प्रदीप म्हापसेकर (मुंबई लाईव्ह न्यूज पोर्टलचे व्यंगचित्रकार)
बाळासाहेब….!
या नावापुढे शब्द कमी पडतात. रेषा तोकड्या होतात. त्यांचं चित्र काढताना खुद्द कागदही सावरून बसतो, ब्रश निमूटपणे नम्र होतो. असं बरंच काही होत असतं. ती त्यांची भीती नसते, पण इतका मोठा माणूस, प्रेमळ माणूस कागदावर येण्याआधीच अदृश्यपणे दिसायला लागतो. व्यंगचित्रकलेतल्या देवाचं नकळत दर्शन होतं. काय हा चमत्कार आहे. त्यांच्या राजकारणाबद्दल खूप लिहिलं गेलंय, बोललं जातं. पण व्यंगचित्रकार म्हणून ते त्याहीपेक्षा ग्रेट होते. व्यंगचित्रकार म्हणून ते जगात मोठे होते.
कधी कधी प्रश्न पडतो, राजकारण करताना त्यांनी या व्यंगचित्रकलेला किती वेळ दिला असेल?
ब्रशने काढलेलं त्यांचं एखादं चित्र, अर्ध्या, पाऊण तासांत काढलेलं नसायचं. दिसायला सोपे असणारे त्या स्ट्रोकमागे खूप तपस्या, साधना असते. कमालीचा वेळ द्यावा लागतो. खूप शिस्त लागते. तेव्हा कुठे ब्रश तुमच्याशी दोस्ती करतो. हे सगळं त्यांनी त्यावेळी कसं केलं असेल?
बाळासाहेबांच्या प्रत्येक चित्रात अपार मेहनत दिसते. रेषांवर कमालीची हुकूमत दिसते. शब्द आग ओकत असतात. हे सगळं आणि सगळं फक्त बाळासाहेबच करू शकत होते. त्यानंतर हे कधी दिसले नाही. तुम्ही आम्ही `अरे’ला `कारे’ करतो. बाळासाहेब त्याही पुढे असतात. कारे विचारणार्याला ते फटकारे देतात. असो, मनापासून बोलावसं वाटतं, टायगर जिंदा है…! माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेब सलाम तुम्हाला…!