• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खाण्याच्या नाना तर्‍हा!

विलास कुमार (खाणार्‍याने खात जावे )

marmik by marmik
February 27, 2026
in खानपान
0
खाण्याच्या नाना तर्‍हा!

जगात जसे विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात तशाच विविध खाण्याच्या पद्धतीसुद्धा आहेत. मनुष्यप्राणी हळूहळू उत्क्रांत होत गेला तसेतशा खाण्याच्या सवयी आणि पद्धती विकसित होत गेल्या. जेवणाची पद्धत मग संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनून गेली. दळणवळणाच्या प्रगतीबरोबरच अनेक संस्कृती एकमेकांत मिसळल्या गेल्या. पदार्थांची देवाण-घेवाण झाली. एकमेकांच्या संस्कृतीचे मिश्रण मग अजूनच वेगळ्या रूपाने समोर आले.

आपल्या देशावर राज्य केलेल्या इंग्रजांनी तर खाण्याच्या बाबतीत बरेच शिष्टाचार म्हणजे ‘एटिकेट्स’ बनवून ठेवलेल्या आहेत आणि त्या पद्धती ते अगदी कटाक्षाने पाळत असतात. आपण सरळ ताटामधील पदार्थ हातात घेऊन खातो. असे खाणे युरोपियन देशांत आरोग्यास हानीकारक समजले जाते. काही वर्षांपूर्वी जर्मनीत तर आपल्या तान्हुल्याला स्वत:च्या हाताने घास भरवणार्‍या एका भारतीय मम्मीला जर्मन पोलिसांनी पकडून नेले होते! आरोप काय? तर अस्वच्छ वातावरणात बालकाचे आरोग्य धोक्यात आणले म्हणून!

ब्रिटिश जेवणाचे हे असे शिष्टाचार अगदी कपडे कोणते घालावेत इथपासून सुरू होतात. साहेबांच्या घरात तसेच हॉटेलमध्ये जेवतानाही ड्रेस कोड पाळायचा असतो. खायचे जे पदार्थ आहेत ते एवी-तेवी पोटातच जाणार म्हणून तुम्ही सदरा-लुंगी घालून जेवायला गेलेले चालणार नाही. तिकडे आपल्याकडच्या देशी साहेबासारखं गंजीफ्रॉ-लेंग्यात येऊन चालत नसतंय. ड्रेस नीट इस्त्री केलेला हवा. कधी बो-टाय चालतो तर कधी कोट कम्पलसरी घालावा लागतो. गबाळ्यासारखे मळके टी शर्ट वगैरे खपवून घेतले जात नाहीत. एवढेच नव्हे तर पायात चप्पलसुद्धा चालत नाही; व्यवस्थित पॉलिश केलेले बूट लागतात. आपल्याकडे उघड्या अंगाने पाटावर बसणे ही जेवण्याची शास्त्रोक्त पद्धत म्हणून ओळखली जाते आणि पायातली चप्पल स्वयंपाकघरात आणली तर तसे करणारा ‘चप्पल खाण्याची’ शक्यता असते. बसण्याच्या पद्धतीसुद्धा अगदी वेगळ्या आहेत. ब्रिटिश घरात जेवणासाठी खास सरळ पाठीची खुर्ची असते. ते टेबलावर सरळ ताठ पाठेने खुर्चीला हलकेच टेक देऊन बसतात. पाय पसरून किंवा खुर्ची हलवत बसणं अशिष्ट मानलं जातं. विविध प्रकारचे चमचे, काटे, सुर्‍या अशी वेगवेगळी हत्यारे, ज्यांना ‘कटलरी’ असे संबोधतात त्याने ‘डायनिंग टेबल’ भरलेला असतो. प्रत्यक्ष खात असता ही वेगवेगळ्या प्रकाराची आयुधे कोणत्या हातात पकडायची ह्याचेसुद्धा शास्त्र असते. काटा, सुरी आणि चमचा कोणत्या वेळी व कोणता पदार्थ खाताना काय आणि कसे वापरायचे त्याचे नियम आहेत.

कटलरी वापरण्याची पद्धतसुद्धा नियमबद्ध केलेली असते. डाव्या हातात काटा (फोर्क) आणि उजव्या हातात सुरी (नाइफ) धरतात. सुरीचा उपयोग फक्त मऊ पदार्थ कापण्यासाठी करतात. काट्याने अन्न उचलून खातात. अन्न कापण्याचीही रीत असते. ‘धरली सुरी की खुपस कुठेही’ असे करायचे नसते. एकावेळी थोडंच अन्न कापतात. सगळं अन्न एकदम कापून ठेवत नाहीत. ताटात शिगोशीग भरून पदार्थ घेणे हे सुद्धा ‘चीप’ समजले जाते. भारतीय लोक कोणतीही गोष्ट करताना आवाज केल्याशिवाय ती गोष्ट एन्जॉय करत नाहीत. त्याला खाणे कसे अपवाद असणार? जेवताना खो-खो हसून बाकीच्यांना ठसका लागला तरी कोणाला काहीसुद्धा वाटत नाही. साहेब मात्र अन्न चोरून आणल्यासारखा गप्प मान खाली घालून खातो. खाताना बिलकुल आवाज करत नाही. बोलण्या-हसण्या-खिदळण्याचा तर दूर, चावतानाचा तोंडाचा होणारा मचक-मचक आवाज, चमचा वाजवणे, सूप शोषून पिणे हे अयोग्य मानले जाते. तोंड बंद ठेवून घास चावला जातो.

जेवणासाठी टेबल असल्यामुळे टेबल मॅनर्सही आलेत. खाताना आपल्या हाताचे कोपर टेबलावर टेकवत नाहीत. टेबलवर हात ठेवताना सौम्य पद्धतीने ठेवतात. मोबाईल वापरणे टाळतातच, पण तो टेबलवर ताटाच्या बाजूला टेबलवर ठेवणेही सहन करत नाहीत. खाताना बोलण्याची शिस्त पाळली जाते. तोंडात अन्न असताना बोलत नाहीत. समोरच्यांचं बोलणं शांतपणे ऐकतात. बोलायचेच असेल तर हळू आवाजात बोलले जाते. जेवण सुरू करण्यापूर्वी नॅपकिन मांडीवर ठेवतात. हा नॅपकिन तोंड पुसण्यासाठी वापरतात, ताट पुसण्यासाठी नाही! आपल्याकडे ताटात हात धुऊन मोठ्याने ढेकर देणे हे आपले जेवण संपल्याचा जाहीरनामा असतो. जेवताना नाक शिंकरलेले एक वेळ चालू शकेल, पण ढेकर देणे हे महापाप असते. आपले जेवण संपल्याचा संकेत ते लोक काटा व सुरी प्लेटवर घड्याळाचे काटे ११ वाजून ५ मिनिटांवर असतात, तशा स्थितीत ठेवतात. याचा अर्थ : ‘माझे जेवण संपलं आहे.’ ऊठ-सूट काहीही केल्यावर धन्यवाद देण्याची खोड असल्यामुळे जेवणानंतरही ‘थँक यू’ म्हणणे आवश्यक मानले जाते! पाहुणे यजमानांच्या ‘कुक’चे कौतुकसुद्धा करतात. आपण भारतीय जेवून झाल्यावर आभार व्यक्त करणे ऑप्शनला टाकतो. ‘आम्ही जेवलो हे उपकार समजा’ असा भाव आपल्याकडच्या पाहुण्यांच्या मुखकमलावर असतो. पान खाऊन ह्या उपकाराच्या ओझ्याची पिंक यजमानाच्या ‘पिकदाणीत’ टाकली की पाहुणे घरी जायला मोकळे!

चिनी लोक तर वुलनचे स्वेटर बनवण्यासाठी वापरतात तशा सुयांसारख्या दिसणार्‍या ‘चॉपस्टिक नावाच्या काड्या खाण्यासाठी वापरतात. आपल्याला तर त्या वापरणे दूर, नुसत्या हातातही धरता यायच्या नाहीत! आणि हे मिचमिच्या डोळ्यांचे चिनी ह्या काड्या वापरून चक्क भात खात असतात. सूपसाठी मात्र चमचा वापरतात. ह्यांच्याकडे ताट सहसा वापरतच नाहीत. छोटेछोटे वाडगे-ज्यात हातात येईल त्या प्राण्याचे सूप बनवून ओरपणे हे चिन्यांचे आवडते खाद्य ! तिकडे अरब लोक एकाच भल्या मोठ्या परातीमध्ये अख्ख्या उंटाची ‘तंदुरी’ बाजूला कोंडाळे करून खाताना दिसतात. एकत्र खाल्ल्यामुळे परस्पर संबंध घट्ट होतात असे त्यांच्यात मानले जाते. पूर्वी लोक प्राण्यांची शिकार करून असेच मिळून खात असत.

आपला देश विविधतेने नटलेला वगैरे असल्यामुळे आपल्या प्रत्येक राज्यात एक नाही तर अनेक खाण्याच्या पद्धती आहेत. साऊथ इंडियन जमातीची खाण्याची वेगळीच तर्‍हा असते. त्यांचे मुख्य अन्न म्हणजे भात आणि दुय्यम अन्न म्हणजे तांदळापासून बनवलेले विविध पदार्थ! ‘सांबार’ म्हणजे आपल्या वरणाचा दक्षिणी अवतार आणि ‘रस्सम’ म्हणजे आंबट-तिखट पाणी. जोडीला रुची-पालट म्हणून दही! ताटात किंवा केळीच्या पानात भाताचा डोंगर घ्यायचा, लुंगी गुडघ्यापर्यंत वर घेऊन कमरेत खोचायची, वर दिलेले पातळ पदार्थ योग्य प्रमाणात भातात एकत्र करायचे, त्या मिश्रणाचे गोळे तळहाताने मनगटापर्यंत खेळवत फुटभर अंतरावरूनच (स्वत:च्या) तोंडात फेकायचे आणि दोन वेळा तोंडात घोळवून गप्पकण गिळायचे! ह्या खेळाला ते लोक जेवण करणे समजतात! महाराष्ट्रीय लोकांना ते अगदीच ओंगळवाणे वाटू शकते. मला आठवते, आमच्या लहानपणी आम्ही मुले जेवताना आई हातात लाकडी फुटपट्टी घेऊन बसायची. उजव्या हातानेच जेवायचे असा तिचा आग्रह असायचा. डाव्या हाताने खायला लागल्यावर जोरात फटका बसायचा. मी तर डावा हात पाठीमागेच घेऊन बसायचो. एका हातानेच चपाती तोडायची आणि भाजीसोबत खायची. खाताना बोटे समोरच्या दोन पेरांपुरतीच उष्टी झाली पाहिजेत- त्यापेक्षा जास्त हात खरकटा होऊ नये असा दंडक असायचा. जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुऊनच ताटावर बसायची परवानगी असे. लग्नात किंवा तशाच समारंभात जेवणे पत्रावळीवर होत. पत्रावळीच्या भोवती पाणी हातावर घेऊन फिरवायची रीत होती. जमिनीवरील कीडा-मुंगी आत येऊ नये म्हणून असे करतात, असे त्या मागचे कारण होते. पत्रावळ पुसून ‘रेडी पझेशन’ मधे मांडी घालून बसलेल्या पंगतधारी मंडळीना प्रत्येक पदार्थ वाढण्यासाठी एक वाढपी नेमलेला असे. सर्वप्रथम चपाती किंवा पुरीवाला यायचा. नंतर भाजीवाला, त्यानंतर लोणचेवाला, पापडवाला आपला आपला पदार्थ पानात टाकत जायचा. नंतर भात, वरण नंतर आणि शेवटी गोड पदार्थ घेऊन येणारा असायचा. अशा पंगतीत खाताना साध्या पदार्थांनाही वेगळीच खुमारी यायची.

आता ‘बुफे’ नावाचा नवीन पाश्चिमात्य खाण्याची पद्धत असलेला प्रकार आपल्या देशात फोफावत आहे. विदेशी ते सर्व चांगले, अशी भारतीय लोकांची का कोण जाणे, समजूत असते. त्यानुसार हा जनावरासारखा उभे राहून खाण्याचा प्रघात आपण आत्मसात केलेला आहे. एका हातात प्लेट तोलून धरायची कसरत करत इकडे तिकडे फिरत दुसर्‍या हाताने खायचे! हाताला, पायाला आणि तोंडाला एकाच वेळी त्रास देत खायचे! नव-संस्कृती जन्मास घालताना तेवढा त्रास तर सोसावा लागणारच ना?
कुणाची खाण्याची पद्धत चांगली आणि कुणाची वाईट ह्याचे विश्लेषण करण्याचा हेतू नाही. ज्याला जी पद्धत चांगली वाटते ती त्याने अवलंबवावी. प्रवासात किंवा स्थायिक होण्याच्या उद्देशाने जेव्हा परदेशात जाऊ तेव्हा त्या स्थानिक परंपरेनुसार तेथील रूढ पद्धत वापरणे चांगले. सुरुवातीला थोडे अवघड जाईल, पण नंतर अंगवळणी पडेल. आपली पद्धतच श्रेष्ठ आणि दुसर्‍याची कनिष्ठ असा भेदभाव करू नये. कारण, कोणतीही पद्धत वापरली तरी मूळ उद्देश तोच…‘उदर-भरण’!

 

Previous Post

भाषेचे गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी धोकादायक

Next Post

डेट

Next Post
डेट

डेट

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.