन झाली नाही. त्या ग्रामभटाने शिवरायांचा उल्लेख ‘कुणबट’ म्हणून केला, असं महात्मा फुल्यांनी म्हटल्याचं भाई माधवराव बागल यांनी लिहिलं आहे. थोडक्यात ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ म्हणत बादशहाच्या चरणी लोटांगण घालण्यात ज्या प्रवृत्तीला कमीपणा वाटत नव्हता तीच प्रवृत्ती कोणी श्रद्धेने शिवरायांची पूजा केली तर त्याला मात्र विरोध करत होती. तुकोबाराय आणि महात्मा फुले याच प्रवृत्तीच्या विरोधात होते. त्यामुळेच तुकोबारायांप्रमाणे महात्मा फुल्यांनीही इंग्रजांच्या प्रशासनातील उच्चवर्णीयांच्या नोकरशाहीच्या जुलमाचं दाहक वास्तव अखंडातून आणि गुलामगिरीसारख्या पुस्तकातूनही प्रखरपणे मांडलं.(वानगी) पुराणात’ ही म्हण यासंदर्भात फारच बोलकी आहे. या संपूर्ण अभंगात तुकोबारायांनी पुरोहित, पंडित, कीर्तनकार आणि पुराणिक अशा चार प्रातिनिधिकांची चिकित्सा केलेली आहे. पुरोहिताचा सोवळेपणा, पंडिताचा ग्रंथव्यासंग, कीर्तनातला टाळ-मृदंग गजर आणि पुराणिकाच्या ज्ञानगोष्टी अशा बाह्याचाराकडे लक्ष न देता त्यांच्या अंतरातलं प्रेम महत्त्वाचं आहे हे तुकोबाराय सुचवतात.
