• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अज्ञातवासातून बाहेर

सचिन परब (प्रबोधन-१००)

marmik by marmik
March 17, 2026
in प्रबोधन १००
0
गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार

पण आयुष्यात आलेल्या तथाकथित शनीच्या तथाकथित साडेसातीची कोंडी फोडण्यासाठी थेट शनिमाहात्म्याच्या पारायणाचा नाही, तर चिकित्सेचा वापर करण्याची प्रबोधनकारांना स्फुरलेली कल्पनाच अफाट आहे. सगळ्या अडचणींचा डोंगर दूर सारून या कल्पनेला पुस्तकरूपाने वास्तवात आणण्याचा त्यांची हिंमतही असामान्यच मानावी लागेल.

आजारपणं आणि संकटांनी सगळं उद्ध्वस्त झालं होतं. निराशा दाटून आली होती. त्यामुळे ज्योतिषांची गर्दी आजूबाजूला गोळा झाली होती. पण एके दिवशी प्रबोधनकारांना तात्याजी महिपती लिखित शनिमाहात्म्य या पोथीची चिकित्सा करण्याची कल्पना डोक्यात चमकली. मग त्यांनी ज्योतिषांना घरात प्रवेश बंद केला. सगळी निराशा झिडकारून लावली. आणि पुस्तक लिहायला सुरुवात केली. संकटांच्या आणि नैराश्याच्या गर्तेतून आपल्याला सर्वाधिक आनंद देणारी गोष्टच बाहेर काढू शकते. प्रबोधनकारांच्या बाबतीत ते त्यांचं तडाखेबंद लिखाण होतं. तीच त्यांची आवड, छंद आणि प्राणही होता. त्यांनी पुस्तक लिहायला सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे या पुन्हा उभं राहण्याच्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रातून मदतीचे अनेक हात सरसावून पुढे आले.
मासिक प्रबोधन आणि साप्ताहिक लोकहितवादी आता सुरू नाही. प्रबोधनचा छापखाना पुण्यात बंद पडला आहे. प्रबोधनकार मुंबईत दादरला हतबल होऊन पडले आहेत. अत्यंत दारिद्र्यात कुटुंबाला कसेबसे सांभाळत आहेत. ही बातमी हळूहळू महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रभरातून त्यांना सहानुभूती दाखवणारी तसंच उत्साह वाढवणारी पत्र रोज येऊ लागली. काही जण तर आर्थिक मदतही पाठवू लागले.
प्रबोधनकार सांगतात, या मदत करणार्‍यांमध्ये श्रीमंत कमीच, गोरगरीब कष्टकरी, शेतकरीच जास्त होते. त्यांनी मुंबईतले कामगार नेते तुकाराम पुजारी यांचा आवर्जून उल्लेख केला आहे. प्रबोधनकार लिहितात, कित्येक स्थानिक कामगार मंडळी वरचेवर मला भेटायला येऊन अल्पस्वल्प द्रव्यसहाय्यही करीत असत. त्यांत तुकारामजी पुजारी या स्नेह्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. दर आठ-पंधरा दिवसांनी तुकारामजी आपल्या पाचसहा सवंगड्यांसह अगत्याने मला भेटत असत. मी एक नवीन पुस्तक लिहीत आहे हे पाहून ही मंडळी उत्साहित झाली. तुकारामजी मला म्हणाले, `दादासाहेब, अंधारातून बाहेर येण्याचा हाच खरा मार्ग, तुमच्या लेखणीच्या प्रभावावरच तुमचे सारे भविष्य तेजाळ होणार आहे. प्रयत्न हाच परमेश्वर. ग्रंथलेखन पुरे झाले म्हणजे पुढच्या छपाईची सारी व्यवस्था आमच्याकडे लागली.

तुकाराम पुजारींचे शब्द भविष्यात खरे ठरले. त्यांच्या या शब्दांनी प्रबोधनकारांनाही प्रेरणा मिळाली. त्यांना यातून धडाच मिळाला. ते लिहितात, तुकारामजीसारख्या श्रमजीवी कामगार मंडळींच्या या उत्तेजनाने माझ्या कर्तृत्वाला विलक्षण कलाटणी मिळाली. विचारवंत म्हणून मिरविणार्‍या माझ्या डोळ्यांत एका श्रमजीवी मित्रमंडळाने प्रयत्नवादाचे चरचरीत अंजन घातले, नव्हे का? पुस्तक लिहून पुरे होण्याच्या आधीच या तुकाराम मंडळाने आगाऊ एक रुपया देणारे एक हजार ग्राहक नोंदविण्याची कामगिरी पुरी केली. एक हजार ही त्या काळात फारच मोठी रक्कम होती. हातात एक आणा नसलेल्या परिस्थितीत पुस्तक लिहिण्यासाठी वाचकांकडून एक हजार प्रतींची नोंदणी म्हणजे एक हजार रुपयांचं आश्वासन, ही प्रबोधनकारांच्या तोवरच्या लेखन कर्तृत्वाला मिळालेली सलामीच होती.
पुस्तकाची छापील किंमत दीड रुपया होती. पण पूर्वनोंदणी म्हणून तुकारामजींना एक रुपये किमतीला हे पुस्तक दिलं असावं. विशेष म्हणजे पुस्तक छापून बाहेर येताच त्यांनी एकगठ्ठा हजार रुपये देऊन हजार प्रती नेल्या. आज साक्षरता इतकी वाढली असताना हजार प्रतींची पुस्तकाची एक आवृत्ती छापताना मराठी प्रकाशकांची दमछाक होते. तेव्हा ही किती मोठी गोष्ट असेल? एकटे तुकारामजीच नाहीत, तर प्रबोधनकारांचे ठाण्यातील मित्र ताम्हाणे बंधू यांनी कागदाची रिमे पुरवली. मुंबईच्या गिरणगावातल्या काळाचौकी रोडवरचे औषध विक्रेते गोविंदराव शिंदे यांनी कव्हरचा कागद घेऊन दिला. प्रबोधनकार सांगतात, यावेळी खरोखरच ‘अनंतहस्तेकमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी माझी अवस्था झाली.`

शनिमाहात्म्य या पुस्तकाच्या मनोगतात प्रबोधनकारांनी या मदत करणार्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे, नाठाळ अपकारकर्त्यापेक्षा स्नेहाळ उपकारकर्त्यांची संख्या मला फार मोठी लाभलेली आहे. हा श्रीहरीचा मजवर मोठा प्रसादच होय. प्रस्तुत पुस्तकाची कल्पना निघाल्यापासून तो ते आज प्रसिद्ध होत अनेक मित्रांनी मला अनेक प्रकारचे सहाय्य दिले. त्या सर्वांच्या चरणी मी आदरपूर्वक माथा ठेवून,माझ्या हृदयस्थ कृतज्ञ भावनांना व्यक्त करीत आहे. विशेषत: गेल्या नऊ महिन्यांच्या माझ्या अज्ञातवासाच्या काळ्याकुट्ट काळात प्रबोधनाच्या हजारो आश्रयदात्यांनी मुद्दाम क्षेमसमाचार पुसला, मला उत्तेजनाचे संदेश व भेटी दिल्या, आणि कित्येकांनी सांपत्तिक मदत पाठविली, ही जनता-जनार्दनाची कृपादृष्टी माझ्या नेत्रातून आनंदाश्रूंची अखंड वृष्टी पाडीत आहे. देवाची सेवा मजकडून आमरण अव्यंग व अभंग घडो!

शनिमाहात्म्य पुस्तकाची पहिली आवृत्ती आता आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्यात प्रकाशनाची तारीख लिहिलेली नाही. पण लेखकाच्या मनोगतातली नोंद `अनंतचतुर्दशी, २८ सप्टेंबर १९२८`ची आहे. म्हणजे या वर्षाच्या सप्टेंबर ऑक्टोबरात हे पुस्तक आलं असावं. १९२७च्या नोव्हेंबरमध्ये प्रबोधनकार पुण्यातून मुंबईला आले होते आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं. याचाच अर्थ जवळपास एक वर्ष ते शून्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत होते. प्रबोधनकारांनी म्हटलंय तसा हा नऊ महिन्यांचा अज्ञातवास होता. शनिमाहात्म्याने संकटांची आणि औदासि‍न्याची कोंडी फोडली. तो अज्ञातवास संपवला.

या पुस्तकावर छापून आलेलं पुस्तकाचं पूर्ण नाव शनिमाहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या ़फेर्‍याचा उलगडा असं होतं. हे पुस्तक नेहमीच्या प्रबोधन प्रकाशन या नावाने आलेलं नाही. यात प्रकाशन संस्थेचं नाव आहे, बाळ आाणि कंपनी. हे महत्त्वाचं यासाठी की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा पहिला लिखित उल्लेख आहे. बाळासाहेब तेव्हा उण्यापुर्‍या तीन वर्षांचेही नव्हते. पण प्रबोधनकारांनी या कंपनीला कौतुकाने आपल्या मुलाचं नाव दिलं होतं. कंपनीचा पत्ता होता, प्रभाकर चित्रे, १० मिरांडा चाळ, दादर, मुंबई १४. प्रभाकर चित्रे हे प्रबोधनकारांसोबत पुण्यात प्रबोधन छापखान्यात काम करणारे निष्ठावान सहकारी होते. ते प्रबोधनच्या छपाईबरोबरच विक्रीचीही जबाबदारी घेत. पुण्यात सायकलवरून प्रबोधन विकत, असा उल्लेख जीवनगाथेत आला आहे. त्याआधी ते मजूर या दिनकरराव जवळकरांच्या नियतकालिकासाठी काम करत असल्याचाही संदर्भ जीवनगाथेतच सापडतो. गिरगावाच्या विक्रम छापखान्यात हे पुस्तक छापण्यात आलं होतं.

माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्य हे पुस्तक काय आहे, हे सांगताना लिहिलंय, ज्योतिषांच्या भाकिताच्या जाळ्यात सापडून कृतिशून्य प्रयत्नशून्य बसण्यापेक्षा जिद्दीने प्रयत्नांची कसोशी करीत रहाण्यात पुरुषार्थाची सिद्धी असते, हे अट्टहासाने सांगण्यासाठीच मी या कर्मकहाणीचा एवढा प्रपंच केला आहे. मनुष्य कितीही विद्वान असला, कितीही विचारवंत असला तरी संकटाचा एखादा फटका लागताच ज्योतिष्याच्या मोहजालात अडकण्याचा धोका तो टाळू शकतो असे नाही. पण तो टाळलाच पाहिजे. लोकांनी या फंदात पडू नये म्हणून आतातुर्क केमाल पाशाने ‘रमल’चा धंदा फौजदारी गुन्हा ठरविला. आपल्याकडे केंद्रातही ज्योतिष्याला ठाणदारी लाभलेली आहे. मग इतरांची कथा ती काय?

प्रबोधनकारांचं इतर लिखाण वाचलेल्या वाचकाला हे पुस्तक म्हणजे ठाकरी शैलीतली शनिमाहात्म्य या पोथीची चिरफाड असावी, असंच कुणालाही वाटेल. पण तसं नाही. या पुस्तकाच्या पूर्वी आणि नंतरही अशा पौराणिक पोथ्यांची प्रबोधनकार जशी तोडफोड चिकित्सा करत होते, तसं इथे नाहीय. ते ज्योतिषशास्त्राला पूर्णपणे नाकारताना दिसत नाहीत. शनीच्या साडेसातीलाही नाकारत नाहीत. शनिमाहात्म्याच्या पोथीतल्या विक्रमाच्या कथेलाही पूर्णपणे नाकारत नाहीत. ते इथे टोकाचे सत्यशोधक चिकित्सक नाहीत, तर सामान्य वाचक म्हणून शनिमाहात्म्याच्या पोथीकडे बघतात. त्यांच्या चिकित्सेत त्यांच्या इतर लिखाणात फारसा न सापडणारा एक मध्यममार्ग आहे.

या पुस्तकाच्या लिखाणामागचा वैचारिक पवित्रा प्रबोधनकारांनीच नोंदवलेला आहे. तो त्यांच्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा वेगळा आहे, म्हणून महत्त्वाचाही, प्रस्तुतच्या `शनिमाहात्म्य पुस्तकात कै. गुरुवर्य आगरकरांची नितांत नास्तिक वृत्ती, ज्योतिषी लोकांची आंधळी आणि भेदरट प्रकृती किंवा तात्याजी महिपतीची नैराश्यवाद प्रवर्तक पौराणिक फलश्रुति, यांपैकी एकाही मार्गाचा अवलंब मी केलेला नाही. केवळ एक संसारी, या नात्याने माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला जे जे आले आणि स्वाध्याय चिंतनाने मी त्यांचा जसा जितका विचार केला, तोच विचारांचा शब्दपट वाचकांपुढे प्रणिपातपूर्वक मी उघडून ठेवीत आहे.`
शनिमाहात्म्य लिहिताना प्रबोधनकारांची वैचारिक भूमिका काय होती, यापेक्षाही त्यांची मानसिक स्थिती कशी होती, ते जास्त महत्त्वाचं होतं. कारण ते कितीही आक्रमक असले तरी माणूस होते. यशाच्या शिखरावर असताना आलेल्या जीवघेण्या संकटांनीही तेही हादरलेले होते. ती मानसिक स्थितीही त्यांनी वैचारिक पवित्र्याच्या पुढेच नोंदवलेली आहे. ती अशी, प्रत्येक प्रकरण म्हणजे माझ्या विचार व आचार क्रांतीचे एकेक चढती पायरी असल्यामुळे, ‘ग्रहदशेच्या फेर्‍याचा उलगडा’ मी कोणत्या रीतीने केला, ह्याची वाचकांना स्पष्ट कल्पना येईल. शनिमाहात्म्यावर मी विचार करू लागल्या दिवसापासून तो हे पुस्तक लिहून हातावेगळे होईपर्यंत माझ्या बावरलेल्या चित्तवृत्तीला असामान्य शांती, स्थैर्य व धैर्य प्राप्त झाले. माझ्या परिस्थितीतल्या प्रत्येक वाचकास, या पुस्तकाच्या मननपूर्वक वाचनाने, तोच अनुभव येईल, अशी माझी खात्री आहे. केवळ काहीतरी वाचायचे म्हणून हे पुस्तक वाचणारांना, त्यातली आत्मीयत्वाची तिडीक उमगणे शक्य नाही. ज्याला जन्मात कधी ओरखडाचा अनुभव नाही. त्याने दुसर्‍याच्या जखमेची टायली खुशाल करावी!

प्रबोधनकार हे पुस्तक लिहिताना मोठ्या संकटातून हळूहळू सावरत होते. ते म्हणतात तशी त्यांची चित्तवृत्ति बावरलेली होती. त्यामुळे कुणावर आक्रमण करण्याच्या तयारीत ते नव्हते. ते हे सगळं स्वतःला शांत करण्यासाठी लिहत असावेत. अर्थातच त्यातही त्यांच्यातला आक्रमक सत्यशोधक अधूनमधून डोकावत राहतोच. पण त्याने हे पुस्तक प्रभावित केलेलं नाही. हे अडचणीत सावरण्याच्या धडपडीच्या प्रक्रियेतलं लिखाण आहे. त्यामुळे वाचकांनीही आत्मीयतेने या पुस्तकाचं वाचन करावं, अशी विनंती ते करताना दिसतात. नेहमीप्रमाणे ते वाचकांना विचारांमधल्या परिवर्तनासाठी आव्हान देत नाहीत. ते स्वतःच्या दुःखाचा काळ आठवून आपलं दुःख समजून घेण्याची विनंती करताना दिसतात. हे प्रबोधनकार वेगळे आहेत.
पण आयुष्यात आलेल्या तथाकथित शनीच्या तथाकथित साडेसातीची कोंडी फोडण्यासाठी थेट शनिमाहात्म्याच्या पारायणाचा नाही, तर चिकित्सेचा वापर करण्याची प्रबोधनकारांना स्फुरलेली कल्पनाच अफाट आहे. सगळ्या अडचणींचा डोंगर दूर सारून या कल्पनेला पुस्तकरूपाने वास्तवात आणण्याचा त्यांची हिंमतही असामान्यच मानावी लागेल. हे पुस्तक वाचताना आपल्याला प्रबोधनकारांच्या जीवनकहाणीचा एक कवडसाही हाती लागतो. तोदेखील या असामान्यत्वाचाच प्रत्यय देतो.

Previous Post

कर्जमाफीचं खरंखोटं वास्तव

Next Post

गोविंददेवांना न आकळली ऐश्वर्याची वचनाक्षरे!

Next Post
गोविंददेवांना न आकळली ऐश्वर्याची वचनाक्षरे!

गोविंददेवांना न आकळली ऐश्वर्याची वचनाक्षरे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.