• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘किळसवाण्या श्रीमंता’च्या नीच उद्योगांचे दर्शन

आशा कबरे मटाले (विशेष लेख )

marmik by marmik
March 4, 2026
in विशेष लेख
0
‘किळसवाण्या श्रीमंता’च्या नीच उद्योगांचे दर्शन

अनेक विकृतांची लैंगिक भूक भागवणारं आणि सोबतच जगभरातल्या सत्तावर्तुळांना परस्परांशी जोडणारं जे नेटवर्क एपस्टीन फाइल्सनी उजेडात आणलं आहे, ते काय आहे हे समजून घेण्यासाठी ‘जेफ्री एपस्टीन : फिल्दी रिच’ ही नेटफ्लिक्सवरची डॉक्युसीरीज पाहायला घेतली. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली. पण आणखी अनेक प्रश्न पडलेही. अमेरिकेत मीडिया आणि यंत्रणाही जाब विचारण्याच्या बाबतीत कमालीची सजग आहे, हा आजवरचा समज मोडून पडला. तिथेही सारं काही किती थंडपणे दडपलं गेलं हे दिसलं. आपण कुठल्या प्रकारच्या जगात राहतो आहोत याचं भान येण्यासाठी ही डॉक्युसीरीज बघायला हवी.
*****

‘एपस्टीन फाइल्समधील लाखो दस्तावेज जनतेसाठी खुले होणार’ या आशयाच्या अमेरिकेतून येणार्‍या बातम्यांमधून ‘जेफ्री एपस्टीन’ हे नाव अलीकडच्या काळात पुन्हा पुन्हा समोर येत गेलं. टप्प्याटप्प्याने हे दस्तावेज खुलेही झाले. या दस्तावेजांमधील ईमेल, फोटो, व्हिडिओ आदींमधून जगभरातील कोण कोण, कधी, कुठल्या कारणास्तव एपस्टीनच्या संपर्कात आले होते, याचेही त्रोटक का होईना, उल्लेख चव्हाट्यावर आले. असंख्य अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा, अमेरिकेतील बड्या सत्ताधार्‍यांसोबत उठबस असलेला, त्यांचाच काय, जगभरातील मान्यवर शास्त्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक, बडे उद्योजक आदींचा सर्रास पाहुणचार करणारा, त्यांच्यासाठी आपल्या निरनिराळ्या आलिशान निवासस्थानांवर, खाजगी बेटावर रंगीन पार्ट्या आयोजित करणारा जेफ्री एपस्टीन ‘फिल्दी रिच’ म्हणजे भीषण किळसवाणा गडगंज श्रीमंत होता. एपस्टीन फाइल्समध्ये आपल्याकडचा एक बडा उद्योजक, काही राजकीय नेते यांचाही उल्लेख असल्याच्या बातम्याही पाठोपाठ येऊन पोहोचल्या. अर्थात या दस्तावेजांमध्ये नाव आहे म्हणून लगेच कुणी गुन्हेगार ठरत नाही असा खुलासाही अनेकदा सोबत वाचायला मिळत होता. अमेरिकेतल्या सत्ताधार्‍यांशी ‘सेटिंग’ जुळवून देण्याचं काम एपस्टीन करत होता.
एपस्टीन फाइल्समधील ईमेल्स आणि फोटोंमधून निव्वळ चौदा-पंधरा वर्षांच्या किंवा तत्सम अल्पवयीन मुलींचेच उल्लेख नव्हते तर रांगणार्‍या बाळांपासून आठ-दहा वर्षांच्या मुलींचाही उल्लेख आढळल्याने समाजमाध्यमांवर त्यासंदर्भातील अनेक उलटसुलट दावे वेगाने पसरले आहेत. एकंदरच जगभरातल्या समाजमाध्यमांवर एपस्टीन दस्तावेजांवर आधारित, त्याची मोडतोड करीत बनवलेल्या कंटेंटची, रील्सची सध्या प्रचंड रेलचेल झाली आहे. त्यातल्या काही हिंदी रील्सचा दर्जा भयावह आहे. संबंधित ईमेल्स, फोटो, व्हिडिओ वाट्टेल तसे एडिट करून, जोडून लैंगिकदृष्ट्या सूचक कंटेट बनवून जास्तीत जास्त लाइक्स पदरात पाडून घेणं एवढाच हेतू त्यामागे आहे, हे उघड दिसतं. यातलं किती खरं आणि किती खोटं याचा जाब कोण विचारणार? या अशा कंटेंटमधून एपस्टीन प्रकरणातील शोषित मुलींना न्याय मिळेल? की जगभरातल्या शोषण करू इच्छिणार्‍यांची वखवख आणखी वाढेल? गडगंज श्रीमंत ही अशी मजा मारतात, मग आपण का नाही, अशी वृत्ती आपल्याकडच्या शहर-गावखेड्यातल्या राक्षसांमध्ये बोकाळणार नाही कशावरून? एपस्टीन फाइल्समधून राजकीय उलथापालथी घडू नयेत याची काळजी संबंधितांकडून नक्कीच समर्थपणे घेतली जाईल. पण या अशा भयावह सामाजिक दुष्परिणामांना कोण आणि कसं रोखणार?

जेफ्री एपस्टीनमार्फत जागतिक स्तरावरच्या सत्तावर्तुळात हजारो अल्पवयीन मुलींचं जे लैंगिक शोषण घडलं, तसं काही आपल्याकडे अजिबातच घडत नसेल का? की एपस्टीन प्रकरणाची व्याप्ती अफाट आहे एवढाच काय तो फरक? आपल्याकडेही राजकीय नेत्याकडे अंगुलीनिर्देश करणार्‍या, लैंगिक अत्याचाराचे संदर्भ असलेल्या घटनांच्या बातम्या अधूनमधून येतात आणि विरूनही जातात. अगदी लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटनाही अलीकडच्या काळात किती मोठ्या संख्येने समोर येत आहेत. मग जेफ्री एपस्टीन हा एकटाच तेवढा भीषण विकृत लिंगपिसाट कसा म्हणायचा?

अनेक विकृतांची भूक भागवणारं आणि सोबतच जगभरातल्या सत्तावर्तुळांना परस्परांशी जोडणारं जे नेटवर्क एपस्टीन फाइल्सनी उजेडात आणलं आहे, ते काय आहे हे समजून घेण्यासाठी ‘जेफ्री एपस्टीन : फिल्दी रिच’ ही नेटफ्लिक्सवरची डॉक्युसीरीज पहायला घेतली. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी जेफ्री एपस्टीनकडून लैंगिक शोषण, बलात्कार झाल्याचं कॅमेरासमोर उघडपणे कथन करणार्‍या किमान दहा जणी या डॉक्युसीरीजमधून आपल्यासमोर येतात. एक प्रकारच्या तटस्थपणाने ही डॉक्युसीरीज सारं काही आपल्यासमोर मांडते. निव्वळ त्या शोषित स्त्रिया आणि या प्रकरणाशी संबंधित खासगी-सरकारी तपास अधिकारी, वकील, पत्रकार व एपस्टीनशी वैयक्तिक संबंध आलेल्या काही व्यक्ती यांचं कथन तसंच आधीच माध्यमांमध्ये ज्यांचं वार्तांकन केलं गेलं आहे अशा घटनांचं फुटेज यांतून एपस्टीन हे सगळं कसं घडवत गेला त्याची कहाणी ही डॉक्युसीरीज आपल्यासमारे उलगडते. यात कुठेही काहीही नाट्यपूर्ण, खळबळजनक करण्याचा जरासाही प्रयत्न दिसत नाही. ज्या थंडपणाने, आसपासच्या व्यवस्थेला गृहित धरून ही भीषण दुनिया साकारली, ते मात्र आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतं. बोलणारी प्रत्येक स्त्री आपली एपस्टीनशी आेळख कशी झाली आणि लैंगिक शोषणाच्या या जाळ्यात आपण का व कशा ओढल्या गेलो हे सांगते.

धनदांडग्या एपस्टीनसाठी चित्रकार म्हणून काम करणार्‍या मारिया फार्मर हिला एपस्टीनच्या अल्पवयीन मुलींविषयीच्या विकृत आकर्षणाचा अनुभव अनपेक्षितपणे थेट तिच्या लहान बहिणींच्या संदर्भात आला आणि संतापलेल्या मारियाने न डगमगता लगेच स्थानिक पोलिस तसंच थेट एफबीआयकडे सुद्धा तक्रार नोंदवली. १९९६ साली तिने नोंदवलेल्या या तक्रारींवर तिला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. एपस्टीनविरोधातली ही पहिलीवहिली तक्रार! (या तक्रारीवर काही कारवाई झाली असती तर कदाचित पुढे अनेकींच्या संदर्भात जे घडलं त्याला अटकाव होऊ शकला असता.) पण कारवाई तर दूरच, उलट एपस्टीनने दिलेल्या धमक्यांमुळे मारिया पुढे दीर्घकाळ दहशतीच्या छायेत जगली. शैक्षणिक वाटचालीत मदत करतो असं भासवून एपस्टीनने मारियाच्या बहिणीचं लैंगिक शोषण केलं. उच्च शिक्षणाची, करिअरची स्वप्नं पाहणार्‍या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या या मुलीच्या हतबलतेचा एपस्टीनने नेमकं हेरून फायदा घेतला. या बहिणीने पुढे काऊन्सेलिंग सायकॉलॉजीत पीएचडी केल्याचा उल्लेख ऐकायला मिळतो. म्हणजे एपस्टीनच्या विकृतीच्या बळी ठरलेल्या सगळ्या अल्पवयीन तरुणी काही मॉडेल्स, मसाज देणार्‍या, शरीरविक्रयाकडे पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून बघणार्‍या नव्हत्या. कौटुंबिक परिस्थितीमुळे वाट्याला आलेली आर्थिक, सामाजिक, मानसिक हतबलता हा या मुलींमधला समान दुवा दिसतो.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान असंख्य मुलींची नावं व संदर्भ आपल्या हाती लागले. परंतु त्यापैकी कित्येक मुलींनी समोर येऊन काहीही बोलण्यास नकार दिला हेही तपास अधिकारी सांगतात. मसाज करण्यासाठी दोनशे डॉलर देणार असं सांगत बोलावून घेणारा एपस्टीन मसाजऐवजी शरीरसंबंधांसाठी भाग पाडत असे आणि पुढे याच मुलींना आणखी मुली आणण्याच्या कामी जुंपत असे. त्या कामाचेही तेवढेच पैसे तो देत असे. त्याची मैत्रीण गिलेन मॅक्सवेलही त्याच्यासाठी मुली हेरून आणत असे. मूळची लंडनची असलेली गिलेन स्वत: उच्चभ्रू पार्श्वभूमीची, सत्तावर्तुळात वावर असलेली आकर्षक व्यक्तिमत्त्वाची स्त्री होती. त्यामुळे तिचे एपस्टीनच्या आयुष्यातले स्थान वेगळे असावे. तिचा या अवघ्या प्रकरणातला सहभाग ‘पार्टनर इन क्राइम’ धर्तीचा दिसतो. पुढे त्या दोघांनी आपल्याला इतर बड्या मंडळींना ‘तीच सेवा’ देण्यासाठी वापरलं असा उल्लेख व्हर्जिनिया ज्यू फ्रे ही तरुणी करते. ब्रिटिश राजघराण्यातील ‘प्रिन्स’ अँड्र्युने लैंगिक शोषण केल्याचं कॅमरासमोर सांगणारी तीच. अँड्र्यु व अन्य एका उच्चपदस्थ व्यक्तीखेरीज लैंगिक शोषणासंदर्भात बाकी फारशी कुणाची उघड नावं डॉक्युसीरीजमध्ये घेतलेली दिसत नाहीत. बहुदा कायदेशीर खबरदारी म्हणून तसं केलं गेलं असावं. (व्हर्जिनिया हिचा गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये आत्महत्येने मृत्यू झाल्याचं अन्यत्र वाचनात आलं. तिचं ‘नोबडीज गर्ल’ हे आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीच ती मरण पावली. डॉक्युमेंटरी २०२० सालची असल्याने बहुदा तिच्यात हे उल्लेख नाहीत.)

अमेरिकेतल्या गडगंज श्रीमंतांच्या एका भागात एपस्टीनच्या जवळपास राहणार्‍या कुणाकडून तरी सुरुवातीच्या काळातच स्थानिक पोलिसांना एपस्टीनकडे अल्पवयीन मुली रोजच्या रोज मोठ्या संख्येने येत असल्याची माहिती दिली गेली होती. पोलिसांनी लागलीच पाळत ठेवून हलके हलके बरीच माहिती जमवलीही. पण एपस्टीनचे लागेबांधे इतके वरपर्यंत होते की तो सहज कायद्याच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला. अटकेच्या आधीच घरातले सगळे पुरावे गायब करण्याची संधी एपस्टीनला मिळाली. अत्यंत धक्कादायकरित्या अमेरिकेच्या यंत्रणेने २००८ साली एपस्टीनला मोकळं सोडलं. दोन किरकोळ गुन्ह्यांची कबुली देऊन एपस्टीनने यंत्रणेशी ‘नॉन प्रोसेक्युशन अ‍ॅग्रीमेंट’ केलं व अवघ्या १८ महिन्यांची शिक्षा त्याला झाली. (हे सारं ज्याने शक्य केलं तो सरकारी वकील अ‍ॅकॉस्टा हा कालांतराने ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मंत्री झाला होता.) १८ पैकीही फक्त १३ महिन्यांची शिक्षा म्हणे एपस्टीनने भोगली. या शिक्षेच्या काळातही ऑफिसच्या कामासाठी रोज बारा-बारा तास त्याला तुरुंगाबाहेर जाऊ देण्यात आलं. हे सगळं कसं घडलं याचं कथन काही तपास अधिकारी डॉक्युसीरीजमध्ये करतात. हे सगळंच त्याच्याविरोधात तक्रारी करण्यासाठी पुढे आलेल्या तरुणींसाठी मानसिकदृष्ट्या किती भयावह व क्लेशकारक होतं असेल!

अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या व त्यासाठीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवल्याच्या तक्रारी एपस्टीनविरोधात दाखल होऊनही त्या काळात व पुढेही दीर्घकाळ असंख्य बड्या मंडळींनी, नामवंतांनी, बिल क्लिंटन यांच्यासारख्या माजी राष्ट्राध्यक्षांनी व त्यांच्यासारख्याच अन्य बड्या राजकीय नेत्यांनी एपस्टीनबरोबरचे मैत्रीसंबंध कायम राखले हेही डॉक्युसीरीजमध्ये ढळढळीतपणे समोर येतं. आणि त्यापैकी काहींचे बेगडी खुलासेही.

अखेर २०१८मध्ये एपस्टीनचं प्रकरण पुन्हा बाहेर आलं आणि २०१९मध्ये मोलाचे पुरावे ताब्यात घेत एपस्टीनला लैंगिक शोषण व मानवी तस्करीच्या आरोपांखाली पुन्हा एकदा अटक झाली. डॉक्युमेंटरीत एपस्टीनचं न्यायालयीन सुनावणीतलं बरंच फुटेज अधूनमधून आपल्याला पाहायला मिळतं. यंत्रणा खिशात असल्याने ताे किती निर्धास्त, तरबेज आणि निगरगट्ट होता हे दिसतं. असा हा जबरदस्त पोहोच असलेला माणूस अकस्मात फेडरल तुरुंगात आत्महत्या करून मेला! अनेकांना हे पटलेलं नाही. त्याला ६ जुलै २०१९ या दिवशी अटक झाली आणि १० ऑगस्ट २०१९ रोजी तो तुरुंगात मृतावस्थेत आढळला. त्या दिवशीच्या फेडरल तुरुंगातल्या परिस्थितीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. तसंच जेष्ठ व अनुभवी फोरेन्सिक तज्ज्ञांनी एपस्टीनच्या मानेच्या फ्रॅक्चरविषयी स्पष्ट शब्दांत शंका व्यक्त केल्याचंही डॉक्युमेंटरीत पाहायला मिळतं. त्याचा मृत्यू ही आत्महत्या होती की हत्या याविषयीचे दावे-प्रतिदावे होत राहिले आहेत असं दिसतं. मृत्यूच्या दोन दिवस आधी एपस्टीनने आपली अब्जावधींची मालमत्ता एका ट्रस्टच्या ताब्यात दिली होती, इथे येऊन ही डॉक्युसीरीज संपते.

सामान्य आर्थिक स्तरातील कुटुंबात जन्म झालेला, डिग्री नसतानाही शाळेत गणित शिक्षक म्हणून नोकरी मिळवणारा एपस्टीन पुढे एवढा गडगंज श्रीमंत, अब्जाधीश कसा झाला याचीही उत्तरं या डॉक्युसीरीजमध्ये थोडीफार मिळतात. श्रीमंतीनंतरच्या कालखंडात सदोदित त्याच्या सोबत असलेली व बहुदा अनेक प्रकारच्या कारनाम्यांमध्ये सहभागीही झालेली गिलेन मॅक्सवेल हिच्याविषयीची ‘गिलेन मॅक्सवेल : फिल्दी रिच’ ही डॉक्युसीरीजही नेटफ्लिक्सवर आहे. गिलेनविषयीची ही डॉक्युसीरीज हिंदीतही बघता येते. पण जेफ्री एपस्टीनविषयीची
डॉक्युसीरीज मात्र हिंदीत ऐकण्याचा पर्याय उपलब्ध नाही.

 

Previous Post

उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व भाजपच्या तकलादू हिंदुत्वापेक्षा उजवे…!!

Next Post

लेखक

Next Post
लेखक

लेखक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.