• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कुटुंब विहरतंय आकाशात

बर्नार्ड लोपीस (विशेष लेख)

marmik by marmik
January 27, 2026
in विशेष लेख
0
कुटुंब विहरतंय आकाशात

आपल्यालाही अवकाशाचा वेध घेत पाखरांसारखे मुक्त उडता यायला हवे, असं प्रत्येकाला वाटतं. ते मानवजातीचंच स्वप्न होतं. अनेकदा स्वप्नात आपण मनमुक्त उड्डाण करतो. अर्थात, अशी स्वप्ने प्रत्यक्षात साकार होणे महाकठीण कर्म. विमानप्रवास, हेलिकॉप्टर प्रवास आता मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यात आले आहेत. पण त्यात पाखरासारखं मुक्त आकाशात फिरत असल्याचा आनंद मिळत नाही.
पॅराग्लायडिंगसारखे त्याचे स्वप्नाच्या अधिक जवळचे पर्याय महागडे असतात. सर्वसामान्य माणसासाठी आर्थिक, भौगोलिक आणि अगदी मानसिकदृष्ट्याही अशक्यच वाटावे असे हे स्वप्न पूर्ण करणारा ‘सपनोंका सौदागर’ म्हणजे वसईतील सॅमसन लॉरेन्स डिसिल्वा!
अर्थात त्याने घडवलेली जादू काही एका रात्रीत घडलेली नाही, त्याच्यामागे जवळपास तीस वर्षांची तपश्चर्या आहे.आपल्या छंदाला आपला व्यवसाय बनवता येणे यापेक्षा मोठे यश नाही असं मानणार्‍या सॅमसनच्या, आकाशाला गवसणी घालणार्‍या साहसाची ही कहाणी.

बेचाळीस वर्षांपूर्वी अमिताभचा ‘याराना’ पाहिला नसता तर मी पॅराग्लायडिंग क्षेत्रात कदाचित आलोही नसतो असं सॅम आवर्जून सांगतो. सॅम तसा माझा काही शाळकरी मित्र नव्हे. वयानेही पाचसहा वर्षे लहानच. तो बाजूच्या इंग्रजी मीडियम कॉन्व्हेंटचा व मी मराठी शाळेतला. पुढे कॉलेज सुरू झाल्यानंतर चर्च युवा संघटनेच्या व्यायामशाळेत त्याची भेट झाली. बॅडमिंटन, स्केटिंग वगैरे खेळ ही त्याची पहिली आवड होतीच. त्यामुळे काही काळ आम्हीही सोबत रमत गेलो. पण त्याच्या बालमनाने याराना सिनेमात पाहिलेलं पॅराग्लायडिंगचं स्वप्न घेऊन तो जिद्दीने पुढं जात राहिला. सर्वात आधी तो वाणिज्य विषयाची पदवी घेऊन ऑटो इंडियामध्ये पत्रकार बनला. पवईसारख्या ठिकाणी राहणारं, पाऊस अंगावर घेत उघड्या जिप्सीतून सुसाट ड्राइव करणारं त्याच्या कुटुंबासारखं कुटुंब त्या काळात फार तर सिनेमातच दिसू शकलं असतं. नंतर पॅन म्युझिक अ‍ॅन्ड मॅगेझिनचा लेखक असलेला सॅम तीस वर्षांपूर्वी आधी केवळ स्वानंद म्हणून पॅराग्लायडिंगच्या या क्षेत्रात आला. चांगली ऐशोआरामाची आणि लठ्ठपगारी नोकरी पॅराग्लायडिंग क्षेत्रात उतरलेला पाहून नातेवाईक हसलेही. त्याचा निर्णय कुटुंबासाठीही अडचणीचा ठरणार होता. पण सॅम वॉज सॅम… त्यानं ‘तो बरोबर असल्याचं’ सिद्ध केले.

सामान्यतः गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून छंद जोपासण्याची कुणाचीही मनोवृत्ती असेल, तर त्यातून खरोखरच कुटुंबातून, सच्च्या मित्रांकडून, शिव्याच खाव्या लागतात. पण सॅमसनकडे सुदैवाने गंगा उलट वाहत होती. मुळात खूपच लिबरल पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात मम्मी आणि डॅडीचा ‘इट इज युवर लाइफ, यू डिसाईड इट’ असा ग्रीन सिग्नल होताच. असं म्हणणारे पालक मिळणं हे
सॅमनसचं भाग्यच. सडेतोड बोलणारे लॉरेन्स डिसिल्वा अंकल म्हणजे पारदर्शक आणि चोख व्यवहाराचा नमुना. अतिशय परखड आणि निर्भय व्यक्तिमत्व म्हणून ते फक्त आगाशीतच नव्हे तर संपूर्ण वसईत ओळखले जात असत. कॅथोलिक धर्मगुरूंनी स्थापन केलेल्या बसीन कॅथलिक बँकेचे तब्बल २७ वर्षे बिनविरोध संचालकपद भूषविणे ही गोष्टच त्यांच्या लोकप्रियतेची आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या प्रामाणिकपणाची पावतीच होती.

त्यांचा वारसा सॅमने जपला आणि त्यांचा विश्वासही सार्थ ठरवला. आज पॅराग्लायडिंग असोसिएशन ऑफ इंडियाचा जनरल सेक्रेटरी, अ‍ॅक्वा अँड एअरो स्पोर्टस असोसिएशन ऑफ वसईचा प्रेसिडेंट, स्पेस अ‍ॅपल या पॅराग्लायडिंग व पॅरामोटरिंगचा प्रमुख प्रशिक्षक अशी पदं तो भूषवतो आहे. या क्षेत्रातील एक कुशल पायलट आणि ट्रेनर म्हणून त्याची ख्याती आहे, खरंतर ती एव्हाना महाराष्ट्रभर पसरायला हवी होती. काही शासकीय ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी या पायलटचे सन्मानाने स्वागत करतात, हेच खूप. असो. तो वेगळा विषय.
सॅमची स्वप्नपूर्ती रश्मीच्या साथीशिवाय झाली नसती. मुळात, आपल्या पतीने इतकी छान नोकरी सोडली तर सर्वात जास्त आकांडतांडव बायकोने करायला हवं होतं, गेला बाजार विरोध तरी करायचा! पण ते दूरच. पदरात चारपाच वर्षाचा सिद्धार्थ असताना, मूळ गुजराती असलेल्या रश्मीने आपल्या स्वभावानुसार ‘हूँ पण तमारी साथे छू’ म्हणून सॅमच्या खांद्याला खांदा लावून सोबत उतरायची तयारी केली. तेव्हापासून रश्मी अगदी आवडीने आणि समरसून याच क्षेत्रात सॅम आणि मुलगा सिद्धार्थ यांच्या बरोबरीने गेली वीस वर्षे स्पेस अ‍ॅपल टीममध्ये काम करत आहे. त्यामुळेच एव्हिएशन अँड एरोस्पेसमधील आंतरराष्ट्रीय महिला व्यावसायिक, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि एटीसी गिल्ड (इंडिया) – वेस्टर्न रिजन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्पेस अ‍ॅपल टीमची सदस्य म्हणून रश्मी डिसिल्वा यांचा सत्कार करण्यात आला. रश्मी वीस वर्षांहून अधिक काळ स्पेस अ‍ॅपलच्या विद्यार्थ्यांना फील्डवर सक्रियपणे मदत करत आहे. २०१०पासून तिने भारतातील सात वेगवेगळ्या साइट्स आणि फ्रान्समधील ड्युने डु पिलाट येथे पॅराग्लायडिंग केले आहे. भारतातील फारच कमी महिला तिच्या वयात पॅराग्लायडिंगच्या खेळात सक्रिय आहेत.

बाप से बेटा सवाई
वयाच्या केवळ तेराव्या वर्षांपासून सिद्धार्थने आजतागायत घेतलेला सक्रिय सहभागही लक्षणीय आहे. जवळपास एक हजार तासांचा अवकाशभ्रमणाचा व्िाक्रमी कालावधी वयाच्या तिशीतच गाठणं ही खरोखरच अभिमानास्पद आणि अभिनंदनास्पद बाब आहे. आपल्या डॅडीच्या नक्शेकदमवर चालणारा अंत्यत मृदुभाषी सिद्धार्थ. बालपणापासून त्याला सायकलिंगचे वेड होते. लेह लडाखपर्यंत सायकल घेऊन जाणार्‍या पोराला प्रोत्साहन देणारे आईवडील मिळणं हेही एक आक्रितच. पॅराग्लायडिंग या साहसी खेळाचे प्रशिक्षण देणार्‍या देशात काही मर्यादित संस्था आहेत, त्यात संपूर्ण कुटुंब सक्रिय असलेल्या स्पेस अ‍ॅपलचे नाव निर्विवादपणे अभिमानाने घ्यावं लागतं, ही या तिघांची मोलाची कमाई. पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंग हे खेळ म्हणून महागडे शौक वाटतात, परंतु जगभरात या साहसी खेळाचे वाढलेले महत्व व आकर्षण पाहता हा एक यशस्वी भविष्य असलेला व्यवसाय ठरणार आहे. पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंग प्रशिक्षणानंतर विविध संधी उपलब्ध होत आहेत. टँडम पायलटिंग म्हणजे प्रवाशांसोबत उड्डाण करण्यासाठी अनुभवी पायलट बनणे. अशा जॉय राइडमधून हौशी पर्यटकांना व्यावसायिक सेवा देणे. फ्लाइट सूचक बनून इतरांना पॅराग्लायडिंग किंवा पॅरामोटर करायला शिकवणे हाही एक मोठा व्यवसाय आहे.
हवाई पर्यटनात निसर्गरम्य ठिकाणी उड्डाणे, छायाचित्रण किंवा साहसी टूर ऑफर करणे, हवाई छायाचित्रण म्हणजे व्हिडिओग्राफी ही आजकाल प्रसार माध्यमे, रिअल इस्टेट किंवा एखाद्या क्लायंटसाठी आश्चर्यकारक दृश्ये टिपण्यासाठी वापरली जाते आहे. कधी कधी आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी प्रशिक्षित पायलट अगदी महत्वाचे ठरतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्पर्धाही होत असतात, या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणेही आर्थिकदृष्ट्या लाभाचे ठरते. साहसी क्रीडा केंद्रे चालवून पॅराग्लायडिंग/ पॅरामोटरिंग शाळा किंवा केंद्रांचे व्यवसायिक व्यवस्थापन करणे किंवा तेथे काम करणे असे अनेक नवनवीन व्यवसाय पर्याय उपलब्ध आहेत. अशा साहसी खेळाच्या प्रशिक्षित व अनुभवी पायलटसची जगभरात भरपूर मागणी आहे. इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात हे प्रशिक्षण आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते.

वसईसारख्या ठिकाणी सध्या तरी काही जागा मोकळ्या आहेत. शिवाय हा निसर्गरम्य परिसर मुंबई महानगराजवळ आहे, याचा मोठा फायदा आहे. आज आसाम, ओरिसा, नागपूर, मध्य प्रदेश येथील कितीतरी युवक या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन करीअर करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला उच्च शिक्षण वगैरे कुठल्याही जाचक अटी नाहीत. या व्यावसायिक संधीचे महत्व जाणून पावलं उचलली गेली पाहिजेत.

आज या खेळासाठी लागणारी सामग्री, म्हणजे पॅराशूट व इंजिन व इतरही स्पेअर पार्टस वगैरे आयात करणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे. तो रुपये व डॉलरच्या तुलनेत भरपूर महागही आहे. एकेकाळी तीन चार लाखांत उपलब्ध असणारे ग्लायडिंग इंजिन आणि पॅराशूट आज आयात व वेगवेगळे कर मिळून दहा लाखांवर पोहोचले आहे. ही ग्लायडिंग उपकरणे विकणे आणि विक्रीपश्चात सेवा देणे हाही एक प्रचंड मोठा व्यवसाय आहे. त्यात उत्पादकांसोबत काम करता येते किंवा स्वतःचे गियर शॉप उघडता येते. मात्र अशी सामुग्री तयार करणारे स्टार्ट अप उद्योग आपल्या देशात उभे करण्यासाठी पुरेसे वित्तीय पाठबळ व शासकीय परवानग्या मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हायला हवी.

अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सचे क्षेत्र आजच्या पिढीला जगभरात व्यवसायाची संधी देणारे असूनही, अनुदान वगैरे तर सोडाच, परंतु किमान शासकीय पातळीवर दखल किंवा यशाचे कौतुक करणे ही काळाची गरजही असूनही ओळखली जात नाही. या खेळासाठी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा अधिकार्‍यांपर्यंत विविध परवानग्या घ्याव्या लागतात. हवाई खेळांसाठी काही सर्टिफिकेशन्सही आवश्यक असतात. राष्ट्रीय उत्पन्नाला हातभार लावणार्‍या व नवीन रोजगाराची नवी क्षितिजे दाखवण्यासाठी प्रशिक्षणाचे काम करणार्‍या होतकरू तरुणांना लाल फितीचा कडवट अनुभव येणं हे दुर्दैवी आहे. पायलट सॅमसन लॉरेन्स डिसिल्वा, पायलट सिद्धार्थ सॅमसन व पायलट रश्मि सॅमसन आज भारतीय बनावटीच्या पॅराग्लायडिंग सामुग्रीचे निर्माण व दुरुस्ती यावर काम करत आहेत. अर्थात अवकाशात झेपावणारे साधन म्हणून विशिष्ट प्रमाणीकरण असणे अनिवार्य आहे याची पुरेपूर काळजी घेऊन, स्वत: बनवलेले भारतीय ग्लायडर्स घेऊन स्वतः उड्डाणे करण्यात ते यशस्वी झाले आहेत. पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टींना फारसं महत्त्व न देता आपला छंद आणि प्रशिक्षण यांत गुंतलेले हे स्पेस अ‍ॅपल कुटुंब सबसे हटके आहे, यात शंकाच नाही.

Previous Post

भय इथलं संपत नाही…

Next Post

सातापार जपला गेलाय ‘स्नेहबंध’

Next Post
सातापार जपला गेलाय ‘स्नेहबंध’

सातापार जपला गेलाय ‘स्नेहबंध’

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.