महिलांच्या गुलामगिरीच्या विरोधात प्रबोधनकार फारच आक्रमकपणे भांडत राहिलेले दिसतात. त्यांच्या आजी आणि आईने केलेले संस्कार त्याला कारण आहेत. त्यामुळे त्यांनी हुंडाविरोधाची अत्यंत आक्रमक आणि यशस्वी चळवळ चालवली. बालविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण असे मुद्दे ऐरणीवर आणले. गोव्यातल्या देवदासी प्रथेविरोधातला त्यांचा एल्गारही महत्त्वाचा आहे.
प्रबोधनकारांनी त्या काळात अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. दक्षिणेला कारवार, बेळगाव, विजापूरपासून उत्तरेला देवास, नागपूर, जळगावपर्यंत ते सगळीकडे फिरले होते. पण ते सांगतात तसा त्यांचा हा प्रवास ठरवून नाही, तर अनाहूतपणे कुणाच्या तरी बोलावण्यावरून व्हायचा. मराठवाडा तेव्हा निजामाच्या हुकमतीत असल्यामुळे तिथे ब्रिटिश भारतातल्या इतरांप्रमाणे प्रबोधनकारांचं जाणं झालेलं दिसत नाही. तळकोकणातही ते फारसे गेलेले दिसत नाहीत, पण पोर्तुगीजांच्या ताब्यातल्या गोव्याला मात्र ते दोनदा गेलेले आहेत.
प्रबोधनकार सांगतात, तेव्हा गोवा त्यांच्यासारख्या तरुणासाठी विलायतेसारखाच होता. ते साल होतं १९०४. म्हणजेच ते १८-१९ वर्षांचे होते. मुंबईत नोकरीची शोधाशोध आणि उमेदवारी करत होते. मित्रांबरोबर चाळीतल्या खोलीत दाटीवाटीने राहत होते. तेव्हा कृष्णा सावंत नावाचा एक अपटूडेट राहणारा तरुण त्यांचा मित्र झाला होता. तो अधूनमधून त्यांच्या पनवेलमधल्या घरीही जाऊन राहत असे. मदतीला नेहमी तयार अशा दिलदारपणामुळे त्याच्याशी घरोब्याचे संबंधही झाले होता. हा कृष्णा एकदा प्रबोधनकारांसाठी गोव्याचं निमंत्रण घेऊन आला. त्याला आई आजीने लगेच परवानगीही दिली.
तेव्हा मुंबईतल्या गुजराती व्यापार्यांमध्ये गोव्यात जमिनी विकत घेऊन तिथे मँगनीजच्या खाणी खोदण्याची चलती होती. अशाच एका गुजराती व्यापार्यासाठी गोव्यात जमीन विकत घेण्याचं काम कृष्णाला मिळालं होतं आणि तो सोबत म्हणून तरुण प्रबोधनकारांना घेऊन गेला. प्रबोधनकारांनी त्यांच्या आत्मचरित्रात या गोव्याच्या पहिल्या सफरीचं फर्मास वर्णन केलं आहे. बोटीचा प्रवास, पोर्तुगीज सीमेत पोचण्याचे सोपस्कार, तिथल्या कस्टममधली लाचखोरी, इतकंच नाही तर तिथल्या कार्निवलचंही वर्णन प्रबोधनकारांनी केलं आहे. पण तिथे कृष्णाने दारू पिऊन प्रबोधनकारांना वात आणला. त्याला वठणीवर आणून ते एका मदतनीसासह गावोगाव निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत फिरले. पोर्तुगीजांविरोधात सातत्याने सशस्त्र उठाव करणार्या साखळीतल्या राणे राजपरिवाराचा पाहुणचारही त्यांनी अनुभवला. या प्रवासात त्यांना मराठी क्वचितच ऐकायला मिळालं. सगळीकडे फक्त कोकणी आणि पोर्तुगीजच ऐकू आलं, असं त्यांनी नोंदवलं आहे.
प्रबोधनकारांची ही पहिली गोवा भेट एका अर्थाने केवळ पर्यटनच होतं. मात्र त्यानंतर २२ वर्षांनी झालेला गोव्याचा दुसरा दौरा मात्र समाजप्रबोधनासाठी होता. तेव्हा प्रबोधन मासिक गोव्यात चांगलंच लोकप्रिय होतं. दुर्लक्षित पददलित समाजघटकांसाठी प्रबोधन कायम संघर्ष करत असल्यामुळे गोव्यातल्या मराठा गायक समाजातल्या तरुणांना प्रबोधनचं आकर्षण होतं. हा समाज म्हणजे गोव्यात तेव्हा प्रचलित असणारा देवदासींचा समाज. या समाजातल्या महिला देवाधर्माच्या नावावर देहविक्रय करत आणि पुरुष बसून खात. या सगळ्या नैतिक अधःपतनाच्या विरोधात या समाजातल्या तरुणांनी चळवळ सुरू केली होती. १९२५ साली दक्षिण गोव्यातल्या काकोडे गावात मराठा गायक समाज या संस्थेची स्थापना झाल्याचे संदर्भ सापडतात. त्यातल्या काही तरुणांनी पुण्यात येऊन प्रबोधनकारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यांच्यापैकी मोतीराम जांबावलीकर, राजाराम कांत, आनंदराव काकोडकर अशी नावं प्रबोधनमध्ये तसंच माझी जीवनगाथामध्ये येतात. या १५-२० तरुणांनी दक्षिण गोव्यातल्या काकोडे या गावात मराठा गायक समाजाची परिषद घ्यायचं ठरवलं आणि त्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रबोधनकारांना निमंत्रण पाठवलं.
त्यासाठी ३ मे १९२७ ही तारीख ठरली होती आणि साधारण मे महिन्याचा पहिला आठवडाभर प्रबोधनकार गोव्यात होते. ते तेव्हाच्या पूना-बंगलोर मेलने बेळगावला पोचले. डॉ. गोविंदराव कोवाडकर यांच्यासह पाच सहा जण स्वागतासाठी स्टेशनवर आले होते. प्रबोधनकारांचा मुक्काम कोवाडकरांच्या घरीच होता. तिथेच त्यांना गोव्यातल्या परिषदेचे तरुण आयोजक भेटायला आले. पण त्यांचे चेहरे पडलेले होते. त्याचं कारण, गोव्यातल्या पोर्तुगीज सरकारने परिषदेवर बंदी घातली होती. गोव्यातल्या काही उच्चभ्रू आणि सभ्य म्हणवल्या जाणार्या पुढार्यांनी थेट गोव्याच्या पोर्तुगीज गवर्नर जनरलकडे तक्रार केली होती की ही परिषद मराठा गायक समाजाने वेश्याव्यवसायाला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासाठी गोव्यात मोठं आंदोलन करण्यासाठी आयोजित केली आहे. त्यासाठी ठाकरेंसारख्या आक्रमक आणि जहाल चळवळ्याला बोलावलं आहे. त्या तक्रारीवरून गवर्नर जनरलनेच परिषदेवर बंदी घातली होती आणि पोलिसांचा मोठा ताफा काकोड्यात आला होता.
आता कुणालाही असं वाटू शकतं की वेश्याव्यवसायावर बंदी घालण्याची मागणी चुकीची कशी असू शकते? ती संपवण्यासाठी आंदोलन करण्यावर बंदी का घातली जाते? किंवा थेट सरकारची भूमिका वेश्याव्यवसायाला अनुकूल कशी काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला गोव्याच्या आणि त्यातही देवदासी प्रथेच्या इतिहासात डोकवावं लागतं. गोव्यात ज्ञात इतिहासात सुरुवातीपासून देवदासी प्रथेचे संदर्भ सापडतात. गोवा, सिंधुदुर्ग, कारवार इथल्या अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात देवदासी समाजाची घरं किंवा मुळं आजही आहेत. कलावंत, देवळी, भावीण, पेरणी, बांदे, फर्जंद, चेडवा अशा देवळात सेवा देणार्या पोटजातींच्या समूहाला देवदासी असं नाव मिळालं. महाराष्ट्रातल्या मुरळी, जोगतिणींपेक्षा हा समाज अधिक स्थिर होता. तो कधीच भिक्षेकरी नव्हता. या समाजातही स्त्रियांना देवाला वाहण्याचा सेषविधी होता. या समाजातल्या पोटजातींतही खूप उच्चनीच भेदाभेद होते. या समाजातल्या परिवर्तनाचं पुढारपण करणार्या राजाराम पैंगीणकरांनी मी कोण? या आत्मचरित्रात त्याचे विदारक अनुभव सांगितलेत. या भेदभावामुळे धर्माच्या नावाने त्यांचं शोषण सोपं होतं.
गावातले जमीनदार देवदासींना रखेल म्हणून वागवत. प्रामुख्याने गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील जमीनदारांकडे तेव्हा गोव्यातली सर्व सत्ता एकवटली होती. सणा-उत्सवांना देवळात तर लग्नमुंजींच्या निमित्ताने श्रीमंतांच्या घरात कलावंतिणींचं नाचगाणं होत असे. त्यातून सर्रास देहविक्रय होणं स्वाभाविक होतं. त्यांच्यामुळे ख्रिश्चनांचं नैतिक अधःपतन होत असल्याचा ठपका ठेवत चर्चने मोहीम उघडली होती. त्यामुळे गोव्याच्या व्हाईसरॉयने सतराव्या शतकाच्या शेवटी कलावंतिणींना गोव्याबाहेर हाकलवण्याचा हुकूमही काढला होता. नंतर उच्चवर्णीय जमीनदारांनी कार्यक्रमांसाठी गोव्याबाहेरून कलावंतिणी आणण्याची परवानगी मिळवली. पुढच्या शंभर वर्षात या पळवाटेचं मोठं भगदाड झालं.
ब्रिटिश भारतात स्त्रीशोषणाला कायद्याने प्रतिबंध सुरू होत असताना गोव्यात मात्र देवदासींच्या शोषणाला उपयुक्त ठरेल असे बदल कायद्यात केले गेले. देवदासी ही हिंदूंची धार्मिक प्रथा असून त्यात पोर्तुगीज सरकारने त्यात ढवळाढवळ करणं योग्य नाही, असं या जमीनदारांनी पोर्तुगीजांच्या गळी उतरवून शोषणाचा जणू परवानाच मिळवला. त्यानंतर पुढचं एक शतक देवदासी समाजाचा सर्व स्वाभिमान ठेचून काढण्याचा इतिहास आहे. शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक असं सर्व प्रकारचं दमन करून या समाजाचं सत्त्व संपवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. महिलांच्या शोषणावर कुटुंब जगू लागलं. त्यामुळे कुटुंबांचा, समाजाचा नैतिक आत्मविश्वास संपला होता.
अशा वेळेस देवदासी समाजात पुरुषार्थ चळवळीला सुरुवात झाली. महिलांचा सेषविधी होऊ नये, पुरुषांनी कामधंदा करावा आणि मुलांना शिक्षण द्यावं, यासाठीची जागृती सुरू झाली. मराठा गायक समाज या नावाने सर्व पोटजातींमध्ये ऐक्य घडवण्याचा प्रयत्न झाला. नंतर त्याचं नाव नाईक मराठा समाज आणि शेवटी गोमंतक मराठा समाज ठरलं. या आंदोलनात राजाराम पैंगीणकरांसारखे या समाजातले सुधारक होतेच, पण भारतकार गो. पु. हेगडे देसाईंसारखे सारस्वतही होते. महात्मा गांधींनी या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिल्याच्या नोंदी आहेत. गोव्यातल्या काही उच्चवर्णीयांनी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या काही संस्थांनी देवदासी समाजाला मराठा म्हणवून घेण्याला विरोध केला होता. पण स्त्रीला सन्मान देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा या विरोधापेक्षा कितीतरी मोठी ठरली. दिवंगत पत्रकार वामन राधाकृष्ण यांच्या पुरुषार्थ आणि प्रा. पराग परब यांच्या इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रेवोल्यूशन या पुस्तकात या चळवळीचा इतिहास आहे.
शिक्षण आणि संघटनेच्या जोरावर गोमंतक मराठा समाजाने स्वतःचा उत्कर्ष घडवून आणला. कोणत्याही वर्णात स्थान नसलेल्या आणि दलितांपेक्षाही अधिक शोषण होणार्या या समाजाने स्वकर्तृत्वाच्या जोरावर सन्मान मिळवला. त्यात गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर प्रमुख होते. त्याच्या कन्या शशिकलाताई काकोडकर पाठोपाठ दुसर्या मुख्यमंत्री बनल्या. ही मोठीच क्रांती होती. त्यानंतरही या समाजातून काही आमदार सातत्याने निवडून आले आहेत.
सर्वच क्षेत्रात मोठं योगदान असणारी कर्तृत्ववान माणसं या समाजातून उभी राहिलीत. नाईक मराठा समाजाचे संस्थापक सत्यशोधक विद्वान गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, मेजर जनरल विक्रम खानोलकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, कायदेतज्ञ आणि खासदार अधिक शिरोडकर, सुमो ही कार ज्यांच्या नावातील आद्याक्षरांना अर्पण केलीय ते टाटा उद्योगाचे संचालक सुमंत मुळगावकर, शिक्षणमहर्षी रा.ना. वेलिंगकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. व्ही.एन. शिरोडकर, देशातले पहिले पॅथोलॉजिस्ट डॉ. व्ही.आर. खानोलकर, कोकण रेल्वेचे जनक अ.ब. वालावलकर अशी या समाजातल्या मान्यवरांची मोठीच यादी सांगता येईल.
एकोणिसाव्या शतकात गोमंतक मराठा समाजातील अनेक कुटुंब मुंबईत स्थायिक झाली. त्यांनी पुढे संगीत, नाटक आणि सिनेमात मोठं कर्तृत्व गाजवलं. सूरश्री केसरबाई केसकर, गानसरस्वती किशोरीताईआमोणकर, त्यांच्या आई मोगुबाई कुर्डीकर, पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर, अंजनीबाई मालपेकर, मीनाक्षी शिरोडकर, ज्योत्स्ना भोळे, मास्टर विनायक, मास्टर दत्ताराम, भालजी पेंढारकर, कानन कौशल, पद्मिनी कोल्हापुरे, आशालता वाबगावकर, शिल्पा शिरोडकर, किमी काटकर, श्रीधर पार्सेकर अशी या समाजातल्या कलाकारांचीही यादी आहे. हंसा वाडकर यांच्या सांगत्ये ऐका या आत्मचरित्रात आणि त्यावर बनवलेल्या भूमिका या हिंदी सिनेमात या समाजाचा संघर्ष पाहता येतो.

या समाजाचा उल्लेख करताना एक नाव जे टाळून पुढेच जाता येणार नाही, ते आहे दीनानाथ मंगेशकर आणि त्यांची प्रतिभावान मुलं. देवळ्याचा पोर म्हणून गोव्यात दीनानाथांचा खूप अपमान झाला, म्हणून लतादीदींनी गोव्यात कधीच जाहीर कार्यक्रम केला नाही. आशाताई गायल्या त्यादेखील खूप उशिरा. लतादीदींना मंगेशी मंदिराच्या देव्हार्यात जाऊ दिलं नव्हतं, त्याचा वाद काही वर्षांपूर्वी गोव्यात गाजला होता.
पण आता अभिजनांच्या मान्यतेसाठी नव्या पिढीतले तरुण अभिमानास्पद संघर्ष विसरून जायला तयार आहेत. दीर्घकाळ गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख असणार्या प्रा. सुभाष वेलिंगकरांच्या नेतृत्वात या समाजाच्या नव्या पिढीने बहुजनवादाकडून हिंदुत्वाच्या दिशेने प्रवास केलेला आहे. पन्नास वर्षांपूर्वी आरक्षण नको म्हणून ठराव करणार्या या समाजाने आता ओबीसी म्हणून राखीव जागा मिळवण्याची मागणी केलीय.
असो. या समाजाच्या स्थित्यंतराच्या लढ्यात प्रबोधनकारांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं, तरीही दुर्लक्षित असंच आहे. त्यांनी फक्त यासाठी लेखच लिहिले नाहीत. तर प्रत्यक्ष गोव्यात जाऊन या लढ्याला उत्तेजनही दिलं.

