• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इराणी सिनेमाचं गारूड!

श्रीकांत ढेरंगे सिनेमाया

marmik by marmik
March 23, 2026
in मनोरंजन, विशेष लेख
0
इराणी सिनेमाचं गारूड!

तुम्ही इराणी सिनेमे पाहता का? इराणी सिनेमा हा जगातील सर्वात प्रगल्भ सिनेमा आहे. किंबहुना इराणी चित्रपटांचा दर्जा हा जगात इतर कुठल्याही चित्रपटांना कमावता आलेला नाही. इराणी चित्रपटांवरूनही तेथील लोकांच्या प्रगल्भतेची, संवेदनशीलतेची, हळवेपणाची आणि एकमेकांवरील अतूट प्रेमाची तुम्हाला कल्पना येईल.

अगदी कुठलाही इराणी सिनेमा तुम्ही पाहा. अगदी कुठलाही. विषय अगदी साधेसोपे. सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचे. त्यात कुठेही भडकपणा नाही. मुजोरी नाही. दिग्दर्शक वा कलाकार म्हणूनचे तीळमात्रही अहंकार नाहीत. सध्या इराणी चित्रपट हे जागतिक चित्रपटांचे मानदंड ठरावेत इतक्या उंचीवरील आहेत. माझ्या म्हणण्यात इतकीही, अगदी इंचभरही अतिशयोक्ती नाही.

माजिद माजिदी असेल, जफर पनाही असेल, अब्बास कियारोस्तामी असेल, असगर फरहादी असेल किंवा आणखी इतरही दिग्दर्शक असतील; चित्रपट हा सर्वस्वी दिग्दर्शकाचा आधी असतो. मग तो कलाकार वा इतरांचा असतो, हे इराणी सिनेमाने लोकांच्या मनावर अगदी तंतोतंत बिंबवले. विषयाचा आवाका आणि मानवी मन वा बुद्धीचा लागणारा कस हा किती परिश्रमातून लागतो, हे इराणी चित्रपट पाहिले की मगच समजते. आयातुल्ला खोमेनी यांची जुलमी राजवट असतानाही हे सगळे चित्रपट तयार झाले. इतक्या अशांततेत किती मोठे सिनेमे इराणमध्ये तयार कसे झाले, याचं आपल्याला नवल वाटल्याशिवाय राहत नाही. बरे, या सिनेमांमधून कुठेही सत्ताधारी राजवटीचं कौतुक नाही की लांगूलचालन नाही. उलट सतत सत्तेला जाबच विचारले गेले. यामुळे अनेक दिग्दर्शकांना तुरुंगवास भोगावा लागला. देशातून हद्दपार व्हावं लागलं. पण ते पुन्हा तुरुंगवासातून बाहेर येऊन सिनेमेच बनवत राहिले. हद्दपारी भोगून पुन्हा देशात येऊन पुन्हा त्याच ताकदीचे वा तोडीचे सिनेमे बनवत राहिले.

त्या तुलनेत आपण लोक कुठेही नाहीत. तेवढी धडाडी ना आपल्याकडील कलाकारात आहे ना दिग्दर्शकांमध्ये आहे. मुळात जात्याच स्वाभिमान असावा लागतो. तो आपल्यात अजिबातही नाही. आपल्याकडे अजूनही चित्रपटांत गाणीच म्हटली जातात. इतकी सवंगता लोकही स्वीकारतात. कारण आपल्याकडचे लोक आहेतच तसे. त्यांना जोखीम नकोय. जगण्यातील वा अन्य कशातीलही जोखीम ते पत्करतच नाहीत. आपल्या आजूबाजूला शोषणाची कितीतरी तीव्रता आहे. त्याची साधी रेघही इकडच्या चित्रपटांतून उमटत नाही. उलट सत्तेच्या समर्थनार्थ आपल्याकडे कुठल्यातरी चित्रपट फाईल्स असतात. द्वेष पेरणार्‍या.


अब्बास कियारोस्तामीचे ‘द सर्टिफाईड कॉपी’, ”टेस्ट ऑफ चेरी’, ‘द विंड विल कॅरी अस’ माजिदीचे ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’, ‘द कलर ऑफ पॅरडाईज’ ‘साँग्स आँफ स्पॅरो’ असगर फरहादीचे ‘सेल्समन’ ‘द सेपरेशन’ जफर पनाहीचे ‘द टॅक्सी’, ‘द सर्कल’, ‘शिरीन एक्लहासीचा ‘ब्लॅक कॅनव्हास’, तुराज अस्लानीचा ‘लॅण्डलेस’, पेगा अहंगारानीचा ‘माय फादर’ असे एकापेक्षा एक असे दर्जेदार सिनेमे आहेत. यातील बहुतांश सिनेमे मला चित्रपटगृहात वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांतून पाहता आले.

या चित्रपटांचं वैशिष्ट्य हे आहे की माणसांवर आणि जगण्यावर अतोनात असलेलं प्रेम. आपला देश, तेथील माती, तेथील माणसं, तेथील वर्तमान, तेथील लोकांच्या जगण्यातील भावविश्व. हे सगळं इराणी सिनेमात बेमालूमपणे येतं. ते असं येतं की जणू आपल्या समोर सिनेमा नाही तर प्रत्यक्ष लोकांचं जगणंच समोर आहे. इतकी त्यातील तीव्रता आपल्याला जाणवते. इराणी संगीत आणि त्या संगीतातील प्रतिमा. हा आणखी वेगळा विषय आहे.

या सिनेमांची आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, लहान लहान इराणी मुलामुलींचं भावविश्व. मुलांच्या भावविश्वाला इराणी सिनेमाने जितकं केंद्रस्थानी आणलं तितकं जगातील इतर कुठल्याही सिनेमांनी आणलं नाही. लहान मुलांविषयीच्या विविध सिनेमांतील प्रतिमा आपण पाहिल्या तर आपण हरखून जातो. आपल्याही जगण्यात असेच ताणतणावाचे वा लहान लहान सुखदुःखाच्या गोष्टींचे प्रसंग घडले आहेत, अरे हे तर आपणच आहोत, असं नकळतपणे आपल्याला जाणवतं. लहानग्यांच्या बारीक बारीक संवेदनशील जागांना इराणी सिनेमाने किती सचित्रपणे जिवंतपणा दिला. हे इराणी सिनेमे पाहिल्यावर कळतं.

दोन दिवसांपूर्वी १६५ इराणी मुली इस्राईल-अमेरिकेच्या बाँम्बहल्ल्यात ठार झाल्या. मला क्षणभर वाटलं की अरे असं कृत्य करणाराने इराणी सिनेमा पाहिला असेल का? जर त्याने तो पाहिला असता तर तो हे करायला धजावलाच नसता. काय अवस्था झाली असेल त्या बाळांची. काय करतो आहोत आपण? आपण माणूस म्हणून काय जगतो आहोत. तिथल्या कलाकारांच्या दृष्टीसमोर काय चित्र उभे राहिले असेल? इतक्या तीव्रपणे लहान मुलांचं निरागसपण किंवा त्यातून उमटणारी निष्पाप गोष्ट ही मी तरी जगातील इतर सिनेमांतून पाहिली नाही.

खरेच तुम्ही एखादा तरी इराणी सिनेमा पहा मित्रांनो! आपल्यापेक्षा जग किती प्रगल्भ आहे. आपल्यापेक्षा लोकांची चिंतनक्षमता, मानवी मनाचा विचार करण्याची तीव्रता, साधासोपा विषयही किती परिणाम करून जातो. आणि सिनेमा या कलेविषयी इराणी लोकांचं अफाट प्रेम आपल्याला जाणवेल आणि आपल्याकडचे सिनेमे किती तकलादू आहेत, हिंदी सिनेमामध्ाील आपल्याकडचे कलाकार, दिग्दर्शक किती सपक आहेत. हे ही लक्षात येईल. आपण कुठल्या लोकांना, कलाकारांना डोक्यावर घेत आहोत, याचाही मग आपल्याला अंदाज येईल. आपला भूगोल इराणपेक्षा किती वैविध्यपूर्ण आहे. अगदी शोषणासह. पण सिनेमे कसले भिकार असतात आपले. केवळ एकमेकांचे अनुकरण फक्त. अमुक कोटी जमवले. तमुक कमवले. अरे किती नाठाळपणा. असो.
आपल्या समोर मुस्लिम जगाची ओळख फार ‘क्रूर लोक’ अशीच केली गेली आहे. पण तसे नाही. काही राजवटी जुलमीच असतात. पण लोक तसे नसतात. बाललैंगिक अत्याचारामध्ये सहभागी असलेला अमेरिकेचा नीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पॅलेस्टाईनमधील किमान लाख लोकं ठार करणारा इस्राईलचा पंतप्रधान नेत्यानाहू ही देखील ‘क्रूर’ च आहेत. नव्हे तर ती माणसं माणूस म्हणवून घेण्याच्या लायक नाहीत.
सुदैवाने विद्यापीठापर्यंत कसाबसा शिकत शिकत आलो. हे सिनेमे नसते पाहिले तर किती मोठ्या आनंदाला वा समाधानाला आपण मुकलो असतो. याची जाणीव होते. हे इराणी सिनेमे विचार करायला भाग पाडतात. तुमच्यातील अंतर्मनाला कुठेतरी सांगतात की, बघ हे असंही जग आहे. फार चकचकीतपणाला कशाला भुलतोस. चांगली कपडे, नटव्या अभिनेत्र्या, नटवे अभिनेते, त्यांच्या अवास्तव गांडूळ हाणामार्‍या आणि बक्कळ मिळणारा पैसा म्हणजे काही सिनेमा नाही. लाऊड म्युझिक दाणदाण वाजणारी थिएटरं म्हणजे कला नाय रे! हळूच कुठेतरी सिंफनी वाजते. हळूच कुठेतरी उत्कटपणे सितार वाजते, तार वाजते, बासरी वाजते किंवा संतूर वाजते, जी आपल्या मनाचा ठाव घेते. इराणी संगीतातल्या प्रतिमा अशा वार्‍याच्या झुळकीसारख्या आपल्यापर्यंत अलगद वाहून येतात. आनंद देतात. किंवा हळूच एखादी जखम आपल्या मनावर कोरून जातात.

मी जवळपास सर्वच इराणी सिनेमांच्या प्रेमात आहे. अनेकदा हे सिनेमे पाहतो. तुम्हाला यूट्यूबवरही सिनेमे सापडतील. इराणी सिनेमांचा माझा स्वतंत्र संग्रह आहे. परंतु बहुतांश सिनेमे मी अनेक चित्रपट महोत्सवांतून पाहिले आहेत. हे चित्रपट मोठ्या टॉकिजलाच पहावेत. एकत्र कुटुंबाने पहावेत. खूप काही आहे.

युद्ध, धर्म, अस्मिता, प्रतिष्ठा, धार्मिक मूलतत्त्ववाद, बेगडी आदर्श या सर्वांच्या पलीकडे इराणी चित्रपट आहेत. सर्वसामान्य इराणी लोक कसे आहेत, हे इराणी सिनेमांतून आपल्याला समजते. आपण या बाबतीतही फारच मागास आहोत. इराणी लोकांची ही देखील एक तगडी बाजू आहे. अक्षरशः सिनेमा जगतात ते लोक.

Previous Post

भूमिका घेऊन जगलेले मुल्क राज आनंद!

Next Post

पंचतारांकित प्रेमकथा!

Next Post
पंचतारांकित प्रेमकथा!

पंचतारांकित प्रेमकथा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.