
१९८७ सालातली गोष्ट.
माझ्या कार्यालयात एक फोन आला. फोनवरील ऑपरेटरने सांगितले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुमच्याशी बोलायचं आहे.
मी थक्कच झालो. मी एक साधा इन्स्पेक्टर. माझं काम नेकीने करणारा. १९८६ साली चार्ल्स शोभराज या मोस्ट वाँटेड
इंटरनॅशनल गुन्हेगाराला गोव्यात मी अटक केली होती, त्यामुळे अनेकांना माझ्याविषयी प्रेम निर्माण झालं होतं. पण, तरीही काही प्रत्यक्ष ओळख नसताना एवढ्या मोठ्या नेत्याने मला का फोन केला असेल?
मी फोन घेतला, बाळासाहेब म्हणाले, झेंडे, अरे, त्या शक्ती कपूर नावाच्या अॅक्टरने इन्साफ नावाच्या सिनेमात तुझी मिमिक्री केली आहे. इन्स्पेक्टर लक्ष्मीकांत भिंडे असं नाव घेतलंय त्याने त्यात. आम्हाला फार संताप आला आहे. आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो आणि यांचे हे असले चाळे. आम्ही बंदी घातली आहे त्या सिनेमावर. आता तो निर्माता (नितीन मनमोहन) आलाय पाय धरायला! तुझं काय म्हणणं आहे?
मी म्हणालो, बाळासाहेब, मी एक साधा इन्स्पेक्टर आहे. माझं काय म्हणणं असणार? त्या सिनेमावर तुम्हीच बंदी घातली आहे, आता तुम्हीच काय तो फैसला करा.
त्यांनी त्या निर्मात्याची चांगली खरडपट्टी काढली आणि मग त्या सिनेमावरची बंदी उठवली.
माझा थेट संबंध नसताना, ओळख नसताना, मी त्यांच्या उठण्या-बसण्यात नसताना बाळासाहेबांनी एका मराठी अधिकार्याची थट्टा चालणार नाही, म्हणून हे पाऊल उचललं होतं.
माझ्याविषयी बाळासाहेबांच्या कानी अनेक गोष्टी जात असाव्यात. त्यांनी मला भेटण्याची इच्छा त्यांच्या निकटच्या वर्तुळात व्यक्त केली. त्यांचे एक सैनिक, आमच्या गिरगावचेच रहिवासी, भटकंतीकार प्रमोद नवलकर हे माझे चांगले मित्र होते. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले की माझ्या मुलीच्या लग्नात झेंडे येणारच आहेत. त्यावेळी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देतो. लग्नात नवलकर मला साहेबांकडे घेऊन गेले, मला पाहून ते उठून उभे राहिले, अतिशय प्रेमाने त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, मला तुझा फार अभिमान वाटतो. त्यावेळी त्यांच्यासोबत सुधीर जोशी, मनोहर जोशी आणि छगन भुजबळ हे मुंबईचे तीन माजी महापौरही होते. आज बाळासाहेबांच्या पहिल्या भेटीचा तो फोटो माझ्या आठवणींची ठेव बनलेला आहे.

तुझे तीन तीन पती…
मी आग्रीपाड्यात असताना कवी शांताराम नांदगावकर हे माझे मित्र झाले. त्यांच्या मुलाने एका ख्रिश्चन मुलाबरोबर पार्टनरशिपमध्ये एक म्युझिक स्टुडिओ काढला. उद्घाटनाच्या सोहळ्यात चार प्रमुख पाहुणे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, थोर निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम आणि कार्डिनल सायमन पिमेंटा आणि या थोर माणसांबरोबर माझ्यासारखा एक साधा इन्स्पेक्टर. नेमका त्या कार्यक्रमाला मी अर्धा तास उशिराने पोहोचलो.बाळासाहेबांच्या शेजारीच माझी खुर्ची ठेवण्यात आली होती. बाळासाहेबांनी विचारलं, का रे, तुला इतका उशीर का झाला यायला? मी सांगितलं, आज राष्ट्रपती मुंबई दौर्यावर होते. मी त्यांच्या बंदोबस्ताला गेलो होतो. बाळासाहेब मिश्कील हसत म्हणाले, वा वा, मजा आहे तुझी. तुझे तीन तीन पती. मला काही कळेना, मी विचारलं, मला याचा काही अर्थ कळला नाही साहेब!
बाळासाहेब म्हणाले, अरे, तिकडे राष्ट्रपती, इकडे सेनापती (म्हणजे अर्थात खुद्द बाळासाहेब) आणि चित्रपती (शांतारामबापू). झाले ना तीन पती! माझी हसून हसून मुरकुंडी वळली.
बाळासाहेबांचं माझ्यावर इतकं प्रेम असताना १९९१ सालात एक आक्रीत घडलं. मला मुस्लिमधार्जिणा ‘हिरवा झेंडे’ ठरवणारा एक बदनामीकारक लेख बाळासाहेबांच्या दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झाला. मी दाऊदच्या गुंडांना संरक्षण देतो आणि ‘हिंदू गुंडां’विरोधात कारवाई करतो, अशा प्रकारचे अनेक आरोप त्यात करण्यात आले होते. झाले असे होते की मी आग्रीपाड्यात आलो तेव्हा दाऊदच्या टोळीशी संगनमत असलेले रमा नाईक, बाबू रेशीम आणि अरुण गवळी यांच्या गुन्हेगारी कारवायांना ऊत आला होता. मी रमा नाईकची हातात दोर्या बांधून त्या परिसरातून धिंड काढली होती. त्याने हबकलेल्या बाबू रेशीमने माझ्या कार्यालयात येऊन हात जोडून सांगितले होते की मी वाँटेड असेन, तर मला बोलावून घ्या. मी हात बांधून हजर होईन. माझी अशी मिरवणूक काढू नका. अरुण गवळीच्या दगडी चाळीतून नियंत्रित होणार्या आणि सगळा परिसर नासवणार्या गुन्हेगारीला आळा घालण्याचा माझा प्रयत्न होता. पण मी आग्रीपाड्यात मुस्लिम गुंडांना संरक्षण देतो, दाऊदसाठी काम करतो आणि हिंदूद्वेष्टे वर्तन करतो असे बेलगाम आरोप सामन्यात आलेल्या बातमीत करण्यात आले होते.
या आरोपांमुळे आणि ते साक्षात बाळासाहेबांच्या वर्तमानपत्रात छापून आल्यामुळे मी फार व्यथित झालो आणि साहेबांना प्रत्यक्ष भेटून त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. त्यांना म्हणालो, साहेब, मीही शिवप्रेमीच आहे. छत्रपती संभाजी राजांच्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या झेंडेवाडीचा माझा जन्म आहे. आजोबा विठ्ठलराव सत्यशोधक चळवळीतले एक कार्यकर्ते. शाहू महाराजांचे जवळचे अनुयायी. पुण्यातील श्रीमंत मराठा शेतकरी, व्यावसायिकांनी शिवाजी मराठा हायस्कूल काढलं त्यात ते सहभागी होते. त्यावेळेपर्यंत शिवाजी महाराजांचा जगात कुठेच पुतळा नव्हता. माझ्या आजोबांच्या प्रेरणेने शिवाजी मराठा पुतळा कमिटी स्थापन झाली आणि तो पुतळा बसवला गेला. त्यामुळे मला हिंदुत्व आणि शिवसेना कोणी शिकवण्याची गरज नाही.
त्याचबरोबर मी त्यांना हेही सांगितलं की आज तुम्ही ज्यांच्या बाजूने माझ्यावरचे आरोप छापलेत त्या गुंडांना कोणताही धर्म नाही. यांना एकच धर्म माहिती आहे, तो आहे पैसा. हेच सगळे आतापर्यंत त्याच दाऊदच्या घरी पाणी भरायचे, ज्याच्याविरोधात आज एक झाले आहेत. हे उद्या तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाहीत.
बाळासाहेबांच्या मनात जे काही किल्मिष पेरलं गेलं होतं, ते माझ्या बोलण्याने दूर झालं आणि त्यांनी तो विषय खतम करून टाकला. माझी बाजू मांडणारे एक पत्र मी त्यांना दिले होते. बाळासाहेबांचा संपादक म्हणून मोठेपणा असा की त्यांनी ते पूर्ण पत्र जसंच्या तसं छापलं आणि सामन्यातूनही तो विषय संपवून टाकला. त्यानंतर मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी माझ्याशी बोलून शब्दांकन करून मधुकर झेंडे यांची चित्तथरारक पोलिसी कर्तबगारी अशी एक लेखमालाही छापली.
या सगळ्या काळात मला बाळासाहेबांमध्ये मला एक निर्मळ माणूस दिसला होता. अत्यंत गुणग्राहक, मराठी माणसावर प्रेम करणारा आणि कोणालाही आपला म्हटलं की त्याच्यावर अफाट माया करणारा दिलदार मनाचा मोठा नेता! त्यामुळेच सहपोलिस आयुक्त या पदावरून माझी निवृत्ती जवळ आली तेव्हा मी त्यांना फोन केला आणि म्हणालो, मी निवृत्त होतोय लवकरच. त्या दिवशी तुम्हाला भेटायचं आहे, सॅल्यूट करायचा आहे. चालेल का? बाळासाहेबांनी परवानगी दिली. ड्युटीतला उपचार म्हणून करावा लागतो, त्यापेक्षा वेगळा कधीच कोणत्या नेत्याला सलाम न केलेला मी त्या दिवशी जाऊन बाळासाहेबांना भेटलो आणि अगदी मनापासून त्यांना एक कडकडीत सलाम ठोकला!
त्या महानेत्याच्या जन्मशताब्दीनिमित्त आजही मनोमन सलाम!

