ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर अलीकडेच स्वामी गोविंददेव गिरी यांच्या भाषणातील एक विधान प्रचंड वादग्रस्त ठरलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जवळपास आठ विभागांनी एकत्र येत ‘ज्ञानोबा ते तुकोबा राष्ट्रीय परिषद’ आयोजित केलेली होती. या परिषदेत गिरी यांचं बीजभाषण होतं. संतपरंपरेत रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ आहे असं त्यांनी या बीजभाषणात सांगितलं. ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत हे भाष्यग्रंथ तर नामदेवरायांची आणि तुकोबारायांची गाथा हे संकलन ग्रंथ असल्याचं मत मांडलं. ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या नावाने घेतलेल्या राष्ट्रीय परिषदेत दासबोधाचं वेगळेपण आणि मोठेपण सांगण्याचं कोणतंही प्रयोजन नव्हतं. दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून तोच ग्रंथलेखनाचा आदर्श असल्याचं स्वामी म्हणाले. त्यानंतर वारकरी संप्रदाय आणि संतांविषयी आदराची भावना असणार्या लोकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे स्वामींनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. ते निवेदन मूळ भाषणापेक्षाही अधिक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह होतं.
इथे ‘आपली संतपरंपरा’ म्हणजे नेमकी ‘कोणती संतपरंपरा?’ असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील धार्मिक संप्रदायातील आदरणीय व्यक्तींना स्वतंत्र संज्ञा आहेत. महानुभाव पंथात श्रीकृष्ण आणि दत्त या पुराणकालीन अवतारांसह चक्रपाणी महाराज, श्री गोविंदप्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या मध्ययुगीनांना परमेश्वर अवतार मानलं जातं. अन्य सत्पुरुषांना आचार्य अथवा महंत संबोधण्याची परंपरा आहे. रामदासी संप्रदायातही रामदास स्वामींच्या नावाच्या अगोदर ‘समर्थ’ हे विशेषण लावलं जातं. या दोन्ही संप्रदायातील लोक त्यांच्या पंथातील व्यक्तींना संत म्हणत नाहीत. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातच संत ही संज्ञा वापरली जाते. वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय हे स्वतंत्र संप्रदाय आहेत. ढोबळमानाने संतपरंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तर रामदासी संप्रदायाची महंत परंपरा आहे. त्यामुळे ‘आपल्या संतपरंपरेत’ असं म्हणून त्यात रामदास स्वामींचा उल्लेख करण्याची गल्लत गोविंददेवगिरी स्वामींनी केली.
व्यापक अर्थाने त्यांनी रामदास स्वामींना संतपरंपरेचा भाग मानलं तर अनेक अकादमिक अडचणी निर्माण होतात. एकतर ही गोष्ट समर्थ संप्रदायिकांच्या स्वतंत्र अस्तित्वालाच बाधा आणणारी आहे. त्यांची परंपरा वारकरी संतांच्या परंपरेपेक्षा निराळी आहे. स्वतंत्र संप्रदाय असूनही रामदास स्वामींना संतपरंपरेचा भाग मानायचं झाल्यास महाराष्ट्रातील नाथ, महानुभाव, लिंगायत आणि सूफी अशा अनेक परंपरांतील व्यक्तींनाही संतपरंपरेचा भाग म्हणूनच बघावं लागेल याचा स्वामींना विसर पडला. त्यांना संत म्हणण्यात वारकर्यांना अडचण नाही, पण ती स्वामींना असणार हे उघड आहे. आता या सर्व परंपरांमधील मराठी ग्रंथांची इतर संप्रदायातील ग्रंथांहून स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत. महानुभावांचा लीळाचरित्र हा ग्रंथ मराठी गद्य चरित्रलेखनाचा आद्य आदर्श आहे. मध्ययुगीन मराठी भक्तिवाड़मयात गद्य चरित्रग्रंथाच्या लेखनाची परंपरा फक्त महानुभावातच आहे. गोविंददेव गिरींनी एकाही महानुभाव ग्रंथाचा उल्लेख केला नाही.
‘स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोध आहे’ असं म्हणताना गिरींना संत ज्ञानेश्वर माऊलींचा अनुभवामृत आठवला नाही. अनुभवामृत हा प्रकरणं पाडून केलेला स्वतंत्र तत्त्वज्ञानपर ग्रंथ आहे. भाषणानंतर आक्षेप घेण्यात आल्यावर त्यांनी अनावधानाने उल्लेख राहून गेला म्हणून क्षमायाचना केली. तेवढे सोडून त्या विधानावर ते अजूनही ठाम आहेत. अमृतानुभव आणि दासबोध सोडून कोणता स्वतंत्र ग्रंथ आहे, याविषयी ‘विद्वान धर्माचार्यांनी’ मार्गदर्शन करावे, असं आवाहन त्यांनी केलं. गोविंददेवगिरींचे ‘स्वतंत्र ग्रंथ’मान्यतेसाठी दिलेले तथाकथित निकष वापरूनही काही स्वतंत्र ग्रंथ सांगता येतील. त्यात वारकरी संप्रदायातील शेख महंमदबाबांच्या ‘योगसंग्राम’ या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. कदाचित ते जन्माने हिंदू नाहीत म्हणून गोविंददेव गिरींना त्यांचा ग्रंथ त्यांना आठवला नसेल. पण रामदास स्वामींनीच शेख महंमदबाबांची आरती लिहिली होती असा संदर्भ आहे.
गिरींनी दिलगिरी व्यक्त करताना वारकरी संतांविषयी अतीव श्रद्धा असल्याचं सांगितलं आहे. त्यात त्यांनी वारकरी संतांचे हे ग्रंथ ‘वेदतुल्य’ असल्याचं विधान केलं आहे. त्यांनी जसं दासबोधाचं वेगळं वैशिष्ट्य सांगितलं तसं वेदांपेक्षा वेगळं असं वारकरी संतांच्या वाङ्मयाचंही वैशिष्ट्य त्यांना सांगता आलं असतं. वेदाचा अधिकार केवळ उच्चवर्णीय पुरुषांना आहे तर संतग्रंथांचा अधिकार सर्वांना आहे. वेदांची ही कृपणता संतांनी वारंवार मांडली आहे. ‘वेदु संपन्न होय ठाई। परि कृपणू ऐसा आनु नाही। जो लागला तिही। वर्णांच्याची ।।’ असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. त्याउलट ‘न पाहे यातीकुळाचा विचार। भक्त करुणाकार ज्ञानाबाई ।।’ असं ज्ञानोबारांविषयी एकनाथ महाराज म्हणतात. ‘कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर।’ असं नाथबाबा म्हणतात. संतांपाशी जातीपातीचा भेदभाव नाही. त्यांचं वाड़मय सर्वांसाठी खुलं आहे. वेद आणि वेदांतात प्रामुख्याने कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान आहे, तर संतसाहित्यात भक्ती आहे. ‘बोधामाजी बोध। तुका पंचम तो वेद ।।’ अशी उक्ती वारकरी संप्रदायात आहे. चार वेद आणि वेदांत यातही जो बोध आला नाही तो बोध असलेला तुकोबारायांचा गाथा हा पाचवा वेद आहे. पंचमवेद म्हणजे चार वेदांच्या पुढचा असा इथे त्याचा अर्थ अपेक्षित आहे.
वेद परमेश्वराच्या घोरण्यातल्या उच्छ्वासातून निर्माण झाले अशी वैदिक धर्मीयांची धारणा आहे. तोच धागा पकडून ‘तुका म्हणे वेद स्वप्नीचे चेईले। ते काय येईल जागृतीसी ।।’ असा प्रश्न तुकोबांनी विचारला आहे. याउलट गीता ही जागृतावस्थेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे. ‘जया निद्रीताचा घोरु। हा वेदार्थ सागरु। तो स्वंये सर्वेश्वरु। प्रत्यक्ष अनुवादला ।।’ असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे. वेदार्थ हा निद्रिताचा घोरु आहे तर गीता ही प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सांगितली आहे. त्याच गीतेवरचा भाष्यग्रंथ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी साहजिकच वेदांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरतो. त्याचबरोबर संतवाणीही प्रसादाची वाणी आहे. त्यामुळेच तुकोबाराय ‘तुका तरी सहज बोले वाणी। वेदांत वाहे त्याचे पाणी ।।’ असं आत्मविश्वासाने म्हणतात.
गोविंददेव गिरी यांनी हिंदू समाजात दुही माजू नये यासाठी क्षमायाचना करत असल्याचं म्हटलं आहे. हिंदू समाजात दुही निर्माण झाली ती जातिविषमतेमुळे. एका बाजूला त्या जातिविषमतेच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे हिंदू समाजात दुही निर्माण करू नका असं म्हणायचं यात विसंगती आहे. गिरींनी रामदास स्वामींबरोबर आणखी एका संताचंही वेगळेपण त्याच भाषणात सांगितलं. खरंतर भक्तिमार्गी संत अद्वैत वेदांताचा पुरस्कार करत नाहीत. पण, फक्त महाराष्ट्रातील भक्तिमार्गी संतांनी अद्वैत वेदांताचा पुरस्कार केला असं सांगून गिरी यांनी इतरत्र याला अपवाद फक्त गोस्वामी तुलसीदास यांचा असल्याचं त्यांनी सांगितलं. खरंतर वारकरी संतांनी अद्वैत वेदांताचा पुरस्कार केलेला नाही पण तो वेगळा विषय. महाराष्ट्रातील संतांप्रमाणे उर्वरित भारतात फक्त गोस्वामी तुलसीदास आहेत असं सांगताना गिरी यांनी तुलसीदासांचं वेगळेपण (अर्थातच श्रेष्ठत्व) सांगितलं. वास्तविक पाहता उत्तर भारतात अनेक संत आहेत, त्यांचा उल्लेख एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगातही आढळतो. त्यात कबीर, रविदास, धन्ना जाट, दादू पिंजारी, नरसी मेहता, लाख्या कोल्हाटी, मीराबाई, नानक आणि सूरदास असे अनेक संत आहेत. ते समतावादी विचारांचे होते. यात ब्राह्मणापासून ते जाट-कोल्हाटी-चर्मकार-पिंजारी-जुलाहा यांसारख्या अनेक जातीजमातीतून आलेले संत आहेत. यापैकी एकाही संतांचं वेगळेपण नोंदवावं असं गोविंददेव गिरी यांना वाटलं नाही. विशेषतः वारकरी संप्रदायात प्रमुख पाच संतांपैकी एक मानल्या जाणार्या कबीरांच्या बिजक या स्वतंत्र तत्त्वपर ग्रंथाचाही त्यांनी उल्लेख केला नाही. त्यांनी ज्यांचा उल्लेख केला त्या तुलसीदासांचा उल्लेख वारकरी संतांच्या, विशेषतः तुकोबारायांच्या अभंगात कोठेही आढळत नाही. कारण वारकरी संतांची जी वैचारिक जवळीक कबीर-रविदास-दादू-धन्नाजी-मीराबाई-नरसी मेहता-नानक-सूरदास या संतांशी आहे तेवढी तुलसीदासांशी नाही हे उघड आहे. तुलसीदासांनी वर्णाश्रम धर्माचा आणि त्या अनुषंगाने वर्णविषमतेचा पुरस्कार केला, त्यामुळे त्यांची मूळ भूमिकाच वारकरी संतांच्या विचारांशी विसंगत होती. गिरी मात्र वारकरी संतांनी उल्लेख केलेल्या कोणत्याही उत्तर भारतीय संतांचं वेगळेपण न सांगता फक्त तुलसीदासांचं वेगळेपण सांगतात.
हिंदू समाजाची एकता सामाजिक समतेच्या पायावर अधिष्ठित असायला हवी तर ती अधिक मजबूत असेल. पण स्वामींनी वारकरी संतांच्या सामाजिक समतेच्या कार्याविषयी कोणतंही भाष्य केलं नाही. ज्या दासबोधाचा ते ‘स्वतंत्र ग्रंथ’ म्हणून उल्लेख करतात, त्या ग्रंथातच हिंदू समाजातल्या उच्चनीचतेचं समर्थन केलेलं आहे. दासबोधातल्या पाचव्या दशकातल्या पहिल्या समासातील सोळावी ओवी- ‘अंत्यज ज्ञाता बरवा। परि नेऊन काय करावा। ब्राह्मणासन्निध न पुजावा। हे तो न घडे की ।।’ या ओवीचा अर्थ असा की एखादा अंत्यज (म्हणजे दलित) कितीही ज्ञानी असला तरी तो ब्राह्मणाच्या बरोबरीने पुजला जाऊ शकत नाही. दासबोधातल्या पाचव्या दशकातल्या पहिल्या समासातल्या सव्वीसावी ओवी-‘गुरु तो सकळांसी ब्राह्मण । जरी जाहला क्रियाहिन। तरी तयासीच शरण। अनन्यभावे असावे ।।’ या अशा ओव्या स्वतंत्र ग्रंथातल्या असल्या काय किंवा भाष्यग्रंथातल्या असल्या काय, त्याने फरक पडत नाही. स्वामी गोविंददेव गिरी यांना हिंदू समाजाच्या एकतेची गरज वाटत असेल तर त्यांनी आधी वारकरी संतांचा समतेचा विचार प्रमाण मानायला हवा. तो मांडणार्या ग्रंथांची महत्ता आणि वेगळेपण लोकांसमोर मांडायला हवं.
वारकरी संतांच्या वचनांना वारकरी संप्रदायात फारच महत्त्वाचं मानलं जातं. ‘ऐश्वर्याची वचनाक्षरे’ असा त्या अक्षरांचा उल्लेख निळोबाराय करतात. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अशा वक्तव्यांनी संतग्रंथांना कोणतीही न्यूनता येणार नाही याची खात्री आहेच.

