• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंध शुचितेचा… डांबरगोळीचा…

वैभव भाल्डे (सु-गंध)

marmik by marmik
April 2, 2026
in विशेष लेख
0
गंध शुचितेचा… डांबरगोळीचा…

अनुबंधच्या घरातलीच गोष्ट. हव्या असलेल्या वस्तूची शोधाशोध करतांना सगळीकडे एक गोष्ट अगदी नक्की सापडत होती, गोल गुळगुळीत व पांढर्‍या स्वच्छ डांबराच्या गोळ्या! रसायनशास्त्रीयदृष्ट्या त्या कशाच्या बनवलेल्या असतात हा भाग सोडला तरी सर्वसाधारणपणे आपण सगळेच ह्या डांबरगोळ्या कधीतरी, कुठेतरी, वापरतोच, नाही का? कपड्याच्या कपाटात, पलंगाच्या चादरींच्या खणात अगदी घरच्या स्वच्छतागृहांत पण! पूर्वी पिशवीच्या एका बाजूने माहितीचा व नावाचा जाडसर कागद दिसणारी आणि दुसर्‍या बाजूने ह्या गोळ्या दिसणारी पाकीटं मिळायची. दुकानांत तर हे पाकीट मिळतंच, पण मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये व रस्तोरस्तीच्या बाजारांत हमखास! ह्या पांढर्‍या व लहान आकाराच्या गोळ्यांबरोबर रंगीत व सुवासिकही गोळ्या नंतर मिळू लागल्या, प्लॅस्टिकच्या जाळीत लपेटलेल्या! ओडोनिल वगैरे ह्यांचीच जास्त साहेबी भावंडं, नाही का? ह्या सगळ्यांचं मुख्य प्रयोजन असतं ते कोणतेही किडेमुंग्या, वाळवी कसर वगैरेंना आपल्या मूळच्या काहीशा उग्र वासाने रोखणं. जी जागा कमी वापरली जाते किंवा सूर्यप्रकाश हवेचा अभाव असलेली असते तिथे तर ही मंडळी फार कामी येतात. या पांढर्‍या गोळ्यांचा तो ठराविक उग्र वास मला स्वतःला फार आवडतो! सगळी स्वच्छता करावी आणि ती टिकून राहण्यासाठी एखाद-दोन डांबरगोळ्या टाकून एखादा कप्पा किंवा जागा बंद केली म्हणजे कसं परिपूर्ण काम झाल्यासारखं वाटतं, नाही का?
गंधाविषयी लिहायला घेतांना लक्षात नव्हतं आलं खरंतर, पण कित्येक निरनिराळ्या संदर्भात व प्रकारांनी ह्या गंधांनी आपले विश्व व्यापलेय नाही का? आवडीनिवडीच्या पलीकडे हे गंध जेव्हा आपापल्या वैशिष्ट्यांच्या मार्फत काहीतरी संदेश देतात नं, जास्तच दरवळायला लागतात जणू! मूळची स्वच्छता कायम ठेवताना नकोशा जीवजंतूना आपल्या वासाने दूर ठेवणार्‍या डांबरगोळ्या मनोबुद्धीला एक वेगळी युक्ती शिकवताहेत, का हो? वचनामृतात असं सांगितलंय की पेला जर शुद्ध पाण्याने भरलेला असेल तर त्यात अशुद्ध पाणी शिरूच शकत नाही अर्थातच मनात एकदा का ती शुचिता, सकारात्मकता ठासून भरली नं की आपोआपच बाकी नकोशा गोष्टी दूर राहतात, हे नक्की. सारख्याला सारखं खेचतं तसं मुळात जर आपण ह्या सद्गुणांचीच कास धरली तर बाकी नकोशा गोष्टी नकळतच दुरावतात.
एकदा म्हणे एक कोळीण एका माळीणीकडे राहायला गेली. सकाळच्या व्यवसायाची तयारी म्हणून त्या माळीणीने नेहमीसारखीच सगळी वासाबिनवासाची फुलं निवडून त्याचे हार वगैरे बनवून तयार केले. सुखदु:खाच्या चार गोष्टी करत त्या दोघी मैत्रिणी झोपी गेल्या. माळीण तर सवयीने क्षणार्धात झोपली, पण कोळीणीचा डोळा काही लागेना. काय बाई करावं… कसं करावं… नेमकं काय होतंय… हा विचार करतांना तिला एकदम जाणवलं की तिला तो फुलांचा सुगंध सहन होत नाहीये! मग तिने बाहेरून तिची माश्यांची टोपली आणून उशाशी ठेवली आणि त्या वासाने म्हणजे मासे न खाणार्‍यांच्या दृष्टीने खरंतर दुर्गंधाने समाधानी होऊन लगेच झोपू शकली. पुन्हा काही त्या कोळीणीने माळीणीच्या घरचा रस्ता धरला असेल निदान मुक्कामासाठी, असे वाटत नाही!

कोणाला व काय जवळ करायचं, कसली कास धरायची व कशाला अंगीकारायचे हा नीरक्षीरविवेक मूलतः असला तरी परिस्थितीनुरूप अनेकदा गोष्टी भरकटतात, त्यांना पुन्हा योग्य ते वळण देणं, नको त्या प्रलोभनांना दूर सारणं हे ज्याला त्याला आपापलेच करावे लागते हेच खरे! हे सगळं अर्थातच शारीरिक व मानसिक पातळीवर जपणं अत्यावश्यक ठरतं.
विहिरीवर आंघोळ करून झाल्यावर पायाला चिखल लागू नये म्हणून श्याम जेव्हा त्याच्या आईला पदराने पाय पुसून मागतो नं तेव्हा ती माऊली श्यामबरोबर आपल्या सर्वांनाही फार सुंदर व मौलिक सल्ला देते, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसंच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो. . शरीराला लागलेली घाण काढणं तरी सोपं, पण मनाला एकदा का नकोशा गोष्टींच्या सवयी लागल्या नं की त्यातून सुटका जरा अवघडच जाते! भिंतीना किंवा लाकडाला लागलेली कसर किंवा वाळवी जसे सगळे पोखरते तसेच ह्या दुर्गुणांमुळे सत्यानाश होतो सगळा. पण डांबरगोळीकडून वसा घेऊन आधीच ह्या गोष्टींना लांबच ठेवले तर मात्र आयुष्याचे सोने होतेच की.
जी कंपनं आपण पसरवतो त्यानुरूप बाह्यशक्ती आपल्याकडे खेचल्या जातात किंवा आपल्यापासून दूर जातात. लसणीची चटणी खाल्लेल्याच्या तोंडाला भपकारा तर येतोच तो काही लपत नाही; तसाच सकारात्मकतेचा, सद्गुुणांचा घेतलेला घास आणि ध्यासही आपोआप दरवळतो, मूळची शुचिता तर राखली जातेच, पण इतर सुयोग्य गोष्टींचाच शिरकाव आपल्या आयुष्यात घडवतो. त्याचबरोबर नकोशा व नकारात्मक गोष्टींनाही दूर राहायला भाग पाडतो, अगदी त्या डांबरगोळ्यांसारखाच!

Previous Post

दागिने चोराचा चकवा!

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.