
सुग्रास जेवणानंतर एक पान खाल्लं की तबियत एकदम खूष होऊन जाते… पान खाणार्यांच्या अनेक तर्हा असतात. काहीजण पचनक्रिया उत्तम राहावी म्हणून पान खातात, तर काहीजण मुखशुद्धीसाठी… तरतरीत राहण्यासाठी देखील पान खाणारी मंडळी आहेत. पानवाला ही किती महत्त्वाची ‘संस्था’ आहे, हे साक्षात पु. ल. देशपांडे यांनीच ‘पानवाला’ या बहारदार ललित लेखात सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे, ज्याची त्याची आवड ओळखणारा आणि त्यानुसार खास बनवलेलं पान ग्राहकाच्या हातात ठेवल्यावर न सांगता चुन्याची दांडी पुढे करणारा प्रत्येकाचा खास पानवाला असतो. रोज न चुकता तिथेच पान खायचा रिवाज असतो. असा पुणेकरांचा ‘फॅमिली पानवाला’ म्हणजे ‘जगन्नाथ पान’ हे फॅमिली पान शॉप.
पानवाला म्हटलं की आठवते ती त्याची एखाद्या कोपर्यातली टपरी. पानाचं प्रॉपर दुकान ही ‘जगन्नाथ’ची ओळख. त्यामागची कल्पनाही विचार करण्यासारखी. पान खाणारे एकटे दुकटे शौकीन वीर खूप असतात. पण, अनेकदा सहकुटुंब सहपरिवार दुपारच्या किंवा रात्रीच्या भोजनाचा आनंद घ्यायला जाणारी कुटुंबं, मित्रपरिवार (पुण्यात यांची संख्या खूप) यांच्यासाठी भोजनाची सुगंधित गोडव्याने सांगता करण्यासाठी पान घ्यायला जायचं तर टपरीवर जाणं काही वेळा तापदायकच होतं. जिथे फॅमिलीला अवघडल्यासारखं वाटणार नाही, असं ‘फॅमिली पान शॉप’ सुरू करण्याच्या विचारातून दीपक आणि सुदेश शेट्टी या बंधूनी २६ वर्षांपूर्वी ‘जगन्नाथ’ची मुहूर्तमेढ रोवली. आज हे फॅमिली पान शॉप फक्त पुणेकरांच्याच नाही तर अनेक भागातील लोकांचे आकर्षण बनले आहे. इथे मिळणार्या पानाची सर्वात महत्त्वाची खासियत चवीतलं सातत्य. तुम्ही इथे आज जे पान ज्या चवीचे खाल, त्याच चवीचे ते पान तुम्हाला उद्याही मिळणार म्हणजे मिळणारच.

बाजीराव रोडवर शनिपार चौकाकडे जाणार्या रस्त्यावर अलीकडच्या चौकात हे दुकान आहे. दीपक आणि सुदेश शेट्टी हे दोघेजण १९८० ते २००१ या काळात नवा विष्णू मंदिराजवळ रस्त्यावर खुर्ची टाकून पानाची विक्री करत असत. फॅमिली पान शॉपची कल्पना डोक्यात आल्यावर त्यांनी बँकेचे कर्ज काढून बाजीराव रोडवर दुकान घेतले. सुरुवातीला फॅमिली पान शॉप ही कल्पना ग्राहकांनाच अजब वाटत होती, त्यामुळे शेट्टी बंधूही द्विधा मनस्थितीत होते. मात्र, कोणी काही म्हटले तरी मागे वळून पाहायचे नाही, असे ठरवून त्यांनी नेटाने दुकान चालवलं. मुळात, फॅमिली पान शॉपची संकल्पना २००१मध्ये फारच नवीन होती. नावीन्यपूर्ण संकल्पना उचलून धरणार्या चोखंदळ पुण्यात या पान शॉपची सगळीकडे (रसभरित मुखांनी) ‘तोंडी’ प्रसिद्धी झाली, त्यामुळे या बंधूंचा आत्मविश्वास वाढला आणि व्यवसाय आकाराला येऊ लागला.
मघई मसाला पानाने दिली प्रसिद्धी
सुदेश शेट्टी सांगतात की फॅमिली पान शॉपची सुरुवात केल्यानंतर आम्ही ‘मघई मसाला’ पानाची विक्री करू लागलो. बाहेर मिळणार्या मघई पानापेक्षा आमच्याकडे मिळणारे पान युनिक होते. कारण त्यात वापरला जाणारा मसाला खास वेगळा आहे. आम्ही दोघा भावांनी विशेष प्रयोग करून हा मसाला तयार केला आहे. त्यात खोबरे, बडीशेप पावडर, तीळ, साखर पावडर, खुशबू यांचा समावेश होता. हा मसाला तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यातली जेलीदेखील महाबळेश्वरमधून तयार करून घेतो. त्यामुळे हे पान अल्पावधीत प्रसिद्ध झाले. पुण्याबरोबरच दुरून दुरून लोक या पानाचा आस्वाद घेण्यासाठी खास इथे येऊ लागले. तोंडात विरघळणारे वेगळे पान म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे या पानाचा आस्वाद घेण्यासाठी इथे येऊ लागली, असे दीपक शेट्टी म्हणाले.

२७ वर्षांपासून एकाच मळ्यातली पाने…
जगन्नाथ सुरू केल्यापासून आम्ही पश्चिम बंगालमधील मिदनापूरमधल्या एकाच मळ्यातून विड्याची पाने घेत आहे. याखेरीज पानासाठी आवश्यक असणारा चुना आणि कातही आम्ही मुंबईमधून तयार करून घेतो. चुना, कात पानाच्या गरजेनुसार तयार केला जातो. मूळ कच्चा माल उत्तम एकसारखा आणि उत्तम प्रतीचा असेल तर पानाचा दर्जा कधीच खालावणार नाही, हे माहीत आहे. त्यामुळे आजतागायत आम्ही त्यात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे त्याची चव टिकून राहिलेली आहे, असे सुदेश सांगतात.
कोलकाता मसाला, चॉकलेट पान…
जगन्नाथमध्ये येणार्या ग्राहकांचे मघई मसाला पानावर विशेष प्रेम आहेच, त्याच्याच जोडीला आम्ही कोलकाता मसाला, चॉकलेट पानाचे सात प्रकार त्याचबरोबर मलई, पिस्ता, मँगो, स्ट्रॉबेरी, अशी वेगळ्या फ्लेवरची पाने देण्यास सुरुवात केली आहे. चॉकलेट पानात नामवंत मोर्डे चॉकलेटचा वापर केला जातो. हे चॉकलेट तोंडामध्ये विरघळते, पानाला त्यामुळे येणारी टेस्ट देखील मस्त असल्याने ग्राहकांची त्याला अधिक पसंती देतात. वेगळ्या फ्लेवरची पाने आम्ही खास कुल्फीसारख्या कोनमध्ये देतो, त्यामुळे त्याला वेगळा, आकर्षक लुक येतो. या पानांना तरुणांची अधिक पसंती मिळते, असे दीपक सांगतात.
अजित पवारांचे आवडते पान
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुणे दौर्यावर असले की त्यांना खाण्यासाठी इथून पान जात असे. साधा खुशबू हे त्यांच्या आवडीचे पान होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारही जगन्नाथ पानाचे फॅन आहेत. प्रसाद ओक, माधव अभ्यंकर अशी अनेक नावे सांगता येतील. जगन्नाथमध्ये मिळणारे कोणतेही पान तोंडात टाकताक्षणी विरघळते. पानाला कडवट चव नाही, छान गोडी आहे. त्यामुळे हे पान खाताना वेगळी मजा येते. गेल्या पाच वर्षांपासून आपण रोज न चुकता इथे पान खाण्यासाठी येतो असे एक ग्राहक तुषार प्रभू यांनी सांगितले. इथल्या पानाचा मसाला हा त्याचा यूएसपी आहे, त्यामुळेच हे पान इतरांपेक्षा वेगळ्या खास चवीचे होते. त्यामुळेच ते रोजच्या सवयीचा भाग झाले आहे, असे प्रभू सांगतात.

फ्रँचाइझी दिली की गडबड होते…
अनेकजण व्यवसाय वाढवण्यासाठी ब्रॅँडिंग करून फ्रँचाइझी देतात. पण आम्ही सुरुवातीपासूनच त्याच्या विरोधात राहिलो आहोत. भविष्यकाळात देखील आम्ही त्या मोहात पडणार नाही. आमच्यावरच्या विश्वासाने येणार्या ग्राहकाला आम्ही आज ज्या चवीचे पान देत आहोत, तेच उद्या, परवा देऊ इच्छितो. त्यात काँम्प्रमाइज नाही. तेच आमचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे आम्ही व्यवसाय वाढवणे, फ्रँचाइझी देणे असे काही करणार नाही. असे दीपक आणि सुदेश सांगतात.
अनुभवातून शिकायला मिळाले…
व्यवसाय करताना प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवत असतो, तसे आम्ही शिकत गेलो, नव्या गोष्टी आत्मसात करत गेलो. आमच्या पानाच्या व्यवसायाला एकूण ४६ वर्ष झाली आहेत. आमचे पान खाऊन ग्राहकांच्या चेहर्यावर पसरणारी तृप्ती हेच आमचं समाधान आहे. तेच यापुढेही जपत राहणार, असं शेट्टी बंधू सांगतात.

