
नर्मदाकिनारी गेलेलो तेव्हाची गोष्ट. तिथल्या महाराजांच्या सांगण्यानुसार, अखंड ॐ नमः शिवायचा जप करत कुमारीपूजनासाठी मी कडाई प्रशाद म्हणजेच कढईतला शिरा बनवला होता. असं म्हणतात की नर्मदा का हर कंकर शंकरही है. त्या भोळ्या शंकराची आठवण मनात ठेऊन, त्याचं नामस्मरण करत मी मोठ्या लोखंडी कढईत साजुक तुपावर रवा भाजायला सुरुवात केली आणि काही वेळाने त्या मधुर घमघमाटाच्या ओढीनं ओंकार तिथे खेचला गेला जणू!! म्हणतो कसा, का रे दादा, अजून तर रवाच भाजतोय तू? वास किती पसरलाय बघ, मला वाटले झालाच असेल शिरा बनवून!! म्हटलं थोडी कळ काढ, पुढे तयार होणार्या मधुर कळसाध्यायाची ही सुवार्ता मिळालीये फक्त तुला! रवा, कणीक, बेसन वा इतरही कोणते पीठ तुपावर भाजायला घेतले की काही वेळाने जो गोडसर आणि खमंग सुवास दरवळतो नं, त्याला खरंच तोडच नसते! हाती घेतलेला पदार्थ बनतच आलाय हा सांगावा वेगळा धाडावाच नाही लागत, ती सुवार्ता त्या गंधातून दरवळतेच, नाही का?
मला अजूनही अलिबागचा श्रावणातील सत्यनारायण आठवतोय. ऊन-पावसाच्या खेळाच्या आणि हिरव्या ओल्या आसमंताच्या पार्श्वभूमीवर केली जाणारी ती वार्षिक पूजा म्हणजे आनंदोत्सव असे! केवळ संकल्प सोडताना आईला पूजेला बसावे लागत असले तरी नंतर नैवेद्याचे बाकी सगळेच करायचेय, म्हणून सकाळी लवकरच प्रसादी शिरा बनवायची तिची सवय होती. तो वेलदोडेमिश्रित मधुर सुगंध असा काही दरवळायचा की फाटक उघडून आत येतानाच भटजीबुवा आणखीनच प्रसन्न होऊन जायचे! तयारी उत्तम दिसतेय हो नेहमीप्रमाणेच, असे म्हणत पूजेची मांडामांड करू लागायचे!!
अर्थात ह्याखेरीजही घराघरांत उपलब्ध साहित्यात पटकन होणारा शिरा अनेकदा व्हायचाच. शालेय उपक्रमांत वा अभ्यासात मिळालेले यश असो, मुलीला आलेला होकार असो, कार्यालयीन पदोन्नती असो वा इतर कोणतेही शुभवर्तमान असो, घरातील ती सुवार्ता त्या भाजल्या जाणार्या रव्याच्या सुगंधाबरोबरच नकळत पसरायची आणि तो आनंद द्विगुणित करायची. लहानश्या चांदीच्या वाटीत, त्या तयार बदामी रंगाच्या शिर्यावर तुळशीचं पान ठेऊन कृतार्थ मनानी तो देवाला अर्पण व्हायचा. कृतज्ञतेने जोडले जाणारे हात नी ओघळलेले आनंदाश्रु ह्यापलीकडे फारशी देवाणघेवाणही गरजेची नसे!! मग आपोआपच काय विशेष, रवा भाजला गेलाय आज, असं विचारणार्या शेजार्यापाजार्यांना त्या आनंदात सहभागी केलं जायचं त्याच शिर्याने त्यांची तोंडं गोड करत!
पुढे येऊ घातलेल्या शुभशकुनाची नांदी देण्याचे काम जसा हा मधुर गंध करतो नं, तसेच डोळसपणे पाहिल्यास अनेक संकेत आपल्यालाही मिळतच असतात की. जिवाची काहिली होत असताना येणार्या वळवाच्या सरीपूर्वीही हवेत अचानक गारवा येतो, वारं सैरावैरा धावू लागतं नी मग ती सुखद सर कोसळते. हे संकेत फार महत्वाचे असतात आणि त्या त्यावेळी कर्त्याचे मनोबलही वाढवतात, नाही का?
स्वामी विवेकानंद जेव्हा सर्वधर्म परिषदेसाठी पहिल्यांदाच अमेरिकेत जायला निघाले तेव्हाची गोष्ट. माताजी श्री सारदादेवींना स्वप्नात दिसलं की स्वामीजींबरोबर ठाकुरही समुद्रावरून चालत जात आहेत. त्याच एका कौलावर विसंबून राहून त्यांनी नरेंद्रला आशीर्वाद दिला आणि केवळ त्या आशीर्वादाच्याच पुंजीवर मी तरून गेलो असे स्वामीजी सांगतात. पुढे अमेरिकेत घडलेला इतिहास तर सर्वश्रुत आहेच. तेव्हा सनातन हिंदुधर्माची विजयपताका जगभरात सर्वप्रथम फडकली ती आजवर डौलाने फडकतेच आहे.
मनातील सकारात्मकताच ह्या संकेतांद्वारे प्रसारित होते आणि कैक पटीने वाढतही जाते. पूर्वी राजेमहाराजे बाहेर निघाले की असे शुभशकुन घडवून आणले जात. आजही सकाळच्या प्रहरी अचानक घडलेलं भारद्वाज पक्षाचं दर्शन मनाला सुखावतंच नं? आपोआप सुखावलेलं आपलं मन मग स्थिरावतं नी हाती घेतलेलं काम तडीस नेतं. ठरावीक व्यक्तीची आठवण वा भेटही हवीहवीशी वाटते ती ह्या सुवार्तेचे दूत म्हणूनच की. कधीतरी स्वतःचा स्वतःवरचाच विश्वास डगमगतो नी मग ही जिवाभावाची मंडळी त्याची आठवण करून देतात… तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, असं म्हणत. हाच विश्वास, हीच सकारात्मकता जाणीवपूर्वक आपणही इतरांना देऊ शकतो आणि ते कायमच दुहेरी लाभदायक ठरते. दिलेली गोष्ट दुपटीनं यथावकाश आपल्याकडे परतून येते ह्यात शंकाच नाही. देवघेव हा तर मनुष्याचा स्थायीभावच नं? मग बाकी सगळ्यांआधी तुम्ही-आम्ही एकमेकांना ही सकारात्मकता देऊन सुवार्तेचे दूत बनूयात की… अगदी त्या खमंग पण मधुर अशा भाजल्या रव्याच्या सुगंधासारखेच!

