केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतला, तेव्हा महाराष्ट्राने केवढा आनंद व्यक्त केला, तो शब्दात मांडता येणार नाही. अनेक ठिकाणी खाजगी आणि शासकीय कार्यक्रम आयोजित केले गेले. सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला. असाच जल्लोष माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीवरून आणला, तेव्हा मराठी माणसाने केला होता. दीड वर्षांपूर्वी तोच आनंद व्यक्त झाला. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या अभिमानावर शिक्कामोर्तब झाले.
केंद्राकडून किंवा दिल्लीश्वरांकडून असं काही जाहीर झाल्याशिवाय मराठी माणूस स्वतःला धन्य समजत नाही. ही परंपरा तशी जुनी आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ही परंपरा मोडीत काढली आणि स्वराज्यातील जनतेच्या प्रेमापोटी आग्रहापोटी शिवराज्याभिषेक करून घेतला. त्यासाठी कुण्या दिल्लीश्वराची मान्यता घेतली नाही. ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या’ या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमलेल्या, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला अहवाल १२ जुलै २०१३ रोजीच केंद्राकडे पाठवला गेला होता. त्या प्रयत्नांना ११ वर्षांनंतर यश आले. मराठी भाषा दोन हजार वर्षांहून अधिक जुनी आहे. हे या मराठी भाषा समितीने पुराव्यानिशी सिद्ध केले. तीच तिच्या अभिजाततेची खात्री होती.
पहिली गोष्ट म्हणजे ‘अभिजात म्हणजे काय रे भाऊ’ असा प्रश्न अनेक मराठी माणसांच्या(च) कपाळावर पडलेल्या आठ्यांमधून आजही दिसून येतो. अभिजात म्हणजे काय? तर फार जुनी, प्राचीन अशी भाषा अथवा संस्कृती. त्या निकषाला पात्र ठरण्याइतकी मराठी भाषा जुनी असल्याचे पुरावे आहेत. कोणतीही भाषा ही पंधराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीची असली पाहिजे, हा निकष मराठी भाषेने पूर्ण केला आणि ती अभिजात ठरली. ही भाषा जशी तेव्हा होती तशीच आज नाही. कोणतीही जिवंत भाषा अशी एका काळात जन्मून जशीच्या तशी राहात नाही. तिच्यावर नवनवीन संस्कार होतात, तिच्यात नवे शब्द दाखल होतात. मराठीही कोणा एका व्यक्तीने, समाजाने, गटाने एका काळात तयार केलेली नाही, तर ती लोकव्यवहाराची बोलीभाषा म्हणून विकसित झाली आणि अजूनही तशी होतेच आहे.
आपल्या राज्याला मोठी संतपरंपरा (आपल्याकडे एकाही ‘देवा’ने, म्हणजे नंतर देव मानल्या गेलेल्या महापुरुषाने जन्म घेतलेला नाही) आहे. संतांनी लिहिलेले काव्य, साहित्य, अभंग, ओव्या ह्या रचना मराठीतूनच आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी तर थेट भगवद्गीतेचेच मराठीकरण केलं. पसायदान ही विश्व प्रार्थना मांडली. त्यानंतर संत नामदेव (नामदेवांनी तर मराठीचा डंका पंजाबमध्ये वाजवला. संत कबीरांच्या दोह्यात मराठीचा वापर आहे), संत एकनाथ, संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इथपासून ते आताच्या सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांनी मराठीचा झेंडा पार अटकेपार नेला आहे. ब्रिटिशांनी लिहिलेल्या अनेक साहित्य, नोंदी, यांचा मराठी अनुवाद झाला आहे. अनेक परदेशी नागरिकांना मराठी भाषा शिकावी असे वाटते. मराठी भाषिकांना आपल्या भाषेचा अभिमान वाटावा म्हणून या भाषेत काव्य, नाट्य आणि गद्य लेखनात अजरामर रचना केलेले ज्ञानपीठकार वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवसच (२७ फेब्रुवारी) आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो.
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यामागचे राजकारण हे सत्तेचे, निवडणुकीचे राजकारणच आहे. त्यामुळे त्या भागावर वेळ न घालवता यावर लक्ष केंद्रित करायला हवे की एखाद्या भाषेला असा दर्जा मिळाल्यानंतर नेमकं होतं काय? तर वर्षाला चार-पाच कोटी रुपये केंद्राकडून त्या भाषेच्या संवर्धन, संरक्षण आणि संपादन यासाठी मिळतात. यातून मराठी माणसाने किंवा अमराठी माणसांने मराठी भाषेचा सखोल अभ्यास करावा, अध्ययन करावे, भाषा अधिक समृद्ध करावी, जुने साहित्य, हस्तलिखित जपून ठेवावे असे अभिप्रेत आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जातात. केंद्राने वर्षाला चार-पाच कोटी रुपये देण्यासाठी अनेक अटी घातलेले आहेत. त्यातील पहिली अट आहे. राज्याने एक अद्यावत असे एक्सलन्स सेंटर अर्थात अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन केले पाहिजे. त्यानंतर या सेंटरकडून प्रस्ताव पाठवले जावेत, मग आम्ही ठरवू तुम्हाला निधी द्यायचा की नाही ते.
मराठी आणि मराठी माणूस याविषयी केंद्राची नेहमीच आकसाची भूमिका राहिलेली आहे, मग ते सरकार कोणाचेही असो. ही भूमिका जुन्या काळापासून आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी औरंगजेबाने सरदारांच्या रांगेत शेवटी उभे केले होते. त्यात सत्तास्थानी गुजराती माणूस असेल तर हा आकस वैâकपटींनी वाढतो, हे मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील आंदोलनात दिलेल्या गोळीबाराच्या आदेशाने लक्षात येते. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे १०५ हुतात्मे झाले आणि गुजरातला मुंबई मिळाली नाही. सध्या दिल्लीश्वर दोन पॉवरफुल गुजराती आहेत. त्यांचा आकस किती असू शकेल ते पदोपदी लक्षात येते. ही सल जुनी आहे. महाराजांनी दोन वेळा सुरत लुटण्याचा राग गुजरात्यांच्या (ज्यांना इतिहास माहित आहेत त्यांना) मनात पिढ्यानपिढ्या धगधगत आहेत. म्हणूनच ‘मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची’ अशी एक घोषणा कधीकाळी दिली गेली होती. त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले उत्तर जबरदस्त आणि इतिहास लक्षात ठेवेल असे होते. बाळासाहेब म्हणाले होते ‘बायका तुमच्या आणि पोरं आमची.’ या ठाकरी भाषेच्या उत्तराने त्यानंतर कधीही कोणताही गुजराती पुन्हा ‘मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची’ बोलला नाही. गुजराती माणसाचा मराठी द्वेष
आजही तसाच कायम आहे. नाही तर अरबी समुद्रात महाराजांचा अश्वारूढ पुतळा कधीच उभा राहिला असता.
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी मराठीसाठी केंद्राने १०० कोटी जाहीर केले असते तर त्यात काय बिघडले असते? याच मराठी माणसाच्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारला देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ३९ टक्के हिस्सा जातो. त्यावर अर्धा देश पोसला जातो. त्याच महाराष्ट्राला, येथील भाषेला शंभरेक कोटी दिले गेले असते तर काय फरक पडला असता? दोन-चार कोटीच्या अनुदानासाठी पहिल्यांदा सेंटर स्थापन करा, प्रस्ताव द्या, नंतर बघू ही उत्तरे मराठी भाषा विभाग अधिकार्यांना आणि मंत्र्यांना दिल्ली दरबारात ऐकावी लागत असतील तर आपण आजही दिल्लीश्वरांसमोर लाचार, दयनीय, दिनदुबळे आहोत हे सिद्ध होते. त्याऐवजी महाराजांना शोभेल असे परखड उत्तर द्यायला हवे होते. ‘तुम्ही अभिजात दर्जा दिलात त्याबद्दल धन्यवाद! मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकार आणि मराठी माणूस सक्षम आहे. हा महाराष्ट्र आहे. त्याच्या नावातच ‘महा’ म्हणजे महान आहे. त्याने आतापर्यंत देशाला नेहमीच आधार दिला आहे. तुमचा निधी वगैरे आम्हाला नको. तीन चार कोटी तर आम्ही एका मराठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करतो. समृध्दी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो यांच्यासारखे हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही उभारतो. तेव्हा आमचा निधी यापूर्वी अभिजात दर्जा दिलेल्या तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू,मल्याळम, ओडिया, पाली, प्राकृत, असामीया, बंगला या भाषांना द्या,’ असे सांगण्याची हिंमत महाराष्ट्र सरकार का करत नाही?
भाषेविषयी किती आग्रही आभिमानी, स्वाभिमानी असले पाहिजे ते फक्त दक्षिणेतील कर्नाटक, केरळम, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू या चार राज्यांकडून शिकावे. दक्षिणेत गेलात तर तुम्ही कितीही इंग्रजी, हिंदी झाडा. ते पहिल्यांदा त्यांच्या भाषेतूनच उत्तर देणार. बरोबर याउलट महाराष्ट्रातील चित्र आहे. आपली सुरुवातच मुळात हिंदी अथवा इंग्रजीतून होते. साध्या पाणीपुरीवाल्या भैय्याला पण आपण ‘भय्या वैâसा दिया’ असेच पहिल्यांदा विचारतो, मग तो इथे पिढ्यानपिढ्या राहून मराठी शिकण्याचे कष्ट कशाला घेईल?
ज्याला भाषेचा अभिमान नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही, हे धर्माच्या नावाने गुजरातच्या आणि सर्वार्थाने मागासलेल्या उत्तर भारताच्या नादी लागलेल्या मराठी भाषिकांना वेळ टळून जाण्याच्या आत कळो, याच शुभेच्छा मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर द्यायला हव्यात.

