चि.ओमच्या मौंजीला एक आठवडा झाला, पण काही ना काही कारणाने त्यासंदर्भातील नानाविध गोष्टी नकळत मनात रुंजी घालतच आहेत. राहत्या घरी हा संस्कारसोहळा करायचा ह्यावर गुरुजींबरोबर आम्हीही कायम ठाम होतो आणि त्याच अनुषंगाने तयारी करत गेलो. ह्यामागे हेतू हाच की त्या मंत्रोच्चारांची सकारात्मक स्पंदनं ऐकून ही वास्तूही पावन व्हावी. बाकी जय्यत तयारी आधीच झाली असली तरी वेळेवरची लहान सहान वाटणारीही बरीच कामं होतीच. अर्थात नेहमीप्रमाणेच मदतीचे हात न मागताच पुढे येत गेले आणि कार्य यथासांग पार पडलं.
आदल्या दिवशी सकाळपासून एकेकाचे येणे सुरू झाले नी संध्याकाळी घराला उत्सवी रूप प्राप्त झाले. गप्पागोष्टी-खानपान तर सुरू होतच पण काहीतरी कमतरता जाणवत होती. यादीतील कामं वाचता वाचता ओंकार म्हणाला, ‘दादा, अजून फुलांची सजावट करणारे नाही आलेत’. मी बाकीच्या गडबडीत खरंतर विसरलोच होतो! काही वेळाने ती मंडळी पोहोचलीच.
पाचसात जणांची टोळी, खांद्यांवर दोन-तीन पोती भरून फुलापानांच्या तयार माळा घेऊन आलेली. झेंडू, शेवंती, अॅस्टर आणि अशोकाच्या पानांच्या माळांबरोबरच शुभ्र निशिगंधांचे घोसही डोकावत होते. कुठे आणि काय लावायचे हे ठरवलेले असल्याने पटापट काम सुरू झाले. आम्ही सगळेच नकळत वास्तूच्या त्या कायापालटाचे साक्षीदार ठरलो. एक एक करता करता सगळ्या माळा, तोरणं बांधून झाली नी शब्दशः मांगल्याचं, चैतन्याचं अस्तित्व जाणवायला लागलं!
ह्याचसाठी तर केला होता हा खर्या फुलांचा अट्टहास! कृत्रिम सजावट स्वस्त तर होतीच, पण कायमस्वरूपी राहिली असती, मात्र त्या वाटेला न जाता मर्यादित वेळेसाठीच पण खर्या फुलांनी केलेले हे चैतन्यशिंपण मनोमन सुखावून गेले! घरादारावर एका तजेलदार, सकारात्मक सुगंधाची पखरण तर झालीच पण तीच अवस्था मनांचीही झाली जणू! आतापर्यंत नुसतीच असलेली मंडळी आता आपोआप मौंजीची वर्हाडी मंडळी शोभू लागली, त्या पुष्पमालांच्या चैतन्यदायी पार्श्वभूमीमुळे! घराला मांगल्याचा साज चढला नी नकळत मनात सनईचे सुर निनादू लागले. मौंजीच्या दिवशी सकाळी तर वातावरणातील आनंदलहरी द्विगुणित झाल्या. पुढचा एक दिवस सांभाळलेल्या त्या पुष्पमाला तिसर्या दिवशी मात्र काढण्याशिवाय पर्याय नव्हता. वाळता वाळता गळणार्या पाकळ्या आणि त्याभोवतीचा डासाचिलटांचा वावर काही हवासा नव्हता! बघता बघता निर्माल्याचा ढीग जमला नी पुन्हा घर मूळपदावर आले तरी त्या दोन दिवसांत त्या माळांनी केलेली किमया कायमच आठवणीत राहील आणि आठवणींतलेही ते मांगल्य नकळतच मनांना नवचैतन्य देईल!
‘कितीपेक्षा कसे?’ हा आयुष्याचा लेखाजोखा आपल्या कृतीतून सहज सांगून गेल्या त्या पुष्पमाला! उण्यापुर्या ३-४ दिवसांच्या आयुष्यात कसे ते प्रत्येक फूल अन् फूल भरभरून जगले आणि स्वतःच्या केवळ अस्तित्वाने वातावरण बदलवून गेले! मनाला विचारांचं खाद्य नकळत पुरवून गेली ही सजावट! जीवाची काहिली होत असतांना क्षणभर आलेली वार्याची झुळूक, सतत घोंघावणार्या वार्यापेक्षा वैâकपटीने सुखदायी असते, नंतरच्या शिडकाव्यापेक्षाही अत्तरकुपीचे झाकण उघडले की पसरणारा सुगंध निव्वळ अप्रतिम ठरतो, नाही का पोट कितीही भरले असले तरी गोडाचा एकच घास मनाला सुखावतो नं मंडळी? मग आपल्या अस्तित्वाचे काय हो?
कोवळ्या वयात संजीवन समाधी घेणारी ज्ञानेश्वर माऊली असो वा जेमतेम चाळीशीत जीवनकार्य संपवून निजधामी गेलेले स्वामी विवेकानंद असोत, अशी काही पोतडी मागे ठेवून गेलेत की पिढ्यानपिढ्या समृद्ध होताहेत. त्यांचे अस्तित्व जसे देहात सीमित नव्हते किंवा सीमित नाही राहिले, जे त्यांच्या कार्यातून, शिकवणींतून कायमच प्रवाही राहणार आहे. तसेच आपणही यथाशक्ती यथामती सकारात्मकताच मागे राहील ह्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रत्येक जीवच जर अव्यक्त ब्रम्ह असतो तर प्रत्येकातच ते चैतन्य विसावलेलं आहेच! त्याला योग्य दिशा च मार्ग देण्याचं काम मात्र ह्या देहाद्वारे घडतं, घडायला हवं! एकदा का तो मुख्य हेतू समजला की त्यासाठी लागणारी धडपड क्रमप्राप्तच ठरते आणि ती सुसह्यही होते, ह्यात दुमत नसावे!
हाती असलेली विविध साधनं कितीपेक्षा प्रभावीपणे कशी वापरली जातात ह्यावरच यशाची व्याख्या अवलंबून असते. परोपकारी, लोकोपयोगी व सर्वसमावेशक वृत्ती घडवली की आपोआपच आपली संपत्ती, वेळ, हुषारी, करुणा, स्नेह अशा वैâक सकारात्मक साधनांचा वापर करून इतरांबरोबर आपापलीही आयुष्ये गंधाळता येतात हे निश्चित. वाळलेल्या फुलांच्या आठवणींचा गंधही जसा चैतन्यदायी ठरतो तसेच आपल्याला लाभलेले आयुष्य आपण सकारात्मकतेचा सौरभ शिंपण्यात वेचले तर स्मृतिगंधही मनामनांत दरवळेल व आनंदाबरोबरच प्रेरणादायीही ठरेल, नाही का?

