
शनिमाहात्म्य या पोथीत लिहिलेली विक्रमराजाच्या कहाणीत काय तथ्य असू शकेल, याचा विचार करताना प्रबोधनकारांना या कहाणीचं स्वतःच्या आयुष्याशी असलेलं साम्य लक्षात आलं. कोण काय म्हणेल, याची पर्वा न करता त्यांनी ते उघडपणे मांडलंदेखील. त्यातून प्रबोधनकारांच्या अभ्यासकांसाठी त्यांच्या जीवनातला अज्ञात कप्पा उघड झालाय.
`शनिमाहात्म्य या पोथीत लिहिलेली विक्रमराजाच्या कहाणीत काय तथ्य असू शकेल, याचा विचार करताना प्रबोधनकारांना या कहाणीचं स्वतःच्या आयुष्याशी असलेलं साम्य लक्षात आलं. कोण काय म्हणेल, याची पर्वा न करता त्यांनी ते उघडपणे मांडलं देखील. त्यातून प्रबोधनकारांच्या अभ्यासकांसाठी त्यांच्या जीवनातला अज्ञात कप्पा उघड झालाय.
शनिमाहात्म्य पुस्तकाच्या पहिल्या पाच प्रकरणांत यातल्या राजा विक्रमाच्या कथेचा परिचय आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करून झाल्यानंतर प्रबोधनकारांची चिकित्सा एकदम रंगतदार वळण घेताना दिसते. स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचं विक्रमाच्या कहाणीशी कसं साम्य आहे, हे पुढच्या दोन प्रकरणांत ते सांगतात. त्यात त्यांनी स्वतःच्या अनुभवांवरून साडेसातीचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठीची त्यांची भूमिकाही स्पष्ट आहे.
ते लिहितात, कहाणी विक्रमाची आणि ती स्वानुभवाच्या शब्दांनीच? अनुभवाचे बोल केव्हाही श्रेष्ठच. त्या बोलाची महती सिद्ध करायला ग्रंथाधार नको, श्रेष्ठाधार नको, कोणाची कसलीही मध्यस्थी नको. जे स्वत: पाहिले, चाखले, अनुभवले आणि अखेर ‘का? कसे?’च्या कसाला लावून त्याचे सिद्धांत पडताळून पाहिले, तेच वाचकांना निवेदन करणे श्रेयस्कर होय… असे करण्यात मोठेपणा मिरविण्याचा किंवा लोकमान्यतेचा मुलामा चढवून घेण्याचा मजवर आरोप करणार्या मित्रांनी मी पुन्हा एकदा या ठिकाणी नम्रतापूर्वक बजावून सांगतो की बाबांनो, मी या दोनही गोष्टीवर एकदाच कायमचे थुंकून ठेविले आहे.
पण शनिमाहात्म्याच्या मूळ कथेत तर साक्षात शनीच घोड्यांच्या व्यापाराचं रूप घेऊन आला होता. पण असे ग्रह काही प्रत्यक्षात माणसाची सोंगं घेऊन येण्याची शक्यता त्यांनी सविस्तर फेटाळून लावलेली आपण पाहिलीच. पण त्यांना वाटतं की प्रत्यक्ष शनि येथे येऊन कोणाला साडेसातीच्या चरकात पिळीत नाही, तर त्याच्या गुणधर्माची ज्या माणसाच्या देह मनात तंतोतंत प्रतिमा उमटलेली असेल, त्या माणसाकडूनच साडेसातीच्या छळवणुकीचे सर्व प्रकार प्रत्यक्ष व्यवहारात घडून येत असतात. अशी कोणती माणसं आपल्या आयुष्यात कशी आली आणि त्यामुळे काय घडलं तेही प्रबोधनकरांनी सांगितलंय, माझ्या चरित्रात विक्रमराजाची कथा किती बिनचूक तपशीलाने घडून आली, याचा वृत्तांत वाचकांस निवेदन करीत आहे. त्यावरून तात्याजी महिपतीच्या विक्रम-कथेचा गूढार्थ बराच स्पष्ट होईल.
विक्रमाच्या कहाणीशी स्वतःच्या आयुष्याशी तुलना करताना प्रबोधनकारांनी स्वतःच्या क्रांतिकारक पिंडा`चं आणि विक्रमी स्वभावाचं वर्णन केलं आहे. ते फारच महत्त्वाचं आहे, `शरीराने मी जात्याच दुबळा असलो, तरी मनाने मी अचाटकर्मा क्रांतिमुमुक्षु आहे. अनेक राजे महाराजांच्या ताटाला ताट न् पाटाला पाट भिडविण्याचे शेकडो योग अनुभवूनसुद्धा, अखेर मी आणि माझी लेखणी, ह्या पलीकडे माझ्या लौकिकी भाग्याने विशेष मजल न मारण्याचे कारण तरी हेच. माझ्या मातोश्रीच्या दुधात लाळघोटेपणाचे दो थेंब जरी परमेश्वराने मिसळले असते, तरी त्या वेळी मी धनकनक संपन्नतेच्या गरमागरम उबार्यात सुरक्षित बसून, इतर शेकडो झब्बूंप्रमाणे मनाला केवळ विरंगुळा म्हणून लोकहितवादाचे नाटक खुशाल नटवीत असतो.
पुढे ते स्वतःचा उल्लेख माझ्याइतका कडवा प्रयत्नवादी, खटपट्या आणि धडपड्या माझा मीच असा करत असले तरी ते असंही म्हणतात, गेल्या ३० वर्षांचा माझा आयुष्यक्रमाचा नकाशा- विशेषतः गेल्या पाच, साडेपाच वर्षांतील क्रांतिमय जीवनातली अनेक भयंकर स्फोटांचा संकटपट तपासला असता, प्रयत्नवादालाही काही सीमा आहे; केवळ यत्नच ध्येयाची अखेर साधतो असे नव्हे… मानवी प्रयत्नांच्या पलीकडे काहीतरी अनेक गूढ शक्ती आहेत, मग त्यांना दैव म्हणा, ग्रहदशा म्हणा, ईश्वरी सूत्र म्हणा, का आणखी हवे ते नाव द्या, त्या शक्तीचे सामर्थ्य आकलन करून, त्यांचा प्रयत्नवादात एकजिनसी मिलाफ करून घेतल्याशिवाय माणसाचा एकांडा प्रयत्नवाद फोल आहे.
शनिमाहात्म्यातल्या राजा विक्रमाच्या कहाणीला सुरुवात होते ती त्याने केलेल्या शनीच्या कुचाळकीला. तिथून त्याच्यावरच्या संकटांना सुरुवात होते. तशीच प्रबोधनकारांवरील संकटांना सुरुवात त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे झाली, असं ते सांगतात, ता. १० फेब्रुवारी १९२२ रोजी दुपारी बरोबर १२ वाजता राहू, शनि आणि मंगळ या त्रिकुटाचे मेतकूट जमताच, अपमानाच्या क्षुल्लक सबबीवर मी ताडकन् सरकारी नोकरीच्या दास्याची जाडजूड रौप्यशृंखला तोडून तज्जन्य मानसिक दास्याविरुद्ध प्रत्यक्ष बंड केले. अपमानाच्या प्रतिकारार्थ राहुला मी वापरलेली भाषा विक्रमाच्या कुचाळीपेक्षा बरीच कडक होती.
विक्रमाच्या कहाणीतला त्यानंतरचा पुढचा प्रसंग हा शनीने घोड्याच्या व्यापार्याचं रूप घेऊन येण्याचा आहे. आपल्या आयुष्यात शनीने या व्यापार्याची भूमिका करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांना निवडल्याचं त्यांनी लिहिलंय. पण या पुस्तकात आणि नंतरही ते कायमच कर्मवीरांविषयी अत्यंत आदरानेच लिहिताना दिसतात. पण या प्रसंगाचं त्यांनी केलेलं वर्णन मूळ कथेशी नेमकं जुळणारं आहे, सौदागराची भूमिका वठविण्यासाठी शनीने भाऊराव पाटलाचीच योजना केली. त्याच्या तनुस्थानी शनीचे बिर्हाड असल्यामुळेच बहुतेकरून ही योजना झाली असावी. सौदागराने दोन-तीन योजनांचे घोडे बरोबर आणले होते. माझी उत्तम घोड्याची कल्पना म्हणजे छापखाना. अखेरीस एक दोन घोड्यांचे परीक्षण करून, अखेर कूपरच्या भागीदारीत छापखाना हा घोडा मी पसंत केला. त्यावर मी बसताक्षणीच दादरच्या स्वाध्यायाश्रमातून मी जो उडालो, तो कुलाबा, ठाणा आणि पुणा हे तीन जिल्हे ओलांडून थेट सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या मैदानात उतरलो.
ही कहाणी पुढे नेताना ते लिहितात, पाडळीच्या मैदानात घोडा उतरताच विक्रमाला जसा घोडा, नदी, झाडझुडपे गुप्त झाल्याचा देखावा दिसला, तसा मला भाऊरावने वर्णन करून सांगितल्यापैकी एकाही सवलतीचा तेथे थांग लागेना. विक्रमाला तामलिंदा नगरी लाभली. मला तामसनिंदा पाडळी लाभली. विक्रमाला वैश्य सावकार भेटला, मलाही कूपरच्या रूपाने तोच भेटला. पुढचं वर्णन तर त्यांनी शनिमाहात्म्याच्या ओव्यांच्या खाक्यातही केलंय,
त्या वैश्याची मानस कन्यका ।
तिचे नाव भांडवलिका ।
तिचा पण हाचि देखा ।
पिता इलेक्शनी यशवंत ।।
पैसा त्याचा परमेश्वर ।
पारशी शोध करी निरंतर ।
लेखणीचा नसता आधार ।
पैसा पंगू इलेक्शनी ।।
मला भेटला हा लेखकू ।
गरजवंत आणि लायकू ।
भांडवलिकेशी जखडून टाकू ।
कशास कां कूं करील पै ।।
पुढे बापूसाहेब चित्रेंनी पुण्यात विकत घेतलेल्या छापखान्यामुळे झालेली फसवणूक म्हणजे भिंतीवरच्या चित्रातल्या हंसाने हारातले मोती गिळावेत या शनिमाहात्म्याच्या कथेसारखंच घडलं, हे प्रबोधनकारांनी पटवून दिलंय. त्यामुळे त्यांना पुण्यात यावं लागलं. त्याचं वर्णन ते खास शनिग्रहाच्या अड्ड्यात असं केलं आहे. त्यातला काही भाग मुळातून वाचायला हवा म्हणून पुढच्या परिच्छेदांमध्ये दिला आहे-
मी इतकेच स्वानुभवपूर्वक म्हणू शकेन की, पुणे हा एक शनिखाना आहे. पुण्याची नजर जेथे जेथे गेली तेथे तेथे साडेसातीचा ज्वालामुखी फुटून सत्यानाशाचा कहरच गुदरला, असा मागील आणि चालू इतिहासाचा पुरावा आहे. पुणे शहराची कल्पना आणि स्थापना शनिवारीच घडलेली असावी, असा माझा तर्क आहे. मराठी साम्राज्याची राखरांगोळी करणार्या शनिखान्याच्या आद्यशनीचा वाडासुद्धा शनिवारवाडा आणि त्याच्या पेठेचे नावसुद्धा शनिवारपेठच! पुण्याच्या पेशवाईचे पापड भाजून, सातारच्या छत्रपतींच्या सिंहासनाची राखरांगोळी करणार्या बाळाजीपंत नातूशनीचे वास्तुमंदिरही याच शनिवारपेठेत.
`पुण्याच्या पेठांच्या नावात सगळ्या वारांची नावे आहेत. पण त्यात ब्राह्मणी गुणधर्माच्या गुरुवार पेठेचा अज्जिबात लोप झालेला आहे. पुण्यात सगळे वार आहेत, गंज आहे, भवानी आहे, वेताळही आहे; पण गुरू मात्र कोठेच नाही. सगळे महत्त्व शनीला! इतक्या पराक्रमी आणि तात्काळ परिणामी शनिखान्याचे स्थानमाहात्म्य सर्व ब्राह्मणेतर रहिवाशांवर थोडेफार पडल्याशिवाय कसे राहणार? आणि व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर ज्या ब्राह्मणेतरांना शनिखान्यातल्या शनीशी हरघडी काही ना काही व्यवहार पडायचाच, तेथे त्यांना आपली मनोवृत्ती, जबरदस्ताचा टिकाव साधण्यासाठी, सवाई शनि बनविणे प्राप्त आहे. कितीही सरळ आणि सात्विक वृत्तीचा मनुष्य असो, तो शनीखान्यात गेला पुरे की त्याला शनीची बाधा झपाटल्याखेरीज राहायचीच नाही. कोणतीही लहानमोठी चळवळ घ्या किंवा चळवळ्या घ्या, तिकडे पुणेरी शनीची नजर जाताच, तिची आणि त्याची साडेसातीच्या चरकात गठडी वळलीच पाहिजे. गेल्या काळच्या मेल्या गोष्टी सोडल्या तर गणपती उत्सव काढणारा हाच शनि, आणि त्याचा भाद्रपदी शिमगा बनविणारा हाच शनि. महात्मा गांधींच्या चळवळीला हाच शनि भोवला आणि अस्पृश्यांच्या आत्मोद्धाराच्या राशीला याची साडेसाती खपाटी बसली आहे… नवमतवादी सुधारकांचा पुण्याच्या शनिखान्याने आजपर्यंत जसा आणि जितका छळ केलेला आहे, तसा आणि तितका छळ खास शनीनेही कोणाचा केला नसेल. आकाशस्थ नवग्रहात जसा शनि, तसे महाराष्ट्रात पुणे, एवढे म्हटले म्हणजे पुरे आहे.
पुण्यातून प्रबोधन बंद पाडण्यासाठी झालेल्या ब्राह्मणी कंपूच्या बैठकीचं वर्णन त्यांनी फर्मास केलंय. तेही या संदर्भात वाचायला हवंच, निवडक इरसाल शनींची एक दिवस तर माझ्या बिर्हाडी मोठी शनिकॉन्फरन्सच भरली. त्यात ‘श्रीमंत’ पदवी धारण करणार्या वेड्यापासून तो हॉटेलात खरकट्या कपबश्या विसळून पोट भरणार्या महात्म्यापर्यंत सर्व दर्जाच्या वेदोनारायण शनींचा भरणा होता. त्या
कॉन्फरन्सने मला पुणेरी भटांच्या शनिमाहात्म्याचा जो अथांग थांग लागला, त्याची किंमत दहा टाटांच्या ऐश्वर्यालाही देता देववणार नाही. पुण्यात उलटसुलट कायदेबाजीच्या भानगडी कोण कोण कसकसे चालवितात, ह्याचा मला पुरा छडा लागला.
पुण्यात येऊन सर्वस्व गमावण्याचं वर्णन प्रबोधनकारांनी शनीच्या संबंधात केलेलं आहे, पाडळी सोडताना पाय ठेवण्यासाठी शनीने निर्माण केलेली ही मायेची पायरी पायाखालून निसटताच मी खास शनीच्या अड्ड्यातच हातपाय तुटून निर्निकल (निकेल धातूची नाणी) अवस्थेत चारी मुंड्या चीत पडलो. प्रबोधन बंद पडला. हातातली जीवनदेवता लेखणी सांदीला पडली. माझ्या विक्रमाचे हातपाय तोडले जाऊन मी अक्षरश: अस्तित्वातून उखडला गेलो. असून नसून सारखा झालो. त्यानंतर पुन्हा पुण्यातच प्रबोधन सुरू करण्याच्या दृढनिश्चयही शनीच्या संदर्भातच आहे. तो असा, `करीन तर ह्या शनिखान्यातच स्वतंत्र प्रबोधन छापखान्याची प्राणप्रतिष्ठा करीन.’ अशी मी प्रतिज्ञा केली… ‘पुण्याचे पाणी पिऊन माणुसकीवर निखारे ओतण्याइतकी माझी जीवनचर्या शनीच्या पिंडाची बनविण्याची जरी मला इच्छा नाही, तरी केवळ या इरसाल शनीच्या कृत्याचा सक्रीय निषेध म्हणून कमीत कमी दोन वर्षे तरी प्रबोधन छापखाना या शनींच्या छातीवर बसून चालवीन मग मला जिकडे जायचे तिकडे जाईन. पुण्यात प्रबोधन? होय पुण्यात प्रबोधन चालवून दाखवीन. ठार मेलो तरी हरकत नाही. भडाडलेल्या होळीत उभा राहून या शनीच्या शनिमाहात्म्याचे दात पाडीन, तरच नावाचा ठाकरे!’
पुढे पुण्यात पुन्हा प्रबोधन छापखाना सुरू करणं ते मुंबईत येऊन हतबल आजारी पडणं, आणि थेट आता शनिमाहात्म्य लिहायला घेण्यापर्यंतचं सगळं वर्णन प्रबोधनकारांनी केलं आहे. ते आपण आजवर वेळोवेळी या सदरात वाचलेलं आहेच.

