• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चित्तरंजन कोल्हटकर, माझे स्फूर्तिस्थान

श्रीराम रानडे (यांचा मी सांगती)

marmik by marmik
February 2, 2026
in यांचा मी सांगती, विशेष लेख
0
चित्तरंजन कोल्हटकर, माझे स्फूर्तिस्थान

माझं नाव राम रानडे. घराचा दरवाजा उघडला आलेल्या एका शाळकरी मुलीला मी सांगितलं.

कोण हवं आहे तुम्हाला? तिने प्रतिप्रश्न केला.

मला चित्तरंजन कोल्हटकर यांना भेटायचे आहे.

‘कोण आहेत गं?’ आतून दमदार आवाज आला.

दादा, तुम्हाला भेटायला कोणी तरी आलं आहे! त्या मुलीनं सांगितलं.

त्यांना बसायला सांग मी आलोच पुन्हा तोच दमदार आवाज.

मला बसायला सांगून ती शाळकरी मुलगी आत गेली. हॉलमधील आसनावर बसून मी पाठभिंतीवरील लावलेली कृष्णधवल तसबीरी मान वळवून बघू लागलो. दोन मोठ्या तसबीरींत एक होती नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांची, त्यांना मी अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर बघितले होते. शिवाय ते मिरजेच्या साहित्य संमेलनात (१९५९) साली प्रत्यक्ष उपस्थित असताना. आणि दुसरी तसबीर होती डोक्यावर पदर, प्रसन्न चेहरा, डोळ्यात विलक्षण बोलका भाव असणार्‍या एका सात्विक स्त्रीची. चित्तरंजन कोल्हटकर यांच्या मातोश्रींची ही तसबीर होती. त्या अगदी तरुण वयातच गेल्या ही माहिती मला ऐकून माहिती होती आणि चिंतामणराव मिरजेच्या साहित्य संमेलनानंतर काही काळातच गेले, ही बातमी वृत्तपत्रात वाचली होतीच.

या तसबीरी मी मान वळवून बघत असतानाच ‘बोला, काय काम काढलं आहे?’ असा दमदार प्रश्न कानी पडला. मी खुर्चीवरून उठलो आणि त्यांच्या पाया पडलो. मी राम रानडे. मी काल आपला नू.म.वि. शाळेच्या पटांगणातील ‘भावबंधन’ चा प्रयोग पाहिला. मी भारावून गेलो, मला तो अतिशय आवडला, हे सांगण्यासाठी मी मुद्दाम आपला पत्ता शोधून आलो आहे. काही महिन्यांपूर्वी आपण एका सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देणगीस्वरूपात काही रक्कम दिली होतीत. त्या वेळी वृत्तपत्रात ती बातमी आली होती. एका संध्याकाळी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपली ओळख करून घेण्यासाठी मी आलो होतो. पण घरात कोणी नव्हते म्हणून या खिडकीमधून मी एक छोटीशी चिठ्ठी आपल्यासाठी लिहून ठेवली होती. ‘आर्ताची गत आर्ता’ या गदिमांच्या काव्यपंक्ती मी त्यात लिहिल्या होत्या, इतकं मला नक्की आठवतं आहे. एका दमात मी सगळं सांगून मोकळा झालो.

‘बसा-बसा! सध्या काय करता?’

मी कॅन्टॉन्मेंट वॉटरवर्क्समध्ये वॉटर फिल्टर हाऊसमध्ये नोकरी करतो, पण मला नाटक-सिनेमाची आवड आहे. त्यात काम करावे अशी इच्छा आहे. आपल्याकडे त्याचसाठी आलो आहे. आपल्या कंपनीत मला घ्याल का?

ते काहीच बोलले नाहीत. भेदक नजरेनं ते मला न्याहाळत होते. मग पुन्हा खणखणीत आवाजात प्रश्न- नेमके माझ्याकडेच का आलात? इतर कुणाला भेटलात का?

नाही, आपण मिरज सांगलीत काही काळ रहात होतात. मी सांगली मिरजेचा, म्हणून मी प्रथम आपल्याकडे आलो आहे. मी आपले सगळे चित्रपट आणि नाटके पाहिली आहेत.

सांगली मिरजेचा विषय निघताच चित्तरंजन जुन्या आठवणीत रमून गेले. बालपणीच्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. जवळ जवळ अर्धा तास ते माझ्याशी बोलत होते. या अधून मधून भेटायला, असे बोलणे होऊन त्यांनी मला निरोप दिला. नाटकात काम देतो असे मात्र त्यांनी मला अजिबात सांगितले नाही. प्रत्यक्ष पहिलीच भेट आहे, पुढच्या भेटीत पुन्हा विनंती करू, असे माझ्या मनाचं मीच समाधान केलं आणि तिथून बाहेर पडलो.

चित्तरंजन कोल्हटकर यांना प्रत्यक्ष भेटीपूर्वी माझा त्यांच्या कला कारकीर्दीचा बर्‍यापैकी अभ्यास झाला होता. सांगली-मिरजमध्ये असताना मी त्यांचे ‘पेडगावचे शहाणे,’ ‘सौभाग्य,’ ‘दूधभात,’ ‘ मी दारू सोडली,’ ‘कुंकवाचा धनी,’ हे चित्रपट पाहिले होते. ‘देवमाणूस,’ ‘दुरितांचे तिमिर जावो,’ स्वामिनी ही नाटके पाहिली होती. पाच नोव्हेंबरच्या रंगभूमीदिनी सांगलीत त्यांनी ‘सारे कसे शांत शांत’ ही केलेली एकांकिका पाहिली होती. त्यात काम केलेले कलावंत आजही माझ्या स्मरणात आहे. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, भालचंद्र पेढारकर, मामा पेंडसे, शंकर घाणेकर, चित्तरंजन कोल्हटकर असे सगळे कलाकार त्यात होते. विशेष म्हणजे माझा विल्सन कॉलेजमधील नाटकवेडा मित्र मुकुंद फडणीस आणि प्रसिद्ध नाटककार आणि वृतपत्रीय लेखक विनायक देवरुखकर यांची मुलगी विनया देवरुखकर यांनीही त्यात भूमिका केल्या होत्या.

शिवाय नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचीही ‘मानाचं पान’, ‘मोठी माणसं’, ‘स्वराज्याचा शिलेदार’ इत्यादी चित्रपटांतील कामेही बघितली होती. ‘झुंझारराव’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले नाटक हंसप्रभा थिएटरमध्ये पिटातील तिकीट काढून बघितले होते. त्यातील काही कलावंत आजही माझ्या स्मरणात आहेत. बाबुराव पेंढारकर, स्नेहप्रभा प्रधान, मंगला चितळे, बाळ कोल्हटकर, वसंत ठेंगडी आणि एका प्रवेशात स्वत: चिंतामणराव कोल्हटकर असा नटसंच होता. चिंतामणरावांनी लिहिलेले ‘बहुरुपी’ हे पुस्तक सलग वाचून काढले होते. बाळ कोल्हटकरांनी गणपती उत्सवात मिरज हायस्कूलमध्ये येऊन सादर केलेले ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’मधील काही प्रवेश अनुभवले होते. मिरज सांगलीच्या हौशी कलाकारांच्या रंगभूमीवर मीही तोंडाला रंग लावून मिरवलो होते.

नाटकात, सिनेमात जाण्याची माझी भूक दिवसेंदिवस वाढत होती. पुढील शिक्षणासाठी म्हणू मी पुण्यात आलो होतो खरा, पण शिक्षणात माझे मन मुळीच रमत नव्हते, कलाक्षेत्राकडे माझा ओढा अधिकच होता. नाटक, चित्रपट, तमाशा, संगीतसभा, व्याखाने, परिसवंदा, यातच मानाला उभारी वाटत होती. त्यामुळेच राष्ट्र सेवा दल कलपथकात निळू फुले, लिलाधर हेगडे , राम नगरकर यांची संगत धरली होती. याच व्यवसायात काम करायचे असे ठरवून चित्तरंजन कोल्हटकर यांच्या घरी अचानक जाऊन टपकलो होतो.

शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे मी नाईलाजाने पुणे कॅन्टोनमेंट वॉटर वर्क्समध्ये फिल्टर असिस्टंट म्हणून काम करीत होतो. तीन शिफ्टमध्ये ते काम चालायचे. सकाळी ८ ते दुपारी ४, दुपारी ४ ते रात्री १२ आणि रात्री १२ ते सकाळी ८ अशी कामाची पद्धत होती. माझी रात्रपाळी असेल तर ती करून सकाळी घरी जाताना माझी दोन घरे ठरलेली होती. टिंबर मार्केटजवळील सोनावणे हॉस्पिटमध्ये शिवाजीराव पाटील आणि विद्याताई यांच्या घरी, अमिता, स्मिता आणि मनू या त्यांच्या मुली हे सारे कुटुंब राष्ट्र सेवादलाशी संबंधित. दुसरे घर म्हणजे रस्ता पेठेजवळ डॉ. वासू देशपांडे आणि आवा बेन देशपांडे यांचे घर. अलका आणि भाविक या त्यांच्या मुली. हेही समाजवादी आणि सेवादलावाले. यांच्या घरी नाष्टा-चहा करून मी घरी परतायचो. आता एका नवीन घराची भर पडली. न बोलावता मी सदाशिव पेठेतील नारद मंदिरासमोरच्या दामले यांच्या भरभक्कम दगडी बंगल्यातील तळमजल्यावरील चित्तरंजन कोल्हटकरांच्या घरी जाऊ लागलो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होऊ लागल्या. गडकरी, भालजी पेंढारकर, ललितकलादर्श, नाटकांचे प्रयोग, शूटिंगच्या वेळचे अनुभव यांचे रसभरतील वर्णन चित्तरंजन यांच्या तोंडून ऐकू लागलो. त्यांची मुले त्यांना ‘दादा’ म्हणायची. मीही त्यांना दादाच म्हणू लागलो. वास्तविक चित्तरंजन कोल्हटकर ‘बन्याबापू’ किंवा ‘बापू’ किंवा त्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या मित्रात ‘बन्या’ म्हणून ओळखले जायचे.

मी असा अचानक घरी आलेलो त्यांच्या मुलांना मात्र फारसे आवडलेले नसावे. आमचे दादा शूटिंग करून, नाटकाचे प्रयोग, बाहेरगावचे दौरे करून कितीतरी दिवसांनी घरी परत येतात. त्यांच्याशी आम्हाला खूप बोलायचे असते. पण हा कोण टिक्कोजीराव फारशी ओळख ना पाळख घरी अचानक येतो आणि आमचा वेळ खातो, असा भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटायचा. मला तो जाणवायचा, पण मी निगरगट्टपणे जायचो.

पण एके दिवशी चमत्कार घडला. असाच सकाळी मी त्यांच्या घरी धडकलो होते. आतल्या खोलीमधून कापर्‍या आजात कोणी वृद्ध महिला कोल्हटकरांच्या मावशींच्या बरोबर बोलत होत्या. मी वारंवार न बोलावता त्यांच्या घरी जातो म्हणून मावशी मला ओळखत होत्या. पण या कापर्‍या आवाजातील वृद्ध महिला कोण? म्हणून मी सहज प्रश्न केला… ‘या आजी कोण?’ माझ्या सासूबाई बेळगावहून कालच आल्या आहेत.

तेवढ्यात काही मंडळी महत्त्वाच्या कामासाठी चित्तरंजन यांना भेटण्यासाठी आली. चित्तरंजन मला म्हणाले, ‘तुम्ही थोडा वेळ आतल्या खोलीत बसा. मला या लोकांशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे.’

त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी आतल्या खोलीत गेलो. सहज काहीतरी बोलायचे म्हणून त्या कापर्‍या आजातील वृद्धेने मला विचारले, ‘तुमचे नाव काय?’ मी राम शंकर रानडे. मी मिरजेला महाबळ वाड्यात राहतो. पण आम्ही रानडे मूळ सांगलीचे. सांगलीला आमचे सिटी हायस्कूलसमोर घर होते. तेथील मोठे चिंचेचे झाड फक्त मला आठवते… मी सांगायला सुरुवात केली.

‘म्हणजे तू शंकरचा मुलगा? अरे शंकर माझा सख्खा मामेभाऊ. तुझे आजोबा वामनराव रानडे म्हणजे माझा वामन मामा!’
‘मिरजेला राहणारे नाथा देवल, वसंतराव देवल, सोन्या देवल यांच्या मातोश्री आणि आमचे वडील अण्णा यांचेही काही नाते आहे ना?
‘अरे, त्यांची आई माझी सख्खी बहीण… वेणू!’

ओळखीमागून ओळखी निघाल्या. बेळगावची माझ्या आईची मावशी गोदूमावशी गोखले, अप्पासाहेब गोखले, त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला आणि अकाली निधन पावलेला बापू गोखले, लेखक मधू गोखले, यमू केळकर. बेळगावजवळचे वडगाव, माधवपूर किती बोलू, किती नको अशा गप्पा… म्हणजे चित्तरंजन कोल्हटकरांची पत्नी विदुला कोल्हटकर म्हणजे माहेरची लीला सोवनी ही माझी बहीण! म्हणजे त्यांच्या मुलांचा मी…. मामा! राम मामा!.. केवढं जवळचं नातं. काही वेळापूर्वी आतील खोलीत जाताना मी केवळ राम रानडे होतो, बाहेर आलो तो लिलिताईचा भाऊ म्हणून आणि तारका, उज्ज्वला, आनंद आणि वर्षा यांचा मामा म्हणून. चित्तरंजन कोल्हटकरांचा लांबचा का होईना, बायकोचा भाऊ, ‘साला’ म्हणून! आता ‘दादां’बरोबर माझी जवळीक अधिकच वाढली.

‘चंद्र नभीचा ढळला’ हे पुरुषोत्तम दारव्हेकरांचे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून प्रसिद्ध झाले होते. हे स्पर्धेतील नाटक सुधा करमकर यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे ठरविले. मुंबईला त्याच्या तालमी सुरू झाल्या. चित्तरंजन यात काम करत होते. योगायोगाने माझा मुक्काम काही दिवस मुंबईत होता. मुंबईत मला काहीच काम नव्हते. नाटकाची आवड मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी दादांच्या वशिल्याने ‘चंद्र नभीचा ढळला’ या नाटकाच्या तालमींना हजर राहू लागलो. कोणीही जबाबदारी दिली नसताना ‘प्रॉम्प्टर’चे काम करू लागलो. नाटकात काम करणारे एक से एक जबरदस्त कलाकार होते. मामा पेंडसे, मास्टर दत्ताराम, शंकर घाणेकर, सुधा करमकर, नवोदित चंदा दिवेकर, सरोज कोठारे, चित्तरंजन कोल्हटकर आणि बरेच. त्यांची रोज चालणारी तालीम अगदी जवळून बघण्याची संधी मला मिळाली ते केवळ चित्तरंजन यांच्यामुळे!

आता कोल्हटकरांच्या घरचाच मी ‘राममामा’ बनलो होतो. आता त्यांच्या घरात पार स्वयंपाकगृहापर्यंत माझा वावर सुरू झाला. दादा शूटिंग किंवा प्रयोगासाठी कुठेही गेले असोत, माझी फेरी त्यांच्या घरी होणारच. घरचं वातावरणही अतिशय सोज्वळ! शांत! प्रसन्न! बाहेरच्या बैठकीच्या खोलीत कितीही मोठे लोक आलेले असोत- मुली, मुलगा बोलावल्याशिवाय बाहेर येणार नाहीत. संध्याकाळी देवापुढे दिवा लागणारच आणि रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हटलं जाणारच. त्यांचे कोणी ‘कोंडीराम महाराज’ म्हणून देवघरात पुजले जायचे. संध्याकाळी मी त्यांच्या घरी असलो की मीही त्यांच्या सायंप्रार्थनेत सहभागी होत असे.

जसजसा मी त्यांच्या अधिकाधिक सहवासात राहू लागलो तसतसा त्यांच्या जीवनाचा प्रवास, चढ-उतार, उन्हाळे-पावसाळे, श्रीमंती–गरिबी, प्रसिद्धी, उपेक्षा, अपमान सहज बोलण्यातून उलगडत गेले. जन्म १५ जानेवारी १९२३ अमरावती येथे. काही शिक्षण अमरावती येथे, नंतर बाल शिक्षण मंदिर, सांगली,.एक वर्ष सिटी हायस्कूलमध्ये, नंतर राष्ट्रीय शाळा खामगाव अशा विविध ठिकाणी झाले. शिक्षणाची फार आबाळ झाली. नाईलाजाने इंग्रजी दुसरीत असतानाच शाळा सोडावी लागली. ‘बळंवत संगीत मंडळी’ या १९१८ साली स्थापन झालेल्या प्रख्यात नाट्यसंस्थेचे दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे, चिंतामणराव कोल्हटकर हे तीन मालक. १९३४पर्यंत कंपनीची भरभराट होती. पण बळवंत संगीत नाटक मंडळी बंद करून ‘बळवंत पिक्चर्स’ची सांगली येथे स्थापना केली आणि ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा चित्रपट काढला आणि तो आपटला. चित्रपटसृष्टीच्या तंत्राची, यंत्राची आणि मंत्राची काहीही माहिती नसताना केलेले हे धाडस अंगाशी आले. कंपनीच्या मालकांना परागंदा व्हावे लागले. दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. एकेकाळी जेथे फुले वाचली त्या ठिकाणी गवर्‍या वेचण्याची वेळ मालकांवर आली. आपल्या मुलाने या बेभरोशाच्या नाटक धंद्यात येऊ नये अशी चिंतामणरावांची इच्छा होती. पण त्याच वेळी नियती काही वेगळेच भविष्य मांडत होती.

Previous Post

आमचे बी.जी. सर!

Next Post

काकांचा खून पचणार का?

Next Post
काकांचा खून पचणार का?

काकांचा खून पचणार का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.