गुंडोपंतांच्या खिडकीवर एक अनोळखी पक्षी येऊन बसला. फारच वेगळा पक्षी होता. लांब चोच होती, लांब पाय होते, डोक्यावर डौलदार तुरा होता. झुबकेदार शेपूट होतं. मोठमोठे पंख होते. तो सुरेल ताना घेत होता.
गुंडोपंतांनी आयुष्यात फक्त कबूतर पाहिलेलं होतं. त्यांच्या नजरेला हा पक्षी रूचला नाही, तो किती बेढब आणि असुंदर आहे, असं वाटलं त्यांना. त्यांच्या मनात अपार करुणा दाटून आली.
त्यांनी त्याला पकडून प्रेमाने कवेत घेतलं आणि त्याचा तुरा, शेपूट छाटून टाकली. चोच लहान केली. पाय कापून मापात आणले, पंख कातरून लहान केले. थोडा रंग आणून पंखांना लावला आणि जमिनीवर त्याला ठेवत म्हणाले, हं, आता कसा छान कबुतरांत आलास!
तुटक्या पायांवर उभ्या न राहू शकणाऱ्या, कातरलेल्या पंखांनी उडण्याची क्षमता गमावलेल्या, करुण चीत्कारणाऱ्या त्या पक्ष्याला गुंडोपंत शिकवू लागले. हं, बोल आता, गुटर्र घूं, गुटर्र घूं…