
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली नसली तरी खर्या अर्थाने मुंबईत मूळ शिवसेनेचाच विजय झाला आहे. ‘मुंबई म्हणजे ठाकरे आणि मुंबई म्हणजे शिवसेना’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कारण ठाकरे बंधुंच्या पारड्यात मराठी मतदारांनी ७,९२,६८२ मते टाकली आणि मूळ शिवसेनेने ६५ जागा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ७ जागा जिंकून मुंबई ठाकरेंचीच हे पुन्हा अधोरेखित केले.
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे डबल इंजिन सरकार असताना ते ९०चा आकडा देखील गाठू शकले नाही. माझ्याकडे आजी-माजी १२५ नगरसेवक आहेत असे फुशारकी मारणारे एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी १२५ जागांची मागणी करीत होते. त्यांना ९० जागाच मिळाल्या. त्यापैकी ते २९ जागाच जिंकून आणू शकले. भाजपा-शिंदेसेनेकडे सत्ता होती, अमाप पैसा वाटला, त्याशिवाय भाजपप्रणीत निवडणूक आयोगाची यंत्रणा होतीच. मुंबईतील मतदारांना नाना आमिषे दाखवण्यात आली आणि खोट्या आश्वासनांची खैरात केली गेली, तरी महायुतीच्या झोळीत मतदारांनी सीमित यश टाकले. बहुमताचा ११४चा आकडा गाठताना महायुतीची दमछाक झाली. १५० जागा जिंकून मूळ शिवसेनेला पूर्ण उद्ध्वस्त करायचे आणि ‘ठाकरे ब्रॅन्ड’ संपवायचा असा विडा उचललेल्या भाजपा-शिंदेसेनेने साम-दाम-दंड-भेद नीती वापरली. तरी त्यांचे ते गणित मुंबईतील मराठी मतदारांनी आणि सच्च्या मुंबईकरांनी ते जमू दिले नाही. भाजपचा उधळणार्या वारूला मुंबईत रोखण्यात ठाकरे बंधूंना चांगले यश मिळाले.
मुंबई ही ठाकरेंचीच आहे हे महाराष्ट्राला वाटते. तसेच महाराष्ट्राच्या बाहेरच्यांना देखील वाटते. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठासून सांगितले आहे की, ‘‘मुंबई शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी खणखणीत यश मिळवले आहे. शिंदेसेनेपेक्षा कितीतरी जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या निवडून आल्या आहेत. तेव्हा खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे.’ त्याचवेळी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल एका पत्रकार परिषदेत म्हणाले की ‘मुंबईकर भाजपच्या विरोधात आहेत. जंग-जंग पछाडून देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. उद्धव ठाकरेंच्या खर्या शिवसेनेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.’’
साडेतीन वर्षांपूर्वी तथाकथित महाशक्तीने शिवसेनेचे नाव चोरले, चिन्ह धनुष्यबाण चोरले आणि गद्दारांना दिले. भाजप कागदावरची शिवसेना संपवू शकली. पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकली नाही. हे मूळ शिवसेनेने वेळोवेळी सिद्ध केले आहे. लोकसभा २०२४च्या निवडणुकीत शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले तर भाजपाचे फक्त सात आले होते. विधानसभा २०२४मध्ये मूळ शिवसेनेचे २० आमदार निवडून आले होते. त्यापैकी एकट्या मुंबईतून १० आमदार निवडून आले. त्याआधी लोकसभा निवडणुकीत मुंबईत तीन जागा जिंकल्या होत्या. एक जागा अवघ्या ४८ मतांनी गेली. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ६५ जागा जिंकल्या असून शिवसेना आणि मनसे मिळून ७२ जागांवर खणखणीत विजय मिळवला. मुंबईवरील आपला ठसा पुसू दिला नाही.

मुंबई मनपा निवडणुकीत एकूण ५६,६४,४१२ मतदान झाले. मूळ शिवसेनेला एकूण ७,१७,७३६ मते मिळाली आहेत, तर शिंदेसेनेला २,७३,३२६ मते मिळाली. म्हणजे जवळ-जवळ तिप्पट मते मूळ शिवसेनेला मिळाली आहेत. एकूण मतदानापैकी १३.१३ टक्के मते मूळ शिवसेनेला मिळाली तर शिंदेसेनेला अवघी पाच टक्के मिळाली. म्हणजे शिंदेसेनेपेक्षा अडीच पट जास्त ही टक्केवारी आहे. एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताच्या टक्केवारीत देखील मूळ शिवसेनेने खूप मागे टाकले आहे. मूळ शिवसेना २७.५२ टक्के तर शिंदेसेना १०.४८ टक्के अशी आकडेवाडी आहे. नेहमी स्ट्राईकरेटच्या गप्पा मारणार्या एकनाथ शिंदेंना मुंबईच्या स्वाभिमानी मराठी मतदारांनी चांगली चपराक मारली आहे. ९१ जागा लढवणार्या शिंदेसेनेचे अवघे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट ३२ टक्के तर मूळ शिवसेनेचा ४१ टक्के आहे. ८९ जागा जिंकणार्या भाजपला एकूण मतदान ११,७९,२७३ इतके झाले आहे. ८९ जागांपैकी त्यांचे ३४ नगरसेवक अमराठी आहेत. त्यामुळे भाजपाच्या मतदानाचा आकडा वाढला. मुंबईतील मराठी मतदारांनी मात्र भाजपा-महायुतीऐवजी ‘ठाकरे बंधूंवर’ विश्वास दाखवला आहे.
मुंबईत खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच हे मुंबईतील मराठी मतदारांनी दाखवून दिले आहे. शिंदेसेनेविरुद्ध झालेल्या थेट ५१ लढतींमध्ये ३५ जागांवर मूळ शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत तर शिंदेसेनेचे केवळ १६ उमेदवार निवडून आले आहेत. मुंबईतील मराठीबहुल भागात मूळ शिवसेनेने बाजी मारली आहे. दादर, माहिम, प्रभादेवी, शिवडी, परळ, लालबाग, वरळी, भायखळा, धारावी आदी भागांत तर दणदणीत आणि खणखणीत विजय प्राप्त केला आहे. पश्चिम उपनगरात थोडी पीछेहाट झाली असली तरी पूर्व उपनगरांत लक्षणीय विजय प्राप्त केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बलाढ्य धनशक्ती-सत्ताशक्ती समोर आणि भाजपाप्रणित निवडणूक यंत्रणेसमोर जिकरीने मूळ शिवसेना जिकरीने लढली. शिंदेसेनेने ८२ पैकी ५४ नगरसेवक फोडले होते. तरी शिंदेसेनेचे फक्त २९ नगरसेवकच निवडून येऊ शकले. तर २८ नगरसेवकच शिल्ल्क राहिलेले असताना विपरीत परिस्थितीत नवीन रक्ताचे आणि जुने स्वाभिमानी असे ६५ नगरसेवक मूळ शिवसेनेने निवडून आणले. शिंदेसेनेच्या काही शिलेदारांच्या मुला-मुलींचा पराभव मूळ शिवसेना उमेदवारांनी केला. तर काही ठिकाणी पराभवाची जाणीव असूनही मूळ शिवसेनेच्या शिलेदारांनी कडवी झुंज दिली. त्यांच्या मनात एकच इर्षा की यावेळी गद्दारांना पराभूत करायची या त्वेषाने काही मावळे लढले.
भाजपा व शिंदेसेना ठाकरे ब्रॅन्ड संपवायला निघाले होते. पण तसे झाले नाही. म्हणूनच मूळ शिवसेनेचा पराभवही तेजाने तळपतो आहे तर भाजपा-शिंदेसेनेचा विजयही डागाळलेला आहे. फोडा-फोडीच्या राजकारणात तत्कालीन फायदा मिळतो. पण तो दीर्घ काळ टिकणारा नसतो. दुसर्याचा पक्ष फोडून आपला पक्ष मोठा होत नाही, तर ती आकड्यांची सूज असते. मग ते आकडे टिकवण्यासाठी धडपड करावी लागते. मनात धास्ती आणि स्वतःच्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्यामुळे म्हणूनच एकनाथ शिंदेंना आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये डांबवून ठेवण्याची गरज भासली. साडेतीन वर्षापूर्वी शिंदेंनी स्व. बाळासाहेब ठाकरेंची एकसंध शिवसेना भाजपाच्या साहाय्याने फोडली. तेव्हा शिवसेनेचे ४० आमदार सुरतमार्गे गुवाहटीला पळवून हॉटेलात बंदिस्त ठेवले. पण आज त्याच शिंदेंना स्वतःचे २९ नगरसेवक मुंबईच्या ताज लँड्सएन्ड हॉटेलमध्ये डांबून ठेवावे लागले. याला काव्यगत न्याय असेच म्हणावे लागेल.

धन-सत्ताशक्ती विरुद्ध मराठी अस्मिता शक्ती अशी ही लढाई कठीण होती पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मुंबईच्या मराठी मतदारांवर भरवसा होता. या विश्वासाच्या जोरावर व मराठी माणसाच्या एकजुटीमुळे भाजपला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही. महायुतीला महापौर बनवण्यासाठी महत्प्रयास करावा लागत आहे. महानगरपालिका निवडणुकांनंतर शिवसेना संपणार असेही भाकीत काहींनी वर्तवले होते. ठाकरे ब्रॅन्ड संपला असेही काही वर्तवत होते. पण त्यांना माहीत नाही की अशा पराभवामुळे शिवसेना संपणारी नाही. ‘शिवसेना संपणारी नाही तर ती अभेद्य आहे’ असा लेख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते-पत्रकार प्रमोद नवलकर यांनी २००६ साली डंके की चोटपर सांगितले. रोज उठल्याबरोबर घोषणा करायची ‘शिवसेना संपली’ आणि झोपताना प्रार्थना करायची की, शिवसेना संपावी हे आजच नव्हे तर शिवसेनेच्या जन्मापासून सुरू आहे. शिवसेना संपली असे शंकरराव चव्हाण म्हणाले, शरद राव म्हणाले, कॉ. डांगे देखील बोलले. पण शिवसेना अभेद्य आहे. शिवसेना संपवणारे संपतील आणि रक्ताच्या थेंबाथेंबात शिवसेना असलेले शिवसैनिक मात्र कधीच संपणार नाही.
मुंबईबरोबरच परभणी मनपात ३४ जागांवर जिंकून सत्तेचा मार्ग मोकळा केला. तर चंद्रपूर मनपात मूळ शिवसेनेच्या सहा नगसेवकांशिवाय काँग्रेसचा महापौर विजयी होऊ शकत नाही. नाशिक, जळगाव, कल्याण, डोंबिवली येथे चांगली कामगिरी झाली. तर गेल्या खेपेस पनवेल मनपात एकही नगरसेवक नव्हता. तिथे मूळ शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. ‘शिवसेना हा कागदावरचा नव्हे तर जमिनीवरचा पक्ष आहे. जमिनीशी नातं जोडलेल्या शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही. हे महानगरपालिकांच्या निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे सत्ताधार्यांना घाम फुटलाय, तोडीस तोड उत्तर दिलंय’ असे ठणकावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले. शिवसेना आणि मराठी माणूस’ हे नाते अतूट आहे आणि मुंबई ही ठाकरेंचीच आहे!

