
बबनला मी कित्येक वर्षांत पाहिलेलं नाही. आकड्यात सांगायचं तर किमान २६ वर्षांत आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही. याचं कारण तो २००० साली दादर पश्चिमेच्या स्टेशनसमोरच्या फुटपाथवरून दिसेनासा झाला. आधी तो कुठे गेला, अचानक का गायब झाला, हे कळलंच नाही. मग कोणी सांगितलं, पोलीस त्याला खूप त्रास द्यायचे, कोणी सांगितलं, त्याला मारहाण झाली. त्या अपमानामुळे तो इथून निघून गेला. काही दिवसांनी समजलं की टिळक पुलाच्या खाली त्याचं म्हणे दुकान आहे. तिथंच कुठे तो राहतो. पण कधी तिथं जाणं झालं नाही. कोणाला तरी तो दिसायचा, कधी भेटायचा. त्यामुळे ख्यालीखुशाली कळायची. स्टेशनरीचं छोटं दुकान होतं म्हणे. पण त्याची असंख्य वेळेस आठवण यायची.
दादरला उतरलो की पहिल्यांदा आठवायचा तो बबन…तो बबन आता ७५ वर्षांचा झाला. सामान्यांपासून कलाकार, पत्रकार आणि जवळपास सर्व क्षेत्रातील मान्यवरांना प्रेमाने चहा पिऊ घालणारा बबन आठवतोय तो तेव्हाचा. म्हणजे सुमारे ४०-५० वर्षांचा असतानाचा बबनच डोळ्यासमोर येतो.
बबनचं आडनाव कोणालाच माहीत नव्हतं, आताही नसेल. बबन कुठून मुंबईत आला, हे माहित नव्हतं. पण बबन शेकडो किंवा हजारो लोकांचा लाडका होता. मग तो नाना पाटेकर असो, प्रशांत दामले असो किंवा पत्रकार अंबरिश मिश्रा, प्रताप आसबे, विरल मुजुमदार, जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, विजयकुमार काळे, संतोष प्रधान, विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, जॉर्ज अब्राहम… टाइम्स
ऑफ इंडियापासून मिड डे आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, सकाळपासून संध्याकाळ, सांज लोकसत्ता आणि जन्मभूमी, प्रवासी, मुंबई समाचार अशा मुंबईच्या सर्व वृत्तपत्रांतील पत्रकारांचा तो आवडता चहावाला. रात्री कुठे भेटायचं तर बबनकडे हे ठरलेलं. रात्री दहा अकरा वाजल्यानंतर मग दादरच्या त्या फुटपाथवर विविध ठिकाणच्या पत्रकारांचा अड्डा जमायचा. तोपर्यंत कोण कोण येऊन गेलं आणि कोण कोण येण्याची शक्यता आहे, हे बबन सांगायचा. एखादा पत्रकार गावी गेला आहे वा आजारी आहे ही माहितीही त्याच्याकडे मिळायची आणि कोणाचं लग्न ठरलं, झालं वा कोणाला मूल झालं हेही बबनकडूनच कळायचं. खोटं वाटेल, पण उद्या अमक्या पेपरात तमकी हेडलाईन आहे आणि तमुक बातमी आहे, हेही बबनला माहीत असायचं.

त्याच्यापुढे जाऊन उभं राहिलं की तो हसत स्वागत करायचा आणि आसपास उभ्या असलेल्या इतरांशी बोलता बोलता आपली विचारपूस करायचा. मग आपण काय बबनशेठ, अशी सुरुवात करून कटिंग, उकाळा, चॉकलेट, बिनसाखरेचा असा जो हवा तो चहा वा कॉफी यांची ऑर्डर करून तिथं जमलेल्या इतरांशी गप्पा सुरू करायच्या. त्या गप्पा ऐकता ऐकता त्याचा चहा वा उकाळा तयार व्हायचा. मग तो याच चर्चेत भाग घेऊन, प्रभाकर नारकर वा राधाकृष्ण नार्वेकर येऊन गेले, अमुक तमुक हे सांगत होते, अशी माहिती द्यायचा. घाई असेल तर त्याच्याकडचा तयार चहा प्यायचा. मात्र चॉकलेट चहा वा उकाळा यासाठी तो त्याचा वेळ घ्यायचा. उगाच घाई नाही. पण तो प्यायल्यावर बबनकडे आल्याचं सार्थक झालं असं वाटायचं.
आपल्यापैकी कैक जण कित्येक टपरींवर वा अनेक चहावाल्यांकडे चहा प्यायलो असू. ते चांगला चहा बनवणारेही असतील. पण बबनकडचा चहा, तिथं होणार्या गप्पा आणि बबनकडून मिळणारी वेगवेगळी माहिती, यांना तोड नाही. त्याला शिवाजी मंदिर वा रवींद्र नाट्य मंदिरातील नाटकं, ती चालली आहेत वा नाहीत, अमुक नेत्याचं काय चाललंय इथपासून मेधा पाटकर आणि सिंधुताई सकपाळ यांच्या कामापर्यंतची सगळी बारीक सारीक माहिती तेव्हा असायची.
त्यामुळे एखादं रात्री दादरला उतरून बबनकडे गेलं नाही की रुखरुख लागून राहायची. तेव्हाच्या व्हीटीहून (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) कल्याण, अंबरनाथ, बदलापूरला जाणारे पत्रकारही दादरला वाकडी वाट करून बबनसमोर हजेरी लावायचे. पश्चिम रेल्वेचे विरार, वसई, भाईंदरवाले तर हमखास असायचे. कित्येकांनी बबनकडील चहा आणि गप्पा असा ‘चाय पे चर्चा’ करून शेवटच्या लोकलसाठी धावाधाव केल्याचं आठवतं. माझी तर दोनदा शेवटची लोकल चुकल्यानं टॅक्सी करून गोरेगावला गेल्याचंही आठवतंय.
बबन दिसायचा बराच काळा, बर्याचदा दाढीची खुरटं वाढलेली असायची. पण पायजमा आणि त्यावरीrल सदरा मात्र पांढरा स्वच्छ असायचा. नाही म्हणायला क्वचित चहाचे डाग पडायचे त्यावर. तो तसा स्वतःहून न बोलणारा. त्याला बोलतं करावं लागायचं. मग मात्र तो एखाद दोन किस्से, घटना वा माहिती द्यायचा. हात व डोळे उकळत्या चहाकडे आणि कान मात्र आसपास सुरू असलेल्या चर्चेत सहभाग असायचे. त्याला भालचंद्र नेमाडे माहीत असायचे आणि मंगेश पाडगांवकर वा वसंत बापट हेही.

अशा सार्या गोष्टींमुळेच विशेषतः पत्रकार व बबनची दोस्ती झाली असावी. नाट्य क्षेत्रातील कलाकारांची ओळख व दोस्ती होण्याचं कारण शिवाजी व रवींद्र यापेक्षा छबिलदासची नाट्य चळवळ हे होतं. बबनकडे आठवड्यातून बहुदा दोनदा पोहे असायचे. कांदे पोहे, बटाटे पोहे किंवा कधी पनीर पोहे. पनीर पोहे आयुष्यात पहिल्यांदा त्याच्याकडे खाल्ले. स्वतःच्या वा इतरांच्या घरी वा अन्यत्र इतक्या वेळा पोहे खाल्ले आहेत, पण त्याच्याकडील पोहे खरोखर अद्भूत. त्यात तो कोणता मस्ााला घालायचा कोणास ठाऊक. स्वाद व चव खूपच उत्तम. त्यावर शेव, कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे पसरून आणि लिंबाची फोड ठेवून तो ते द्यायचा. इडली करतो तशा भांड्यात खाली पाणी उकळत असायचं आणि वर त्या वाफेवर पोहे गरम व्हायचे. त्यामुळे ते अतिशय मऊ व मुलायम असत. ते कधीच चिकट नसत वा कोरडेही नसत.
एकदा पहाटे गावाहून आलो, दादरला गेलो. मी, पत्नी व मुलगा थेट उभे राहिलो बबनसमोर. चहा तर मिळणार होताच, पण पोहेही होते. तिघांनी ते खाल्ले. मुलाने आणखी एक प्लेट सांगितले. त्यानंतर कित्येकदा तो मला बबनकाकांकडून पोहे आण, असं सांगायचा. एकदा आई, भाऊ व मी पहाटे दादरला उतरलो, तेव्हाही त्याच्याकडे आमचा चहा पोहे बेत झाला होता.
डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३च्या दंगलीच्या काळात फेरीवाल्यांना पोलीस धंदा करू देत नसत. पण बबनला मात्र थोडी सूट होती, कारण पोलिसांनाही रात्री-अपरात्री चहा लागायचा. तेव्हा त्याच्यासमोर फार गर्दी करणं टाळावं लागत असे. त्या फुटपाथवर एक मावशी (त्यांचं नाव शालिनी बामणे) वृत्तपत्रे विकत. त्यांच्याकडे खारी, बिस्कीटं, टोस्टही विकायला असत. त्यामुळे चहा आणि टोस्ट वा खारी असं अनेकदा व्हायचं. १५/१७ वर्षांपूर्वी त्या मावशींचा उत्कृष्ट महिला वृत्तपत्र विक्रेत्या म्हणून टाइम्स समूहातर्पेâ सत्कारही झाला होता.
तेव्हा दुसर्या दिवशीचा नवाकाळ आदल्या रात्रीच यायचा आणि त्यानंतर थोड्या वेळाने दुसर्या दिवशीच्या दुपारचा संध्याकाळही यायचा. दुसरी पाळी करून घरी जाणारे कामगार रात्रीच हे पेपर घेत. तिथं एक वडापावचा स्टॉल होता, आणखी एक चहाचा स्टॉल होता आणि अपंग शिवसैनिक सूर्यकांत लाडे यांचा सार्वजनिक टेलिफोन बूथ होता. बूथसमोर फोन करायला आलेल्यांची रांग असे. लाडे यांचा भाचा पुढे पत्रकारितेकडे आला, त्यालाही बबनने केलेली मदतच बहुधा कारणीभूत आहे. तसं त्या भाच्याने नमूद केल्याचं मध्यंतरी वाचनात आलं होतं.
मग हा बबन गायब झाला तो कायमचाच. त्याची आठवण पत्रकारांमध्ये तर नेहमीच निघायची. जुन्या व चांगल्या आठवणीत रमायला कोणाला नाही आवडत? आणि बबनच्या चहाचे दिवस बर्याच जणांच्या तरुणपणाचे आणि करिअर करण्याचे होते. नंतरच्या काळात कलाकार व पत्रकार यांना असा चहावाला मिळालाच नाही. दादरच्या फुटपाथवर वा त्या परिसरात वैâक चहावाले असतील. पण बबन तो बबन. अंबरिश मिश्र हातातील पुस्तक, पेपर त्याच्याकडे देऊन निघून जायचा, तो थेट दोन तीन तासांनी यायचा. कोणी तरी बबनकडे पुस्तक ठेवून अमक्याला दे, असं सांगायचा. कित्येकदा बबन पैसे घ्यायला टाळाटाळ करायचा. पण कोणी त्याच्याकडे उधारी ठेवल्याचं वा पैसे बुडवल्याचं ऐकिवात नाही. बबननेही कधी कोणाकडून पैसे उधार घेतले नाहीत. तो स्वाभिमानीच आहे. त्यामुळेच पोलिसांचा त्रास सहन करण्यापेक्षा वा त्यांच्यापुढे वाकण्यापेक्षा तिथून निघून गेला.

त्याच्या वाढदिवशीच फोटोग्राफर गजानन दुधाळकरची पोस्ट पाहिली. जेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, लिंक्डइन नव्हतं, तेव्हा पत्रकारांसाठी या सगळ्या सुविधा एकत्रित असलेला बबन होता, तो ७५ वर्षांचा झाला, असं त्यानं व प्रशांत नाकवे याने लिहिलं होतं. गेल्याचं वर्षी बबनचा मोबाइल नंबर मिळवला होता. त्याला फोन केला, अभिनंदन केलं. तर तो म्हणाला, तुमच्या सर्व पोस्ट मी वाचतो. मी विचारलं, कुठे वाचतोस तू? तर म्हणाला ़फेसबुकवर. म्हणजे तो तिथं असल्याचं कळलं. त्यामुळे बबन असा सर्च दिला, तेव्हा त्याचा फोटो दिसला आणि त्याचं आडनाव केमकर आहे, हे समजलं.
त्याचं दुकान जिथं होतं, ती बिल्डिंग पुनर्विकासासाठी रिकामी केली. त्यामुळे बिल्डरने त्याला दादर पूर्वेला नायगाव रोडवर छोटी जागा दिली. पण एका इमारतीच्या आतील बाजूस. तिथं गिर्हाईक येत नाही, असं तो गेल्या वर्षीच म्हणाला होता. आता ती जागा त्यानं कोणाला तरी भाड्याने दिली आहे. तो राहतो टिटवाळ्याला. एक मुलगा बहारिनला असतो. तो गेल्या आठवड्यात घरी परतला. दुसरा मुलगा आयटी उद्योगात आहे. बबन व पत्नी घरी. आमचं चांगलं चाललंय, तब्येतही मस्त आहे, असं तो म्हणाला.
फेसबुकवर अनेक जण स्वतः काही लिहीत नाही. पण इतरांच्या पोस्ट वा फोटो ते शेअर करतात. त्या पोस्ट आणि फोटो यावरूनही व्यक्तीचा स्वभाव, विचार लक्षात येतो. बबनच्या वॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सॅम माणेकशा, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राजीव व राहुल गांधी, जयंत पवार, अरुण शौरी, पत्रकार रवीश कुमार, विनोद दुआ, पुण्यप्रसून वाजपेयी, अभिनेता दिलीप कुमार, नासिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, लता मंगेशकर, गायक मुकेश, ओशो, जे. कृष्णमूर्ती, मेधा पाटकर, सिंधुताई सकपाळ, संजीव अभ्यंकर, किशोर कदम, नाना पाटेकर, सुमित राघवन हे मान्यवर दिसतात. दंगलविरोधी पोस्ट शेअर केलेली दिसते. त्यातून बबनचा विचार दिसतो.

बबनला प्रत्यक्षात बबनशेठच म्हटलं जातं. पत्रकारांनी त्याच्याशी दादरमध्येच चाय पे चर्चा करण्याचं ठरवलं आहे. त्याला या वयात लोकल गर्दीचा त्रास होऊ नये, म्हणून बोरीबंदरला भेटावं असा विचार आहे. पण लाडक्या बबन केमकरचा ७५वा वाढदिवस नक्की साजरा होणार. तो इतर चहाविक्रेत्यांंपेक्षा खूप वेगळा. त्यामुळे वाढदिवस साजरा व्हायलाच हवा. त्याच्या चहाने कित्येक जणांच्या रात्री समृद्ध झाल्या आहेत आणि आनंदात गेल्या आहेत.

