• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कोणी तिऱ्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के!

योगेंद्र ठाकूर (बेधडक)

marmik by marmik
February 13, 2026
in बेधडक
0
कोणी तिऱ्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के!

नुकत्याच पार पाडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांची महायुती तसेच मूळ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) यांची आघाडी हे बर्‍याच महानगरपालिकांत एकमेकांविरुद्ध लढले. काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रपणे भाजपाविरुद्ध लढले, तर काही ठिकाणी भाजपा विरुद्ध शिंदेसेना अशी लढत झाली. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस वंचितला सोबत घेऊन लढली, तर मुंबईसह ठाणे, डोंबिवली-कल्याण, नाशिक महानगरपालिकेत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे लढली. त्याआधी झालेल्या २८२ नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीतही महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. थोड्याफार प्रमाणात महाविकास आघाडीतही हेच झाले. स्थानिक आघाड्या तर पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झाल्या. निकालानंतर सत्तास्थापनेसाठी पक्षीय विचारसरणी, निष्ठा बाजूला ठेऊन एकमेकांविरुद्ध लढलेल्या पक्षांनी एकत्रित येऊन ‘विकासा’च्या नावाखाली स्थानिक आघाड्या स्थापन केल्या आहेत. ही पक्षीय सरमिसळ यापूर्वी महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाली नव्हती. उमेदवारांचे एबीफॉर्म पळवणे, उमेदवारांना दमदाटी देऊन अर्ज मागे घेण्यास लावणे मग बिनविरोध निवडून येणे याचे जास्त प्रमाण या खेपेस पाहावयास मिळाले. हे कमी की काय म्हणून निवडून आल्यानंतर नगरसेवकांना पळवणे, आमिष दाखवून नगरसेवकांचा गटचा गट सत्ताधारी पक्षात घेणे असले प्रकारही वाढीस लागले आहेत. यात विरोधी पक्षाचा काही अपवाद सोडला तर बहुतेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षाने हे खेळ सर्रासपणे केले आहे. निवडून एका पक्षातर्फे यायचे आणि सत्तेसाठी दुसर्‍या पक्षात जायचे. एकमेकांविरुद्ध निवडणुकीपूर्वी लढल्यानंतर सत्तेसाठी स्वार्थी नगरसेवक एकत्रित येतात. यात कुठलाही पक्ष अपवाद नाही. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो किंवा शत्रू नसतो हे खरे. पण राजकारणी जेव्हा सरड्यालाही लाजवेल अशा गतीने मैत्री आणि शत्रूचे रंग बदलतात. तेव्हा आपसुकच म्हणावेसे वाटते की सब घोडे बारा टक्के!
या नगरपालिका निवडणुकीत सत्ता आणि पैशाचा महापूर आणून तसेच निवडणूक आयोगाच्या सहाय्याने भाजपने राज्यात सर्वात जास्त नगरपालिकांत विजय मिळवला तरी अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांच्या निवडीसाठी एमआयएम या पक्षाशी आघाडी केली. या एमआयएमला भाजपचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते दररोज शिव्या घालतात. त्यांना पाकिस्तानधार्जिणे आणि देशद्रोही म्हणण्याची भाजपनेत्यामध्ये अहमहमिका सुरू असते. काही भाजप नेते तर त्यांच्याविरुद्ध रोज बेंबीच्या देठापासून बांग देतात. त्याच एमआयएमच्या गळ्यात गळा घालून भाजपने शहर विकास मंच आघाडीची स्थापना केली. भाजपच्या या ढोंगीपणावर टीका झाल्यावर एमआयएम प्रमुख खा. असरुद्दीन ओवैसी यांनी आघाडी तोडण्याचे आदेश त्यांच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना दिले. भाजपने फक्त देखाव्यासाठी काही जणांना नोटीस दिल्या. पण आघाडी तोडली नाही. त्यामुळे आजही भाजप-एमआयएमची युती अस्तित्वात आहे. अकोटसारख्या एका छोट्या नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केलेली ही अभद्र युती पाहता भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, याची आपल्याला कल्पना येते. शतप्रतिशत म्हणणार्‍या भाजपाने वैचारिक व्यभिचार केला आहे.
बदलापूर नगरपालिकेत सत्ता मिळवल्यानंतर भाजपने शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केली. आपटे जेलमध्ये असायला हवा होता. भाजपने त्याला नगरपालिकेच्या सभागृहात नेऊन बसवले. नंतर जनतेचा संताप पाहून नियुक्ती रद्द केली. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने काँग्रेस पक्षाच्या एका स्थानिक नेत्यावर दबाव आणून त्याला फोडून काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आघाडीची स्थापना केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधितांना निलंबित केले. पण भाजपाने त्या १२ नगसरेवकांवर यंत्रणेमार्फत दबाव आणून त्यांना पक्षात घेतले आणि पावन केले.

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अचलपूर नगर परिषदेत सभापती आणि उपसभापतिपदांच्या निवडणुकीत भाजपने ‘एमआयएम’चा समावेश असलेल्या गटासोबत युती केली आहे. यापूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत भाजप-एमआयएम युतीच्या प्रयोग झाला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमआयएम’सोबत युती नकोच असे स्पष्ट करीत कारवाईचा इशारा दिला होता. यानंतरही अचलपुरात ‘एमआयएम’ असलेल्या गटाशी संधान साधत भाजपने सत्तासमीकरण बदलले. नगर परिषदेतील ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक कल्लू महाराज दीक्षित यांनी १० अपक्षांचा स्वतंत्र गट स्थापन करत त्यात एमआयएम’चे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य सहभागी करून घेतले. त्यामुळे या गटाची संख्या थेट १५वर पोहोचली. विषय समित्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी या गटाला आणखी सात सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता. भाजपने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आणि अशा तर्‍हेने ‘एमआयएम’चा समावेश असलेल्या गटासोबत भाजपने मागच्या दाराने युती केली.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत शिंदेसेना आणि काँग्रेस ह्या विरोधकांनी हातमिळवणी केली आहे. निवडणुकीपूर्वी ते एकमेकांविरुद्ध लढले होते. या दोन्ही पक्षांकडून एकत्रित गट स्थापन केला आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत मूळ शिवसेना काँग्रेसबरोबर गेली असा सतत आरोप करणार्‍या शिंदेसेनेने काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सभागृहात एकत्रित बसण्याचा निर्णय घेतला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपाचे ७८ तर काँग्रेसचे १३ आणि शिंदेसेनेचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाबरोबर शिंदेसेना सत्तेतील वाटेकरी आहे. तरी शिंदेसेना इथे भाजपाच्या विरोधात गेली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत माढामध्ये (सोलापूर) दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी यांची स्थानिक आघाडी आहे. सत्तेच्या गणितासाठी मित्र बदलणे, सोयीप्रमाणे शत्रू ठरवणे आणि जनतेच्या बुद्धिमत्तेला गृहीत धरून राजकारण करणे, हीच भाजपची कार्यपद्धती असल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक मूळ शिवसेना आणि मनसेनेने एकत्रितपणे लढवली. मूळ शिवसेनेचे ११ तर मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले. तर भाजपा आणि शिंदेसेना यांनी महायुतीतून निवडणूक लढवली. पण निवडून आल्यानंतर दोन्ही पक्षांत सत्ता काबीज करण्यासाठी अहमहमिका सुरू झाली. भाजपा-शिंदेसेनेविरुद्ध लढलेल्या मनसेने अचानकपणे शिंदेसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्रात उलट-सुलट चर्चांना उधाण आले. शिंदेसेनेला पाठिंबा दिला नसता तर मनसेचे पाचही नगरसेवक शिंदेसेनेत गेले असते म्हणून हा निर्णय घेतला असे या कृतीचे समर्थन मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना केले. तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे ‘लवचिक राजकारणा’चा पवित्रा जाहीर केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सत्पात्री मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. ते म्हणतात सत्पात्री मतदान नाही केले तर ‘दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार । सर्व गावास करतील जर्जर ।’ पण आज मतदारांनी सत्पात्री मतदान केल्यानंतर निवडून आलेले आमदार, नगरसेवक कोलांट्या उड्या मारताना दिसत आहेत. मतदारांनी फसवणूक होत आहे, झाली आहे. त्यामुळे लोकशाही जर्जर झाली आहे.

ढोंगीपणा हा भाजपाचा स्थायीभाव झाला आहे. भाजपला अजित पवार चालले पण नवाब मलिक चालत नाहीत. मुंबईत एकनाथ शिंदे चालतात, पण पुण्यात, संभाजी नगरमध्ये चालत नाहीत. जिथे सत्ता मिळते तिथे सगळे पवित्र आणि जिथे सत्ता अडचणीत येते तिथे सगळे भ्रष्ट, हाच सत्तेचा विकार जडलेल्या भाजपचा नवा विचार आहे.
काँग्रेसच्या राज्यात आयाराम-गयाराम संस्कृती पाहावयास मिळाली. पण गेल्या दहा वर्षात दलबदलू राजकारण्यांची विकृती पाहावयास मिळते आहे. साधनुशुचितेच्या गप्पा मारणारे, नीतीमत्ताचे ढोल बजावणारे सत्तेत आल्यापासून भाजपला विरोधी पक्ष फोडण्याचा चेव आला आहे. त्यामुळे दलबदलूंचे पेव फुटले आहे. आपल्या फायद्यासाठी कुठला राजकारणी, कुठला पक्ष केव्हा कुणाबरोबर जाईल हे भल्या-भल्या राजकीय पंडितांना देखील सांगता येत नाही. याला कुणीही अपवाद नाही, म्हणूनच कविश्रेष्ठ विं. दा. करंदीकर म्हणतात तेच खरे आहे.

‘इकडे सत्ता तिकडे पोळी,
जिकडे सत्य तिकडे गोळी,
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता,
पुन्हा पुन्हा हाच कित्ता,
पुन्हा पुन्हा जुनाच वार,
मंद घोडा जुना स्वार,
याच्या लत्ता त्याचे बुक्के,
सब घोडे बारा टक्के।

आजच्या फोडाफोडीच्या राजकारणाची मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिसारी आली आहे. पण हे सारे विकासाच्या नावाखाली होत आहे असे दलबदलूंचे म्हणणे आहे. नुकताच हिंदुस्थानचा प्रजासत्ताकदिन साजरा झाला. देशात लोकशाही मजबूत झाली आहे का, हा प्रश्न सामान्यांना पडतो. कारण म्हणायला लोकशाही जिवंत आहे पण दिवसागणिक आपली लोकशाही जर्जर होत आहे!

Previous Post

पद्म पुरस्कारांतही राजकारण?

Next Post

वहिनी, सावध असा!

Next Post
वहिनी, सावध असा!

वहिनी, सावध असा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.