• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंध समाधानाचा… गरमागरम पोळीचा…

वैभव भाल्डे (सु-गंध)

marmik by marmik
February 7, 2026
in विशेष लेख
0
गंध समाधानाचा… गरमागरम पोळीचा…

गेल्या आठवड्यात एकदा काही कारणाने आईने पोळ्या केल्या, मी नेमका आजुबाजूलाच होतो आणि तव्यावरच्या पोळीच्या त्या गंधाने तृप्त झालो, मन तर पोटापेक्षाही जास्ती भरलं, पण ह्या आठवड्याच्या लेखनाचा विषयही लगोलग तयार झाला!

रोजच्याच साध्या पोळ्या खरंतर पण किती जादू सामावलेली असते नाही का? मला फार पूर्वी टीव्हीवर लागणारी, तेव्हा नव्यानेच मिळायला लागलेल्या आयत्या कणकेची एक जाहिरात आठवतेय, उत्तर भारतातील समृद्ध व प्रगत शेतकर्‍याचे घर दाखवले होते. त्यांच्या शेतात पिकणारा गहू विकत घेताना हे तयार कणीकवाले एवढी चिकित्सा करतात की जणू सोन्याचीच खरेदी करताहेत, असं तो जेवता जेवता काहीसा त्राग्याने सांगतो. त्यावर बायको हसत हसत उत्तरते की त्याचा फायदा मला तर दिसतोय, नाही तर तुम्ही कुठे एवढ्या पोळ्या खायचात? हा संवाद सुरू असताना ती स्त्री नवर्‍याला गरमागरम पोळ्या वाढत असायची आणि घासागणिक त्याच्या चेहेर्‍यावर समाधान पसरत जायचं!

गव्हाच्या पिठात योग्य प्रमाणात तेल-मीठ व पाणी मिसळून मळलेल्या आणि थोड्या मुरलेल्या कणकेची लाटलेली पोळी घराघरांत रोजच बनते. फुलके असोत वा दुपेडी अथवा चौघडीची पोळी असो, बाहेरच्या खरपूस पापुद्र्यावरचे तपकिरीसर रंगाचे काही डाग, आतला मऊसूत पदर ह्या दोहोंच्यामधून बाहेर पडणारी हाताला चटके देणारी वाफ असं एकूण रुपडं असलेली तव्यावरची ताजी पोळी म्हणजे आपली एक मूलभूत गरजच की. श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव न करणारी, कधी चकचकीत स्वयंपाकघरात तर कधी रस्त्याच्या कडेला मांडलेल्या तीन दगडांच्या चुलीवर बनणारी पोळी, भूक तर सर्वांचीच भागवते, पण समाधानाच्या सुगंधाची कुपी ठरते. नसलेली भूक खवळवणारी व असलेली भूक भागवणारी ही पोळी त्या अवर्णनीय सुगंधाची लयलूट करत जेव्हा तयार होत असते नं, तेव्हा मनाला एक तृप्ती लाभते, समाधान लाभते! भागलेल्या भुकेपेक्षाही हे लाभणारं समाधान काकणभर सरसंच ठरतं, नाही का?

माझ्याकडे काय आणि किती आहे ह्याचा लेखाजोखा मांडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञता नि समाधान बाळगले की आयुष्याचं सोनं होतं. मनातलं ते समाधानच बाकी सकारात्मकतेला नकळत आपल्याकडे खेचून घेतं नि आनंदाच तळं भरून जातं. निरुपयोगी ठरणार्‍या कित्येक गोष्टींपेक्षा वेळेला उपयोगी पडणार्‍या मोजक्याच साधनांचा संचय असणे ह्याचे समाधानही वेगळेच.

इसापनीतीमधली कोंबडा आणि कोल्ह्याची गोष्ट आठवतेय नं? कोल्हा त्या कोंबड्याला शत्रूपासून वाचायचे शंभर मार्ग शिकविण्याच्या बढाया मारत असतो. तेवढ्यातच मोठं जनावर त्या दोघांवर हल्ला करतं, कोंबडा जिवाच्या आकांताने जवळच्या झाडाच्या शेंड्यावर चढतो, तर कोल्हा त्या हल्ल्यात मारला जातो. स्वतःलाच वाचवू शकला नाही त्याच्याकडून नवे शंभर मार्ग शिकण्यापेक्षा मला अवगत असलेला आणि कामी येणारा माझा एकच मार्ग बरा की, असे समाधान मनात बाळगत तो कोंबडा पुढे जातो… अशी काहीशी ती बोधकथा. अनावश्यक साधनांची भाऊगर्दीही घातकच ठरते, तशीच अवास्तव हावही जीवघेणीच ठरते. तुम्ही जेवढं अंतर धावून याल तेवढी जमीन तुमची असं म्हटल्यावर ऊर फाटेस्तोवर धावणार्‍या आणि अखेरीस त्या जमिनीचा कोणताही उपभोग न घेता मृत्यूमुखी पडलेल्या इसमाची कथा सर्वश्रुत आहेच की. आडातच नसलेले पोहोर्‍यात कुठून येणार, ह्या उक्तीनुसार आजुबाजूच्या परिस्थितीत, माणसांत समाधानाचा शोध घेताना वा ते तथायोग्य वाटताना आधी आपलं मन समाधानानी भरलेलं असावं!!

श्री. ठाकूर नेहमी सांगतात की पेला स्वच्छ पाण्यानी भरलेला असेल तर त्यात गढूळ पाण्याला थाराच नसतो, तसं मन एकदा का ह्या सकारात्मकतेनी, समाधानानी भरलेलं असलं की आपोआपच बाकी व्यर्थ नकारात्मकता मनाला शिवतही नाही. दक्षिणेश्वरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणार्‍या माताजी म्हणतात की ठाकुरांच्या सान्निध्यामुळे मन समाधानानी एवढं तुडुंब भरलेलं असायचं की बाकी गोष्टींचा कधी त्रास वाटलाच नाही!! मातांजींच्या मनात तेव्हा भरलेलं ते समाधान आजही त्यांच्याबद्दल चिंतन करताना, त्यांचे उपदेश वाचताना नकळत आपल्याही मनात पाझरतं, नाही का?

आपल्या सहवासात आलेल्यांना खरोखर उपयोगी काही देता येत असेल तर ही सकारात्मक व समाधानी वृत्ती होय. चंदनाच्या सहवासाने आजुबाजूचे वृक्षही जसे सुगंधित होतात तसेच मनातील ह्या सद्भावना नकळत प्रवाही होतात आणि एका ज्योतीने पेटणार्‍या दुसर्‍या ज्योतीप्रमाणे सगळा आसमंत तेजाळतात. तव्यावरच्या पोळीचा तो सुगंध जसा चौफेर पसरतो आणि समाधानाची पखरण करतो तसंच तुमच्या माझ्या अस्तित्वाने जर सकारात्मक समाधानाचे शिंपण झाले तर प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला असे म्हणायला हरकत उरणार नाही… नाही का?

Previous Post

राशीभविष्य (७ ते १३ फेब्रुवारी २०२६)

Next Post

एका कर्मयोग्याची शोकांतिका! नाटक : हिमालयाची सावली

Next Post
एका कर्मयोग्याची शोकांतिका!  नाटक : हिमालयाची सावली

एका कर्मयोग्याची शोकांतिका! नाटक : हिमालयाची सावली

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.