
गोव्यातल्या देवदासी प्रथेविरुद्ध मराठा गायन समाजाच्या एल्गाराची सुरुवातच प्रबोधनकारांच्या नेतृत्वात झाली. देवदासींना वेश्यावृत्तीत ढकलणार्या शेसविधीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनीच पहिल्यांदा गवर्नरकडे निवेदन देऊन केली. त्यानुसार पुढे हा विधी कायद्याने बंद झाला. पण प्रबोधनकारांच्या प्रयत्नांना त्याचं श्रेय कधीच मिळालं नाही.
********
गोव्याच्या दौर्यात प्रबोधनकार शिवचरित्रांवरच्या व्याख्यांनासाठी पणजीला जात असताना वाटेत मडगावला दत्ता पै भेटले. एकमेकांचा पत्राद्वारे संपर्क होता. मडगावच्या सारस्वत समाज मंदिरात व्याख्यान देण्याचा आग्रह त्यांनी केला. पण प्रबोधनकारांच्या पणजीतल्या बैठका पुढे ठरलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी परतीच्या प्रवासात व्याख्यान देण्याचं कबूल केलं. त्यानुसार गजानन भास्कर वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीच्या कार्याची ओळख करून देणारं व्याख्यान दोन दिवसांनी झालं. पणजीहून परतण्यास त्यांना उशीर झाला, तरी दोन तास श्रोते वाट बघत बसले होते. प्रबोधन ज्याला सारस्वत समाज मंदिर म्हणत आहेत ते आताचं मडगावातलं आणि एकूण गोव्यातलंही एक मुख्य सांस्कृतिक केंद्र गोमंत विद्या निकेतन असावं.
पणजीला एका न्हावी समाजाच्या व्यक्तीच्या घरी त्यांच्या उतरण्याची व्यवस्था केली होती, अशी आठवण प्रबोधनकारांनी सांगितली आहे. तेव्हा शहरात गोड्या पाण्याची टंचाई होती. चार आण्याला एक घागर विकत घ्यावी लागायची. भर उन्हात कारने प्रवास करून आलेले असल्यामुळे पाहुण्यांना कार्यक्रमाआधी स्वच्छ आंघोळ करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी आज आपल्याला अज्ञात असलेल्या यजमानांनी मिळेल त्यात किमतीला १०-१२ घागरी विकत घेऊन पाहुण्यांच्या सरबराईत कोणतीही कमतरता पडू दिली नाही. मांडवी नदी आणि सांतइनेज नाल्याच्या किनारी वसलेल्या पणजी शहरात कधी असा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडला होता, हे वाचून आजच्या पणजीकरांना गंमतच वाटेल.
पणजीत रात्री ८ वाजता शिवचरित्रावर व्याख्यान ठरलेलं होतं. आयोजकांनी दिवसभर पत्रिका वाटून त्याची जोरात प्रसिद्धी केली होती. सभेच्या ठिकाणी प्रबोधनकार पोचले तेव्हा खच्चून गर्दी झाली होती. पण त्या गर्दीत हिंदू श्रोत्यांपेक्षा ख्रिश्चन स्त्रीपुरुषांचीच संख्या जास्त होती. प्रबोधनकारांना वाटलं की या ख्रिश्चनांना मराठी समजत नसणार आणि आपल्याला कोकणी येत नाही. आता कसं करायचं? व्याख्यानाच्या सुरुवातीलाच प्रबोधनकारांनी इंग्रजीत विचारलं, भगिनी बांधवहो, शिवरायांचे चरित्र सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मला कोकणी भाषा येत नाही. आपल्याला मराठी भाषा समजते की नाही मला ठाऊक नाही. आपली इच्छा असेल तर मी इंग्रेजीतही व्याख्यान देऊ शकतो. त्यावर पांढर्याशुभ्र भरघोस दाढीमिशीचा एक ख्रिश्चन गृहस्थ उभा राहिला आणि स्वच्छ मराठीत म्हणाला, ठाकरे साहेब, आपण मराठीतच बोला. आम्हांला मराठी चांगले समजते. आम्ही मराठी बुके पण वाचतो.
प्रबोधनकारांचं दोन तास खणखणीत भाषण झालं. शिवरायांच्या चरित्रातल्या पराक्रमाच्या आणि लढायांच्या कहाण्या त्यांनी सांगितल्या. त्यावर श्रोत्यांमधून वरचेवर ब्रॅव्होच्या आरोळ्या उठत होत्या. अशी त्यांची पणजी परिसरातच आणखी तीन व्याख्यानं झाली. त्यानंतर पणजीतल्या मराठा गायक समाजातल्या नेत्यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला. देवदासी पद्धत कायमची संपवायची असेल तर तरुणींना धर्माचा आधार देऊन वेश्याव्यवसायात ढकलणार्या शेसविधीला कायद्याने बंद करण्याची गरज होती. तशी बंदी घालून तो फोजदारी गुन्हा ठरवण्याची विनंती करणारं निवेदन गोव्याच्या गवर्नर जनरलला देण्याचं ठरलं. त्यासाठी प्रबोधनकारांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं. त्यातल्या काही जणांनी प्रयत्न करून गवर्नरची वेळही मिळवली. ७-८ जणांचं शिष्टमंडळ गवर्नरला भेटण्यासाठी निघालं.
विकिपीडियातली भारतातल्या पोर्तुगीज गवर्नरांची यादी तपासली तरी १९२७ साली अकुर्सियो मेंडेस दारोशादिनिस आणि पेद्रो फ्रान्सिस्को मासानो दि अमोरिम् या दोघांपैकी एक गोव्यात गवर्नर जनरल म्हणून खुर्चीवर असावा. शिष्टमंडळातल्या एकाने प्रबोधनकारांचा परिचय गवर्नरला कोकणीतून करून दिला. गवर्नरला कोकणी येत होतं. मुंबईतून आलेला समाजसुधारक असा उल्लेख ऐकून साहेब मोडक्या तोडक्या इंग्रजीत म्हणाला, यू बोम्बाय कम. व्हेरी गुद. तो धागा पकडून प्रबोधनकारांनी इंग्रजीत विनंती केली, सर, मला कोकणी येत नाही. मी इंग्रेजीत बोललो तर चालेल का? त्यावर तो म्हणाला, मला इंग्रजी समजतं, तुम्ही बोला.
प्रबोधनकारांनी शिष्टमंडळ घेऊन येण्याचा हेतू गवर्नरला समजावून सांगितला, गोव्यात रूढ असलेला गलिच्छ असा वेश्या व्यवसाय कायमचा बंद पाडाण्यासाठी शेसविधी कायद्याने गुन्हा ठरवावा, अशी आमची प्रार्थना आहे. त्यावर साहेब म्हणाला, हे रिपुब्लिक आहे. कायदेमंडळाच्या सदस्यांनी विधेयक आणावं. सरकारला कोणतीही हरकत नाही. अशा प्रकारे या शिष्टमंडळाने पहिल्यांदाच शेसविधीविरोधात अधिकृत आवाज उठवलेला दिसतो. आता गवर्नरने दाखवलेल्या पुढच्या रस्त्यावर चालायचं होतं. त्यानुसार शेसविधी प्रतिबंधक विधेयक आणण्यासाठी कायदे मंडळाच्या सदस्यांना भेटण्यासाठी पाच जणांचं मंडळ नेमण्यात आलं. पुढे काही वर्षांनी शेसविधीवर बंदी घालणारा कायदा संमत झाला. त्यामुळे ही विधी थांबली आणि नव्या देवदासी तयार होणं थांबलं. त्यामुळे हळूहळू देवदासी पद्धत गोव्यातून कायमची संपली.
गोव्याहून पुण्याला परत आल्यानंतर प्रबोधनकारांनी प्रबोधनच्या ऑगस्ट १९२७च्या अंकात गोवेकरीण हा सविस्तर लेख लिहून आपली निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यात ते गोव्यातल्या देवदासींसाठी गोवेकरीण हा तेव्हा प्रचलित असणारा शब्द वापरतात. ते लिहितात, वेश्यावृत्ती बरी का वाईट, हा प्रश्न घटकाभर बाजूला ठेवला, तरी वंशपरंपरेने वेश्यावृत्ती चालविणारी अफाट लोकसंख्येची एक ठराविक हिंदू जात गोव्यांत निर्माण झालेली असावी, ही हिंदू समाजाला एक बदनामीची गोष्ट होय. गोमांतक म्हणून मिरविणार्या गोव्यांत बाजलेली ही भयंकर गोम सर्व प्रबुद्ध हिंदू भगिनी बांधवांना दिसत असूनही तिचा अंत करण्याची बुद्धी कोणालाही होऊ नये. एकाही भटभटेतर वृत्तपत्रांत याविषयी लोकमत जागृतीचा निकराचा प्रयत्न होऊ नये. एकाही शुद्धी संघटनवाल्याचे लक्ष या हिंदू भगिनींच्या तनुविक्रयाकडे वळू नये, या गोष्टी मला तरी मनस्संतापकारक अशाच वाटतात. आजपर्यंत अनेक देभ वीरपीर लेक्चरबाजीसाठी गोव्याच्या सफरीवर गेले आणि आले. पण एकालाही हा गोवेकरणीचा प्रश्न कधी सुचला नाही का बोचला नाही. बरोबरच आहे, त्यांची सारी भरारी वरच्या वातावरणांत आणि स्वजातीय भटांचा भातावरणांत!
याच संदर्भात त्यांनी गोव्यातल्या सारस्वत ब्राह्मण समाजावर टीका केली आहे, पुढारीपणाचा आणि संस्कृती श्रेष्ठत्वाचा जन्मसिद्ध मक्ता घेतलेला अफाट सारस्वत ब्राम्हण समाज खुद्द गोव्याभर पसरलेला आहे. गोव्यांतील हिंदू चळवळीचा व वृत्तपत्रांचा मक्ता त्यांच्याच हाती. त्यांनी तरी या प्रश्नाचा काही उठाव करावा? हरी शिवा गोविंदा! ती सुद्धा सगळी इकडच्याच भटी राजकारणाच्या खुराड्यांतली पिलें. गोव्यांतला सारस्वत म्हणजे इकडच्या चित्पावनांचा समगोत्री दादा!… वेश्यासंस्थेच्याउत्पत्तीशी कदाचित नसला तरी अस्तित्वाच्या मर्माच्या पुण्याईशीच गोमांतकस्थ सारस्वत भूदेवांचा बराच नाजूक असा धार्मिक संबंध येत असल्यामुळे गोमांतकी बामणी पत्रांनी या प्रश्नाची चर्चा करणे म्हणजे निष्कारण आपल्या पायावर धोंडा उलथून घेऊन स्वजातियांच्या रोषाला बळी पडण्यासारखे आहे… मराठा गायक समाजाच्या विद्यमान प्रबोधनाला जर आज अडथळा आणि त्रास कोणाकडून विशेष होत असेल, तर तो या मस्तवाल सारस्वत ब्राम्हणांकडूनच, अशा तर्हेंच्या अनेक तक्रारी मला कित्येक खेड्यांतील गायक स्त्री पुरुषांकडून सांगण्यात आल्या.
देवदासी समाजाचा प्रश्न प्रबोधनकारांच्या आधी कुणी आग्रहाने मांडला नसावा, असं या उतार्यांवरून लक्षात येतं. ते या विषयाच्या जागृतीसाठी पोटतिडकीने भूमिका मांडतात, पुरवठ्याच्या इतर सर्व वस्तूंप्रमाणे सर्व समाजांना वेश्या स्त्रियांचा बिनबोभाट अखंड पुरवठा करणारी एक ठराविक जातच्या जात निर्माण व्हावी, अगर कोणी तरी ती निर्माण करून ठेवावी, हा काय पागलपणा आहे?… सनातन वेदोक्त दण्डकाप्रमाणे गोवेकरणीच्या पोटी जन्मणार्या प्रत्येक मुलीने आपला देह सार्वजनिक उपभोगासाठीच उत्पन्न झालेला आहे, असे बिनतक्रार मान्य करून तनूविक्रयाच्या राजरोस धंद्याच्या दुकानांची परंपरा चालवावी, हा प्रकार हिंदू समाजाशिवाय दुसर्या कोणत्याही समाजांत दिसणार नाही.
या गुलामगिरीच्या मागची मानसिकताही ते समजावून सांगतात, वेश्यावृत्तीला धर्माची मान्यता ऊर्फ पोलिशी धाटणीची भिक्षुकी बळजबरी असेल, अशी माझी तरी निदान आजवर कल्पना नव्हती. पण आमचा हिंदुधर्म म्हणजे भिक्षुकी डोंबार्यांचे पातडे! त्यांत हव्या त्या शहाण्याने हवी ती हाडके, लाकडे बिनबोभाट ढकलावी. आणि ती श्रुति स्मृति म्हणून हिंदू गाढवांच्या बाजारात खुशाल विकावी. या प्रघातानुसार गोव्यांतील सारस्वत धर्ममार्तंडांनी शेसविधी नावाचा एक वेदोक्त समारंभ खास गोवेकरणींसाठीच रूढ करून ठेवलेला आहे. त्यांच्या मते गोवेकरीण `धन्यो गृहस्थाश्रमा`ला अनधिकारी असून तिला विवाहाचाही हक्क धर्माने दिलेला नाही. तिला फक्त शेसविधी एवढाच एक मंगल संस्कार! त्रैवर्णिकांच्या उपनयन विधीप्रमाणे या शेसविधीने गोवेकरणीला वेश्यावृत्तीची दीक्षा देण्यात येऊन तिला सारस्वत भिक्षुकांकडून अखंड सौभाग्याची सनद प्राप्त होते.
आपल्या मुलीचा शेसविधी झाला नाही, तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही, हा भ्रम तेव्हाच्या देवदासींमध्ये धर्ममार्तंडांनी निर्माण केल्यामुळे त्यात ही अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या बळावली. त्यात वेश्यावृत्ती हाच आपला धर्म आहे आणि तो तोडणं म्हणजे पाप ही मनोवृत्ती तयार झाली आहे. असं सांगत प्रबोधनकारांनी त्याचे दुष्परिणाम नोंदवले, वेश्यावृत्तीचे जातीवर परिणाम फार घाणेरडे होऊन बसले आहेत. अर्थोत्पादनाचा बोजा स्त्रियांवरच असल्यामुळे मुख्य गोवेकरीण आणि तिच्या पोटच्या मुली यांचे कुटुंबात वर्चस्व फार मोठे असते. तरुणांना अगर पुरुषांना कुटुंब व्यवस्थेत कवडीचीही किंमत नाही. आई बहिणीच्या थाटामाटाची व्यवस्था ठेवावी, आपणहि छानछोकीत रहावें. खाऊन पिऊन मजा करावी. गावभर भटकावे. इतकेच नव्हे तर तरतर! (नमूद करण्यास लाज वाटते) भेटतील त्या गिर्हाईकांना शिफारसपूर्वक आपल्या घरचा पत्ता दाखवावा, असल्या कुत्र्याच्या जिण्यानें पुरुष जगतात. मला वाटते कुत्रीसुद्धा असल्या जिण्यानें खास जगत नाहीत.
हा लेखाचा पहिला हप्ता होता. पुढेही प्रबोधनकार लिहिणार होते. पण या अंकानंतर आणखी एक अंक येऊन प्रबोधन दीर्घ काळासाठी बंद पडलं. त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर त्यांचं पुढचं लिखाण आलं नाही. इतरत्र आलं असेल तर आता उपलब्ध नाही. मात्र प्रबोधनच्या पुढच्याच अंकात वाचकांनी आणि समकालीन वर्तमानपत्रांनी या लेखाचं स्वागत केल्याचे उतारे छापून आले आहेत. त्यापैकी सातार्याचे सदानंद नावाचे वाचक लिहितात, गोवेकरीण ही लेखमाला चांगली उपयुक्त होईल. समाजात असे किती तरी वेडाचार आहेत की, ते पाहून विचारी माणसांना आपण कधी काळी स्वातंत्र्य मिळवू ही गोष्टच खरी वाटत नाही. त्या काळात या प्रश्नाची चर्चा घडवून आणण्यात प्रबोधनकार यशस्वी झाले. शेसविधी कायद्याने रद्द झाल्याच्या संदर्भात प्रबोधनकारांनी आत्मचरित्रात लिहिलंय, हे मी केलेल्या प्रयत्नांत बीजारोपणाला आलेले उत्तम फळ असे मी मानले, तर त्यात काही चूक तर होणार नाही ना? असं मानणं चुकीचं नव्हतंच. पण प्रबोधनकारांचा पुढचा काळ अत्यंत संघर्षाचा आणि धडपडीचा होता. त्यामुळे त्यांनी तोपर्यंत केलेलं सगळंच कार्य बरीच वर्षं दुर्लक्षित राहिलं. हे दुर्लक्ष इतकं होतं की गोमंतक मराठा समाजाच्या चळवळीचा इतिहास लिहितानाही या अत्यंत महत्त्वाच्या कामाची दखल कुणी घेतलेली दिसत नाही.
