• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आयाराम गयारामांच्या हाती ‘मुन्शिपाल्टी’ !

योगेश वसंत त्रिवेदी (चौफेर)

marmik by marmik
March 10, 2026
in विशेष लेख
0
आयाराम गयारामांच्या हाती ‘मुन्शिपाल्टी’ !

भारतात दलबदलूंचे, पक्षांतराचे प्रचंड पेव फुटले आहे. बरं, हा रोग आत्ताचा नाही बरं. हा रोग फार फार जुना आहे. आणीबाणीच्या नंतरच्या काळात जनता पक्ष स्थापन झाला. झाडून सारे नांगरधारी शेतकरी निवडून आले. नांगरधारी शेतकरी निवडून आल्यानंतर मशागत जोरात सुरू होऊ लागली. परंतु या नांगरधारी शेतकर्‍यांना काय माहित की आपण केलेल्या मशागतीनंतर काही वर्षांनी दलबदलू-पक्षांतराचे पीक मोठ्या प्रमाणावर उगवणार आहे.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुण्याईने केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री चौधरी चरणसिंग यांच्या घाईने इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकले. पण वेळेवर आरोपपत्र दाखल केले नाही, म्हणून इंदिरा गांधी यांना न्यायालयाने ‘बाइज्जत बरी’ केले. झालं, बाई सण्णकन् वर आल्या आणि १९८० साली थेट सत्ताधीश झाल्या. मग झालं काय की हरियाणात जनता पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्री होते भजनलाल. जानेवारी १९८०मध्ये जनता पक्षाची राजवट उलथवून पुनश्च हरिओम करीत इंदिरा गांधी या जशा पंतप्रधान झाल्या, तसे लगेचच गुलदस्ता घेऊन त्यांचे अभिनंदन करायला गेलेले हरियाणाचे मुख्यमंत्री भजनलाल जाताना जनता पक्षाचे म्हणून गेले आणि येताना काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून परतले. अख्खेच्या अख्खे जनता पक्षाचे सरकार काँग्रेस पक्षाचे सरकार बनले. पक्षांतर, दलबदलूंच्या राजकारणाचे भजनलाल हे खरे शहेनशहा/मसीहा बनले असे म्हणावे लागेल.

त्यानंतर हा पक्षांतराचा रोग दिवसेंदिवस फोफावत चालला. मी माझ्या सुसंस्कृत भाषेत या कृतीला ‘राजकीय पर्यटन’ म्हणून संबोधतो. दलबदलूंना आयाराम गयाराम म्हणून संबोधले जाते. पक्षांतर प्रतिबंधक कायदा कितीही कडक करा, दोन तृतीयांश, एक चतुर्थांश सदस्य पक्ष सोडून गेले की अमुक केले जाते, तमुक केले जाते. १९९१ साली मधुकरराव चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष असतांना छगन भुजबळ हे १८ आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. सहा जण स्वगृही परतले. पुन्हा त्यातील तीन जण भुजबळांकडे गेले. १८-६-३-३ असे करता करता १५ जण भुजबळ यांच्याबरोबर राहिले. मधुकरराव चौधरी यांनी शिवसेना अ, शिवसेना ब, शिवसेना क अशा तीन गटांना मान्यता दिली. या १५पैकी केवळ कृष्णराव इंगळे हे विदर्भातून निवडून आले. छगन भुजबळ यांच्यासहित १४ जण १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले.

आता तर अगदी घाऊक पद्धतीने पक्षांतर होत आहे. तिथे न्यायदेवतेने डोळ्यांवरची पट्टी काढल्याने १०व्या अनुसूचीने ही पट्टी बांधून घेतली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात असलेला निर्णय तारीख पे तारीख भोगतोय. अजित पवारांचे अपघाती देहावसान झाले तरी पक्ष आणि घड्याळ सर्वोच्च न्यायालयात आशेने निकालाची वाट पहातोय. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर राज्यातील ‘म्युन्शिपाल्टीच्या’ निवडणुका पार पडल्या. पूर्वी नगरपालिका-महानगरपालिका यांना लोक म्युन्शिपाल्टीच म्हणत असत, तिथे सगळी उल्टी पाल्टी होत असल्याचा लोकांचा (गैर)समज आहे. तर या म्युन्शिपाल्टीमधल्या निवडणुकांनंतर सारा कारभार राजकीय पर्यटकांच्या म्हणजेच दलबदलू-आयाराम गयाराम यांच्या हातात आला असल्याचे दिसून येते. मुंबई महानगरपालिका सुद्धा अशा मान्यवरांच्या हाती (जनतेने) सुपूर्द केली आहे असे वाटते.
महापौर रितूताई तावडे या भारतीय जनता पक्षाच्या असल्या तरी त्या २०१२पर्यंत काँग्रेसमध्येच असल्याचे सांगण्यात येते. उपमहापौर संजय घाडी हे आधी शिवसेनेत मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नंतर पुन्हा शिवसेनेत आणि यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर टुण्णकन उडी घेत शिंदे गटात गेले. २०२२ पासून एकनाथी भागवत मनन चिंतन करणारे २०२२ पासूनचे नाथा’भाईं’चे निष्ठावंत बघतच राहिले आणि संजयभाईंनी उपमहापौरपदाचा फेटा बांधला की राव. ‘बेस्ट’ म्हणून ओळखण्यात येणारी आणि वाहतुकीच्या कोंडीत गटांगळ्या खाणारी ‘मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम’ या समितीचे अध्यक्षपद तृष्णा विश्वासराव या एकेकाळी मातोश्रीच्या
निष्ठावंत म्हणून ओळखण्यात येणार्‍या कार्यकर्त्या शिंदे गटात प्रवेश करत्या झाल्या आणि त्यांनी ‘बेष्ट’ अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. सुधार समिती अध्यक्षपद निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात गेलेल्या संध्या विपुल दोशी यांच्या हाती देऊन शहराची सुधारणा करण्यासाठी कंकण बांधले आहे. यापूर्वी झालेल्या नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील निवडून आलेल्या नगरसेवकांच्या यादीवर नजर टाकली तरी सारे राजकीय पर्यटक (आयाराम गयाराम) हेच दिसून येतात. भिवंडी, अंबरनाथपासून सार्‍या महाराष्ट्रात हेच चित्र थोड्या फार फरकाने दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर या भाजपच्या निष्ठावंत असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण आता त्यांनी महानगरपालिका शाळांमधून पक्षनिष्ठेचे, पक्षांतरबंदी-दलबदलूंना आळा घालण्यासाठी धडे शिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांनी एक अत्युत्तम प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला द्यावा आणि मागणी करावी की पक्षनिष्ठा राहावी. तसेच पक्षांतर करणार्‍यांना जबरदस्त जरब बसेल असा कायदा करावा. असा कायदा केंद्राकडे शिफारशींसहित पाठवावा.

आज भाजप सुपात आहे आणि बाकीचे पक्ष जात्यात आहेत. जर असेच सुरू राहिले तर भाजप उद्या जात्यात गेल्या शिवाय राहणार नाही. तूर्तास सर्वच दलबदलू अर्थात राजकीय पर्यटकांनी आपापल्या दालनात मोदी शाह यांच्या बरोबरीने दलबदलूंचे मसीहा हरियाणाचे पक्षांतर सम्राट भजनलाल यांचे भलेमोठे छायाचित्र लावून त्यांना प्रणाम करीत आपापल्या कामकाजाची सुरुवात करावी. तोवर आपण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर असणार्‍या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांबद्दल ते काय निकाल देतात, याकडे डोळे लावून बसू

या ! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी, असीम सरोदे, उल्हास बापट आदी मान्यवरांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या निकालात सुयोग्य फळ मिळेल का, हेच पहावे लागेल. लोकशाहीचा विजय असो!!

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

Previous Post

भ्रष्टाचाराची वाळवी महाराष्ट्राला पोखरतेय…

Next Post

विनाशाचा विडा कोणासाठी उचललाय..!

Next Post
विकासाच्या नावाखाली देश होणार भकास!

विनाशाचा विडा कोणासाठी उचललाय..!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.