• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चिकित्सा `दगलबाज शिवाजी’ची

सचिन परब (प्रबोधन-१००)

marmik by marmik
December 25, 2025
in प्रबोधन १००
0
चिकित्सा `दगलबाज शिवाजी’ची

‘दगलबाज शिवाजी’ हा लेख म्हणून आधी प्रबोधनमध्ये प्रसिद्ध झाला आणि नंतर स्वतंत्र पुस्तिकारूपाने. या दोन्ही वेळेस हा दीर्घ लेख वाचकांना पसंत पडला. विशेष म्हणजे ब्राह्मणी कंपूतल्या नेहमीच्या विरोधकांपैकीही अनेकांनी त्याचं कौतुक केलं. त्यात भालाकार भोपटकरांसारखे कडवे ब्राह्मणी मताभिमानीही होते. पण प्रबोधनकार या कौतुकात वाहून जाणारे नव्हते. उलट आपण केलेल्या मांडणीवर टीका करणारा लेखच त्यांनी प्रबोधनच्या जून १९२७च्या अंकातच प्रसिद्ध केला होता.

प्रबोधनच्या या अंकात ’दगलबाज शिवाजी’ हा मूळ लेख दहा पानं भरून प्रसिद्ध केला आहे. तो संपल्यावर पुढच्याच पानात आणखी एक मथळा आपलं लक्ष वेधून घेतो. तो असतो, ’गो–ब्राम्हण प्रतिपालक शिवाजी’. या मथळ्याच्या खालीच कंसात पुढच्या छोटेखानी लेखाचं स्वरूपही लिहिलेलं असतं, ते असं – (आजच्या अंकातील संपादकीय अग्रलेखावर टीकात्मक पुरवणी – सह संपादक). आता हा लेख लिहिणारे सहसंपादक कोण असावेत, असा प्रश्न समोर आल्यावर स्वाभाविकपणे रामचंद्र उर्फ बापूसाहेब चित्रेंचं नाव समोर येतं. त्यांनी दीर्घकाळ प्रबोधनचे सहसंपादक म्हणून काम पाहिलं होतं. ते प्रबोधनकारांचे उजवे हातच होते. पण त्यांचं निधन हा लेख प्रसिद्ध होण्याच्या एका वर्षाआधीच म्हणजे मे १९२६मध्येच झालं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी ज्ञानदेव घोलप यांनीही प्रबोधनकारांसोबत काम केलं होतं. पण ते फार आधी म्हणजे सातार्‍याच्या मुक्कामात. १९२७मध्ये प्रबोधनमध्ये काम करणार्‍या आणखी चार सहकार्‍यांची नावं प्रबोधनकारांनी`शनिमाहात्म्य`मध्ये दिली आहेत, प्रभाकर चित्रे, मारुती हराळे, बापूराव वझे आणि दिनकर सुरुडकर. पण या चौघांचाही उल्लेख प्रबोधनकार कामगार असा करतात. यापैकी कुणाचेही लेख प्रबोधनमध्ये छापून आलेले नाहीत. त्यामुळे ’गो-ब्राम्हण प्रतिपालक शिवाजी’ हा लेख लिहिणारं यापैकी कुणी नसावं, हे तर स्पष्टच आहे. पुढेही सहाव्या वर्षाच्या पहिल्या अंकात आणखी काही कामगारांची नावं आहेत. पण त्यात कुठेच कुणी संपादकीय सहकारी नाही. मग हा प्रबोधनमधला सहसंपादक नेमका कोण असेल, याची उत्सुकता कायम राहते. या काळात प्रबोधनकारांना लिखाणात मदत करण्यासाठी सत्यशोधक चळवळीतले सहकारी येत होते का? त्यापैकी कुणी हा लेख लिहिला असेल का? आज आपल्याला ठामपणाने याविषयी काहीच सांगता येत नाही. त्यामुळे हा लेख लिहिणार्‍या प्रबोधनच्या सहसंपादकाचं नाव गुलदस्त्यातच राहतं.

महाराष्ट्राच्या इतिहासलेखनाला नवं वळण देणार्‍या इतिहासकारांमध्ये प्रबोधनकारांचं नाव अग्रस्थानी मानायला हवं. कारण त्यांनी बहुजनवादी नजरेने परंपरागत ब्राह्मणी इतिहास संशोधनाची चिकित्सा केली. ती अत्यंत ताकदीने केली. त्यातून सर्वसामान्य कष्टकरी समाजांतून येणार्‍या वाचकांमध्ये नवा स्वाभिमान आणि आत्मविश्वास उभा राहिला. त्यांच्यातूनही इतिहास लेखक पुढे आले. पण प्रबोधनकारांच्याच इतिहासलेखनाची कुणी बहुजनी दृष्टीने समीक्षा केली आणि त्यातून प्रबोधनकारांनी मांडलेल्या इतिहासाविषयी प्रश्न उभे केले तर काय होईल, असा प्रश्नही आपल्या डोक्यात निर्माण होत नाही. असं कसं होऊ शकेल, असं वाटून जातं. पण तसं झालंय. हा लेख प्रबोधनकारांच्याच दगलबाज शिवाजी या लेखाची बहुजनवादी दृष्टीने चिकित्सा करतो. त्यातून काही प्रश्न उभे करतो. ती थेट टीकाच असते. तरीही प्रबोधनकार या विरोधी लेखनाचं मूल्य मान्य करतात. त्याला प्रबोधनमध्ये मानाचं स्थान देतात, हे आजच्या संदर्भात महत्त्वाचं आहे.

प्रबोधनकारांचं अगदी सुरुवातीचे लेख किंवा माझी जीवनगाथाच्या प्रकाशन समारंभातलं त्यांचं शेवटचं भाषण, यापैकी काहीही वाचलं तर त्यातून एक गोष्ट लगेच लक्षात येते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेला प्रचंड आदर. शिवप्रेम हे त्यांच्या नसानसांत भिनलेलं होतं. तेच त्यांनी शिवसेनेच्या मुळांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. शिवरायांवर केलेल्या प्रत्येक टीकेला त्यांनी उत्तर दिलं. प्रसंगी देशाचे लाडके नेते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनाही त्यांनी सोडलं नाही. ’दगलबाज शिवाजी’ हे देखील शिवरायांवरच्या विश्वासघाताच्या आरोपाला दिलेलं सडेतोड आणि बिनतोड उत्तर आहे. अशा वेळेस प्रबोधनकार छत्रपतींवरची टीका प्रबोधनमध्ये छापतील असा विचार करवत नाही. पण त्यांनी ही टीका छापली. कारण ते अंधभक्त नव्हते. त्यांचं शिवरायांवरचं प्रेम कुचकामी नव्हतं, तर हे अभ्यासातून भक्कम उभं राहिलेलं होतं. प्रबोधनच्या सहसंपादकाने लिहिलेल्या या लेखाची ही सुरुवातच धक्कादायक ठरते.
आजच्या अग्रलेखांत शिवाजीला दगलबाज उर्फ डिप्लोमॅट ठरविण्यांत आलेले आहे. परंतु मा‍झ्या मते चरित्राच्या पूर्वार्धात शिवाजी जरी कट्टा दगलबाज होता, तरी उत्तरार्धात त्याचे ते स्पिरिट पुष्कळच हिणकस बनले. म्हणूनच त्याने तळहातावर शीर घेऊन उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच् या पायांतच त्याच्या दुर्दैवी अध:पाताचे बीज खास शिवाजीकडूनच पेरले गेले, असे म्हणण्यास हरकत नाही. अमर्याद फितवेखोरांचा संहार करण्यांत जो शिवाजी शिस्तीची कदर पूर्वी कडक पाळीत असे, तोच शिवाजी उत्तरार्धात तिकडे डोळे उघडे ठेऊन डोळेझांक करू लागला. म्हणूनच मी म्हणतो की शिवाजीला दगलबाजीचे सर्टिफिकेट द्यायचेच तर ते पूर्ण न देता पाऊण द्यावे.
छत्रपती शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणं चुकीचं आहे, अशी मांडणी करतानाच या सहसंपादकाने ते भिक्षुकशाहीच्या नादाला लागले, अशी टीका केली आहे, शिवाजी हा गो-ब्राम्हण प्रतिपालक होता, असे एका विशिष्ट मतानुयायी कंपूचे आग्रहाचे विधान आहे. शिवाजीला गो-ब्राम्हण प्रतिपालक म्हणणे म्हणजे त्याच्या सर्व राष्ट्रसेवेला कवडीमोल ठरविण्यासारखे आहे. एवढा मोठा हिंदवी स्वराज्याचा विराट व्यूह त्याने रचला, तो काय गो ब्राम्हण प्रतिपालनासाठी? हिंदुस्थानांत हापूस पायरीचे आंबे चांगले होतात, युरप अमेरिकेत ते पिकतच नाहीत, म्हणून तेवढ्यासाठी इंग्रजांनी हिदुस्थानचे राज्य बळकावण्याचा आटारेटा केला, असे म्हणण्याइतकाच पोरकटपणा उपरोक्त विधानांत स्पष्ट होतो. गोब्राम्हणांचा प्रतिपाल करायला एवढा मोठा राष्ट्रवीर शिवाजी कशाला? जे काम आज चौंडेबुवासारखा एक फाटका माणूस सहज भीक मागून करतो, त्यासाठी शिवाजी कशाला हवा होता? आज त्यांच्या मठात हेच दोन प्राणी पाळले पोसले जातात. एवढी मात्र गोष्ट खरी की शिवाजीच्या दगलबाजीने काही काळ देशांतल्या इतर सर्व दगलबाजांना चारी मुंड्या चीत केले आणि शून्यांतून ब्रम्हांड निघावे तद्वत दख्खनला हिंदवी स्वराज्याचे सौभाग्य लाभले. तरी पण अखेर अखेर गो आणि ब्राम्हण या दोन प्राण्यांच्या नादाला लागून शिवाजी हिंदू वळणावर गेला.

या परिच्छेदातला शेवटचा निष्कर्ष शिवप्रेमी महाराष्ट्राला मान्य होऊ शकणारा नाही. पण त्याआधीचं शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक ठरवणं कसं चुकीचं आहे, हे या सहसंपादकाने नीट मांडलेलं दिसतं. ते सत्यशोधक चळवळीच्या विचारधारेशी जोडलेलं आहे. गोब्राह्मणप्रतिपालनाच्या विषयी वरच्या परिच्छेदात उल्लेख असलेले चौंडेबुवा म्हणजे वाईचे समर्थभक्त गोजीवन चौंडे होत. त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून रामदासी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी काही मंदिरं आणि मठ उभारल्याचाही उल्लेख सापडतो. पण ते प्रामुख्याने गोरक्षणाच्या कामासाठी ओळखले जात. त्यांनी देशभर कीर्तनं करून रामदासी संप्रदायाच्या विस्तारासाठी निधी गोळा केला. याच संदर्भात त्यांचा उल्लेख आहे.

छत्रपती शिवराय भिक्षुकशाहीला शरण गेले असल्याचा दावा या सहसंपादकाच्या लेखात केला आहे, तो प्रामुख्याने राज्याभिषेकाच्या संदर्भात असावा, असे या पुढच्या परिच्छेदातून दिसते, त्याने परक्यांना पारखिले, पण स्वकीायांकडे दुर्लक्ष केले. परकीयांच्या दगलबाजीला तोंडबेडी चढविणारी त्यांची वरचढ दगलबाजी स्वकीयांच्या बाबतीत अर्जुनाप्रमाणे मोहग्रस्त बनली. त्याने परक्यांना दाबांत ठेवले खरे, पण स्वकीयांच्या दगलबाजीचा फाजील मुलाजा राखला. स्वराज्योपक्रमाच्या उषःकाली दिसेल त्या देशद्रोही दगलबाजाला चिरडून फस्त करणारी त्याची राजकारणी मस्त वृत्ती अखेर अखेर सुस्त बनली. त्याची कदरबाज दगलबाजी हिणकस ठरली. आणि त्यांच वेळी त्याने उभारलेल्या प्रचंड स्वराज्यवृक्षाच्या मुळांत क्षुद्र स्वार्थी नराधमांच्या कृष्ण कारस्थानांचे वीष पडले. दगलबाजी उर्फ डिपलोमसी हा सुद्धा एक मोठा योग आहे. त्याचे पथ्यपाणी फार कडक रीतीने पाळावे लागते. त्याला मोहाची सावलीसुद्धा खपत नाही. अर्थात अखेर अखेर शिवाजी किंचित चालढकल सरू लागतांच, त्याचे प्रायःश्चित्त त्याने राज्याभिषेकाच्या वेळीस भोगले. मोगली व युरपियन दगलबाजांना नुसत्या आपल्या नावाच्या दरार्‍याने हवा तसा वाकविणारा शिवाजी या वेळी गोब्राम्हणांपुढे गोगलगाय बनला. त्याची कदरबाज ताठ मान त्यांच्यापुढे किंचित नमविली जाताच, त्याच्या मानगुटीवर भिक्षुकशाहीचे भूत जे चटकन बसले, ते कोणत्याही छत्रपतीला स्वराज्याच्या मृत्यूपर्यंत उठविता आले नाही.

या लेखाचा शेवट करताना हा सहसंपादक प्रबोधनकारांच्या लेखाच्या मर्यादा सांगण्याचा प्रयत्न करतो. मूळ लेखात सांगितल्यानुसार शिवरायांचा जयजयकार खर्‍या अर्थाने करायचा असेल तर भिक्षुकशाही संपवावी लागेल, असं हा सहसंपादक लिहितो, शिवाजी दगलबाज योगीश्वर खरा, पण त्याच्याही योगाला गोब्राम्हणत्वाच्या भोगाने अखेर कम दगलबाज बनवून, त्याचे हिंदवी स्वराज्य अवघ्या दोन शतकांत बळीप्रमाणे पाताळवासी केले. शिवरायाच्या अपूर्ण दगलबाज योगाची पूर्तता कोण कधीं काळी करील तो करो! परंतु पाताळवासी स्वराज्याचा पुनर्जन्म होण्यापूर्वी गोब्राम्हणाभिमानी भिक्षुकशाही वैâलासवासी झाल्याशिवाय नुसता शिवरायाचा जयजयकार व्यर्थ आहे.
आज आश्चर्य वाटतं, पण हा तीन चार परिच्छेदांचा छोटा लेख प्रबोधनमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. प्रबोधनकारांच्या बिनतोड असणार्‍या ’दगलबाज शिवाजी’ या लेखाचा प्रतिवाद या लेखात केला आहे. छत्रपती हे दगलबाज होतेच, पण त्यांनी याच दगलबाजीच्या जोरावर भिक्षुकशाहीला नामोहरम करायला हवं होतं, अशी अपेक्षा या लेखात केलेली आहे. भिक्षुकशाही कायमची न संपल्यामुळेच स्वराज्य दीर्घकाळ टिकू शकले नाही, असाही दावा या लेखात आहे. हे सगळं प्रसिद्ध करण्यासाठी एक धाडस लागतं. ते प्रबोधनकारांकडे नि:संशय होतं. स्वतः केलेल्या मांडणीवर त्यांचा पक्का विश्वास होता. त्यामुळे त्यावर केलेल्या टीकेची त्यांना भीती नव्हती. त्यांनी ती आपल्याच लेखाबरोबर सहजपणे छापून टाकली. टीकेला न घाबरता चर्चेतून सत्यापर्यंत जाता येतं, यावर त्यांचा विश्वास होता.
’दगलबाज शिवाजी’ या लेखाला कसा प्रतिसाद मिळाला हे आपल्याला माहीत आहे. पण या सहसंपादकाच्या टीकेवर काय प्रतिक्रिया उमटली हे मात्र माहीत नाही. तरीही प्रबोधनकारांच्या दिलदार बेधडक स्वभावाचा दाखला म्हणून हा लेख आपल्याला नोंदवावा लागेल, हे नक्की.

Previous Post

और एक पाकिस्तान?

Next Post

कपटीपणाचा बुरखा फाडणारे तुकोबा!

Next Post

कपटीपणाचा बुरखा फाडणारे तुकोबा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.