• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गेम करतो गेम!

सुधीर साबळे ( सायबर जाल)

marmik by marmik
March 11, 2026
in घडामोडी, विशेष लेख
0
गेम करतो गेम!

मुलांच्या हातात मोबाइल हे आजचं वास्तव आहे. लहानपणी मुलं रडतात म्हणून किंवा पालकांना थोडी फुरसत हवी म्हणून मोबाइल मुलांच्या हातात दिला जातो आणि त्यांना त्याची सवय लागते. आजकाल शालेय वयापासूनच मित्रमंडळींशी संपर्कापासून शाळेच्या सूचना मिळणं, अभ्यासाचा काही भाग, पालकांचे, मुलांचे व्हॉट्सअप गट यांच्यामुळे मुलांना काही वेळाकरता का होईना मोबाइल देणं हे आवश्यक असतं. अनेक सजग पालक मुलांचा स्क्रीन टाइम, सोशल मीडिया टाइम, त्यांना कशाचा अ‍ॅक्सेस असावा, कशाचा नसावा यावर लक्ष देतात, त्यांच्या मोबाइलचं वेळापत्रक ठरवून अमलात आणतात. पण तेवढी सजगता अनेक पालकांमध्ये नसते. त्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी किती वेळ मोबाईलवर असतो आणि त्यावर तो किंवा ती काय करतात, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. आज हे तंत्रज्ञान इतके बदलले आहे आणि इतक्या वेगाने सतत बदलते आहे की आपले थोडेसे दुर्लक्ष झाले तर त्यातून मुलांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

सायबर चोरटे सतत नव्या सावजांच्या शोधात असतात. अल्पवयीन मुलं हे सावज सहज सोप्या पद्धतीने फसवता येण्यासारखं असतं. त्यासाठी सायबर ठग कोणत्या थराला जातात, हे सांगणारी ही गोष्ट.

श्वेता ही एका नामवंत शाळेतली शिक्षिका. दिवसभर शाळा असल्यामुळे आणि शाळांमध्ये हल्ली शैक्षणिक कामांच्या बरोबरीने अशैक्षणिक कामांचाही बोजा शिक्षकांवर टाकला जात असल्याने तिचा तिच्या अल्पवयीन मुलीबरोबर संध्याकाळीच संवाद व्हायचा. श्वेताची मुलगी अश्विनी ही आठव्या इयत्तेमध्ये शिकत होती. शाळेतून आल्यावर दुपारी एक तासभर क्लास, त्यानंतर एक तास बुद्धिबळाचा वर्ग, त्यानंतर राहिलेल्या वेळ ती स्वतःसाठी देत असे. त्यामध्येच संगणक, मोबाईल या माध्यमातून तिला ऑनलाइन गेम्स खेळण्याचा एक छंद जडला होता. संध्याकाळचा तिचा बराचसा वेळ गेम्स खेळण्यात जात असे.

श्वेताला काही दिवसांपासून अश्विनीचं वागणं बदलल्यासारखं वाटत होतं. ही मुलगी सतत कसल्यातरी चिंतेत असल्यासारखी दिसायची, वेंधळेपणा करायची, कोषात गेल्यासारखी होती, संवाद कमी झाला होता. श्वेता सतत विचारायची, तुला काय झाले आहे, तू अशी का वागतेस? पण त्यावर अश्विनी काहीच बोलत नसे, तात्पुरती वेळ मारून नेत असे. या प्रकारामुळे श्वेता खूपच अस्वस्थ झाली होती, काळजीत पडली होती. अश्विनी कायम ऑनलाइन गेम्स खेळत असते, हे माहिती असल्यामुळे श्वेताने याबाबत मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरवले. डॉ. जोशी या परिचयातल्या मानसोपचार तज्ज्ञांना श्वेताने अश्विनीच्या वर्तनाबद्दल माहिती दिली. डॉ. जोशी यांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना शंका आली, अश्विनी ही सायबर अ‍ॅटॅकची शिकार तर झालेली नाही ना? तुम्ही तिला त्याबाबत विचारले आहे का? त्यावर श्वेतानं अर्थातच नकारार्थी मान हलवली. डॉ. जोशी यांनी ओंकार या त्यांच्या परिचयाच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञाचा फोन करून ही केस त्याच्याकडे सोपवली.

त्यानंतर श्वेताने ओंकारची भेट घेऊन अश्विनीच्या बदललेल्या आणि काळजीत टाकणार्‍या वागणुकीबद्दल त्याला माहिती दिली. ओंकार त्यांच्या घरी आला. त्याने अश्विनीशी गोड बोलत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अश्विनी तुटकपणेच बोलत होती. तिने त्याला सांगितलं की मी ऑनलाइन गेम्स खेळते. तेव्हा ओंकारने याचा शोध घेण्याचे ठरवले.

अश्विनी ज्या गेम्स खेळत होती, त्यांचा शोध घेत असताना ओंकारच्या टीमला समजलं की अश्विनी ‘डार्क सोल्स’ नावाच्या ऑनलाइन शिकारीला बळी पडली होती.

मुळात हा गेम हिंसक. त्यात अनेक आव्हानात्मक खेळी अशा असतात ज्यातून नकारात्मक भावना तयार होणं, गेमचं
अ‍ॅडिक्शन होणं, हे प्रकार घडतात. त्याचबरोबर हा गेम खेळणारी मंडळी एकमेकांशी चॅटिंग करू शकतात. त्यात काही खेळाडू इतर लहान वयाच्या खेळाडूंकडे माहिती मागतात. लहान मुलं विश्वासाने ती माहिती पुरवतात. आपण असं काही करतो आहोत, हे घरातल्यांना सांगायचं नाही, हे त्यांना सांगितलं गेलेलं असतं. त्यातही मुलांना थ्रिल वाटतं. पुरेशी माहिती गोळा झाली की मग हे खेळाडू त्या माहितीचा गैरवापर करून त्रास देऊ लागतात. धमक्या देऊ लागतात. त्यांच्याकडून कोणतेही टास्क करवून घेऊ शकतात. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. अश्विनीच्या बाबतीतही हेच झालेलं होतं. ती तिच्या नकळत अशा एका प्लेयरच्या हातातली बाहुली बनून बसली होती.

ओंकारच्या टीमने या सगळ्या घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करत पोलिसांकडे तक्रार केली. हे तथाकथित खेळाडू जिथे असायचे, तिथे छापा टाकून दोन तरुणांना अटक केली गेली आणि अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारे रॅकेट उद्ध्वस्त केले. डार्क सोल्समुळे आत्मविश्वास आणि भावनिक आरोग्य गमावलेल्या अश्विनीला मानसिक स्वास्थ्य परत मिळवून देण्यात ओंकारची टीम यशस्वी झाली.

अशी घ्या काळजी

  • वैयक्तिक माहितीचे रक्षण करा : सार्वजनिक प्रोफाइलवर किंवा अनोळखी व्यक्तींसोबत तुमचा पत्ता, फोन नंबर, शाळा किंवा कामाचे ठिकाण यासारखे वैयक्तिक तपशील शेअर करणे टाळा. ‘ऑनलाइन अनोळखी व्यक्ती एक धोका आहे.’
  • गोपनीयता सेटिंग्ज : तुमच्या पोस्ट आणि संदेश कोण पाहू श्ाकते हे नियंत्रित करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजबूत गोपनीयता सेटिंग्ज वापरा. या सेटिंग्जचे नियमितपणे पुनरावलोकन करा आणि अपडेट करा.
  • लाल ध्वज ओळखा : चापलुसी, हेराफेरी आणि धमक्या यांसह ऑनलाइन भक्षकांकडून वापरल्या जाणार्‍या डावपेचांची जाणीव ठेवा. जर कोणी तुमच्यावर सुस्पष्ट सामग्री शेअर करण्यासाठी दबाव आणत असेल, तर तो तुमच्यासाठी लाल ध्वज आहे.
    भडक सामग्री शेअर करू नका : भडक फोटो किंवा व्हिडिओ कधीही कोणाशीही शेअर करू नका, जरी तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे असे तुम्हाला वाटत असेल. एकदा शेअर केल्यावर, ती सामग्री कुठे संपेल यावर तुमचे नियंत्रण गमवाल.
  • संशयास्पद क्रियाकलापाची तक्रार करा : जर तुम्हाला एखादा ऑनलाइन शिकारी किंवा सेक्स्टॉर्शनमध्ये गुंतलेला कोणी आढळला, तर त्याची तक्रार योग्य ठिकाणी करा.
Previous Post

‘तुर्क-अर्क’ यांचा लाफ्टरक्लब!

Next Post

मोफत घ्या, मते द्या!

Next Post
मोफत घ्या, मते द्या!

मोफत घ्या, मते द्या!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.