• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘गलगोटियां’च्या राज्यात देशाची इभ्रत धोक्यात!

विकास झाडे (अधोरेखित)

marmik by marmik
March 4, 2026
in अधोरेखित
0
‘गलगोटियां’च्या राज्यात देशाची इभ्रत धोक्यात!

२०११ मध्ये स्थापना झालेली गलगोटियाज युनिव्हर्सिटी खासगी आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा यमुना एक्सप्रेसवे जवळ, दांकौर भागात यांचा ५२ एकरचा कॅम्पस आहे. इथे श्रीमंतांचीच मुले प्रवेश घेऊ शकतात अशी ख्याती आहे.

 

दिल्लीतील प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम्’ येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट- २०२६मध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीने ‘दुसर्‍याच्या लग्नात नाचताय येडं’ असा प्रकार करून जगात भारताची पुरती इभ्रत घालवली. एक चिनी बनावटीचा, बाजारात सहज मिळणारा रोबॉट कुत्रा या विद्यापीठाने आपलंच संशोधन म्हणून खपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चीनने आक्षेप घेतला. देशात त्या विद्यापीठाचं हसं झालं आणि जगात भारताचं हसं झालं.

बुडत्याचा पाय खोलात अशी जी विद्यमान मोदी सरकारची स्थिती आहे, त्यातली ही आणखी एक गटांगळी होती. हे वर्ष प्रारंभापासूनच सरकारची अग्निपरीक्षा घेणारं ठरतंय. एकीकडे एपस्टीन फाइल्समधील हरदीप पुरींचे रंगीले कारनामे उघड झाले आणि या फाइल्समध्ये आणखी कोणत्या महानुभावांचे कारनामे उघड होतायत, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हरदीप पुरींचा राजीनामा का घेतला जात नाही, हा प्रश्न आहेच. दुसरीकडे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात त्यांनी चीनबरोबरच्या गलवान संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, एका कसोटीच्या क्षणी निर्णायक आदेश देण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी ‘जो उचित समजो वो करो,’ असा ५.६ मिमी छातीचा आदेश देऊन जबाबदारीपासून पळ काढला, या विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांनी संसद दणाणून गेली. पाठोपाठ मोदींना विश्वासात न घेता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-भारत व्यापार करार परस्पर जाहीर केला. तो धुडकावण्याची हिंमत काही मोदींनी दाखवली नाही. त्याचबरोबर काँग्रेसच्या महिला सदस्य अंगावर येतील या आश्चर्यकारक धास्तीमुळे मोदींनी लोकसभेत येऊच नये, असा धन्य सल्ला लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. अशा कितीतरी प्रकरणांमुळे या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना हा हात दाखवून अवलक्षणाचा प्रकार झाला. आता हे सरकार आणि त्यांचे समर्थक यांना उपरोधिकपणे गलगोटिया म्हणून हिणवले जात आहे.

गलगोटिया हे आडनाव असले तरी हा शब्द शहरी मराठी लोकांना नवा असेल कदाचित; ग्रामीण महाराष्ट्राला हे आडनाव ग्राम्य अर्थाने परिचित आहे. शेतकरी आणि ज्यांच्याकडे गुरेढोरे आहे ते हा किंवा तत्सम भासणारा शब्द वेगळ्याच कारणांनी सहजतेने वापरतात. गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या चिनी रोबॉटचा कारनामा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचला. समाजमाध्यमांमुळे तो खेड्यापाड्यातही चर्चेला आला. मागच्या आठवड्यात मी खेड्यावर गेलो होतो. तेव्हा एका शेतात अघोरीपणे सांडाचे वृषण ठेचून काढले जात होते. मी त्यांना म्हटले काय करताय? तर उत्तर मिळाले ‘गलगोट्या’ जिरवतो आहे. सांडाचा कामसू बैल बनवायचा असतो तेव्हा ग्रामीण भागात अजूनही ही जुनी पारंपरिक पद्धती वापरली जाते. त्यानंतर बैल प्रजनन करण्यास सक्षम नसतो. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये ज्या गलगोटिया युनिव्हर्सिटीला स्वत:च्या साध्या रोबॉट कुत्र्याची निर्मिती करता आली नाही त्यांचेही दुःख काहीसे त्या बैलासारखे असावे. ही थाप चालून गेली तर सतत या युनिव्हर्सिटीला डोक्यावर घेणारे मोदी खूष होतील, असे स्वप्न गलगोटियांनी पाहिले असावे. पण, आताचा जमाना तंत्रज्ञानाचा आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. या कुत्र्याला पैदा आम्हीच केले असे सांगणार्‍या गलगोटिया युनिव्हर्सिटीला भारत मंडपम् येथे गेलेल्या स्मार्ट पोट्ट्यांनी उघडे पाडले. हा कुत्रा इंडिया समिटमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. देशी-विदेशी लोकांसमोर जाऊन नाचत होता. हातात हात मिळवत होता. गलगोटिया युनिव्हर्सिटीने एआय मध्ये किती प्रगती केली अशी चर्चा होत असतांना स्मार्ट पोरांच्या हातातील मोबाईल सुरू झाले. काही वेळातच या कुत्र्याचा बाप चीन आहे आणि गलगोटिये हे प्रजनन करू न शकणारे बैल आहात असे उघड होताच समिटमध्ये स्मशान शांतता पसरली. मोदींसह देशाची जेवढी इज्जत घालवायची होती ती या गलगोटिया युनिव्हर्सिटीने घालवली.

२०११ मध्ये स्थापना झालेली गलगोटियाज युनिव्हर्सिटी खासगी आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा यमुना एक्सप्रेसवे जवळ, दांकौर भागात यांचा ५२ एकरचा कॅम्पस आहे. इथे श्रीमंतांचीच मुले प्रवेश घेऊ शकतात अशी ख्याती आहे. मुख्य अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स – एआय, लिबरल आर्ट्स, मास कम्युनिकेशन, कॉमर्स, सायन्स, लॉ, फार्मसी, नर्सिंग इत्यादींचा समावेश आहे. देश-विदेशातील ४० हजार विद्यार्थी इथे शिकतात. ‘एआय’ अभ्यासक्रमासाठी जवळपास १२ लाख रुपये मोजावे लागतात.
अशा या थोर विद्यापीठाच्या स्टॉलवर त्यांनी हा ‘ओरायन’ नावाचा एक रोबॉट-डॉग प्रदर्शित केला. युनिव्हर्सिटीच्या कम्युनिकेशन्स विभागातील प्रोफेसर नेहा सिंह यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘हा रोबॉट-डॉग आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विकसित करण्यात आला आहे. तो विविध आकार घेऊ शकतो आणि तो खूप खट्याळही आहे.’ हे रोबॉट खरंतर चिनी कंपनी युिनट्री रोबॉटिक्सचे ‘गो२’मॉडेल होते, जे व्यावसायिकरित्या उपलब्ध आहे आणि त्याची किंमत सुमारे २ लाख रुपये (अंदाजे १,६०० ते २,२०० अमेरिकी डॉलर) आहे. हे रोबॉट संशोधन आणि शिक्षणासाठी जगभरात वापरले जातात. ते बायोनिक क्वाड्रुपेड डिझाइनवर आधारित आहेत, ज्यात गतिशीलता, संवेदना आणि परस्परक्रिया यांचा समावेश आहे.

भारत मंडपम् इथे उघडे पडण्याआधी केंद्र सरकारची या युनिव्हर्सिटीवर विशेष मेहरनजर होती. २०२१ ते २०२४ या कालावधीत संशोधनासाठी १ कोटी ७० लाखांचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला. अभियांत्रिकी विभागाला १ कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला. शिवाय केंद्राच्या विविध उपक्रमांचा लाभ या युनिव्हर्सिटीला होत असतो. साहजिकच तिकडच्या सगळ्याच गलगोटियांना मोदी फार प्रिय आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून राजकारणात ढकलले जाते. मोदीही या विद्यार्थ्यांचा फायदा कसा करून घेण्याची संधी साधतात. २०२४मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा या युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी मे महिन्यात दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. सरकार मोदींचे आणि निदर्शने काँग्रेसच्या विरोधात! त्या काळात काँग्रेसच्या घोषणापत्रामुळे मोदी हादरले होते. मीच सत्तेत येणार असे वरवर बोलून दाखवत असले तरी सरकार येईलच, याची त्यांना खात्री नव्हती. मोदींनी २१ एप्रिल २०२४मध्ये राजस्थानच्या बांसवाडा येथील सभेत आणि नंतर अलिगढसह इतर ठिकाणी काँग्रेसच्या घोषणापत्राचा हवाला देत काँग्रेस सत्तेत आली तर लोकांची संपत्ती सर्वेक्षण करून वाटली जाईल, काँग्रेस ‘तुमच्या मातांच्या-बहिणींचे सोने मोजेल आणि ते वाटप करेल’ आणि ‘तुमचे मंगळसूत्रही वाचणार नाही’ अशी उथळ आणि निराधार वक्तव्ये करत होते. हाच धागा पकडत गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या हाती काँग्रेसच्या निषेधाचे फलक देण्यात आले होते. त्यातील अनेकांना या निषेधाचेही नेमके कारण माहिती नव्हते. पत्रकारांनी विचारले असता ते स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. एका विद्यार्थ्याने ‘अर्बन नक्सलीझम’ला ‘अर्बन मॅक्सवेल’ असे उच्चारले. फलकावर स्पेलिंगच्या चुकाही होत्या आणि ते वाचण्यातही अडचण आली. विद्यार्थ्यांना हजेरीच्या बहाण्याने आणि जबरदस्तीने आणले गेले होते. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की या निदर्शनामुळे आम्हाला अधिकचे गुण मिळणार आहेत. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये असे विद्यार्थी घडविले जात असतील तिथे खरोखरचा रोबॉट प्रसूत केला जाऊ शकतो का? या युनिव्हर्सिटीच्या फॅक्ट्रीमध्ये तयार झालेले विद्यार्थी मठ्ठच होतील. त्याचा पुरावा या युनिव्हर्सिटीने एआय समिटमध्ये चीनचा रोबॉट कुत्रा नाचवून दिला. नाचक्की झाल्यानंतर आयोजकांनी युनिव्हर्सिटीला पळवून लावले. परंतु म्हणतात ना ‘बुंद से गई वो हौदसे नही आती.’

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयद्वारे आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट- २०२६ ही परिषद ग्लोबल साऊथमधील पहिली मोठी एआय शिखर परिषद म्हणून घोषित करण्यात आली होती. इंडिया एआय मिशनअंतर्गत हे समिट चालवले जाते, ज्यात स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया भाषिणी विभाग, नीती आयोगाची वुमन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म, माय भारत यांच्यासारख्या भागीदारांचा समावेश होता. समिटपूर्व कार्यक्रमांसाठी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, अशोका युनिव्हर्सिटी, गोवा सरकार आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसारख्या संस्थांचा सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स एआय अ‍ॅक्शन समिटमध्ये त्याची घोषणा केली होती. एआयच्या जबाबदार वापरावर, भारताच्या नेतृत्वावर आणि जागतिक सहकार्यावर हे समिट केंद्रित होते. या समिटमध्ये १५ देशांचे राष्ट्रप्रमुख, तंत्रज्ञानात प्रभावशाली शेकडो व्यक्ती सहभागी झाल्या.

गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन, एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग, मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडेंट ब्रॅड स्मिथ, अँथ्रोपिकचे सीईओ दारियो अमोदेई, इन्फोसिसचे चेअरमन नंदन निलेकणी, बायोकॉनचे चेअरमन किरण मजुमदार-शॉ आदी दिग्गजांची हजेरी होती.

भारताने स्वतःला एआय क्षेत्रातील प्रमुख म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपकडून २१० अब्ज डॉलरची मोठ्या एआय गुंतवणुकीच्या घोषणा झाली. मोदींचे ‘एआय भय नव्हे तर भविष्य आहे’ असे सांगण्यात आले. या समिटमध्ये बिल गेट्स यांना प्रमुख भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु जेप्रâी एपस्टीन फाइल्समध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आणि त्याबाबतचा वाद पुन्हा उफाळून आल्यामुळे गेट्स फाउंडेशनने शेवटच्या क्षणी त्यांचा कार्यक्रम रद्द केला. ते भारतातच असल्याने पुन्हा चर्चेचा विषय ठरला. समिटमध्ये गर्दी, वाईट व्यवस्थापन, लांब रांगा, चोरीच्या तक्रारी आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. ही परिषद एआय क्षेत्रातील भारताच्या महत्त्वाकांक्षी दाव्यांसाठी महत्त्वाची होती, पण वरील विवादांमुळे ती जास्त चर्चेत आणि टीकेत आली. यामुळे भारताच्या एआय इव्हेंट आयोजन आणि स्वदेशी इनोव्हेशनच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले. या प्रकरणाने मोदी यांच्या समिटमधील भाषणावरही परिणाम झाला.

भारतातील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विवाद प्रकरणे ही एक वाढती चिंतेची बाब आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याने आणि डिजिटल युगात वेगाने प्रगती करत असल्याने एआयशी संबंधित विवाद राजकीय, सामाजिक, नैतिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चर्चेत राहिले आहेत. भारतात २०२४च्या लोकसभा निवडणुकीत एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओ आणि ऑडिओचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या नृत्य करणारा व्हिडिओ. अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, आमिर खान यांच्या फेक एंडोर्समेंट, मृत नेत्यांच्या एआय व्हॉइस क्लोनिंग, माहितीची फसवणूक, मतदारांवर प्रभाव, राजकीय द्वेष वाढणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ!

एका चांगल्या समिटला मोदीभक्त गलगोटियाने काळे फासलेच, परंतु विरोधकांनीही तिथे राजकारण आणले. आधीच शरमेने मान खाली गेलेल्या या समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी प्रदर्शनी हॉलमध्ये निदर्शने केली. या कार्यकर्त्यांकडे वैध पास आणि क्यूआर कोड होते. ज्यामुळे ते आत आले. त्यांनी सुरुवातीला स्वेटर घातले होते, पण आत आल्यावर ते काढले आणि अर्धनग्न होऊन निदर्शन केले. त्यांनी टी-शर्ट्स हवेत उडवले आणि मोदींविरोधात घोषणा दिल्या. टी-शर्ट्सवर ‘पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड’, ‘इंडिया-यूएस ट्रेड डील’, ‘एपस्टीन फाइल्स’ असे स्लोगन्स आणि मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो छापलेले होते. हे कार्यकर्ते हॉलमध्ये फिरत घोषणा देत होते. त्यामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला. युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार अमेरिकेसोबतचा करार युवक, शेतकरी आणि कामगारांच्या हितांविरोधात आहे. त्यांनी बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली.

काँग्रेसचा आरोप!
एकीकडे एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन केले जाते दुसरीकडे याच विषयवार मोदींचे झिरो टॉलरन्स आहे. यावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसच्या मीडिया सेलच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे की सरकारने काँग्रेसच्या एआय-जनरेटेड व्हीडिओ काढून टाकले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकून कारवाई केली आहे. हा आरोप मुख्यतः राजकीय उपहासात्मक व्हीडिओजशी संबंधित आहे. काँग्रेसने गेल्या सहा आठवड्यांत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून नऊ व्हीडिओ तयार केले होते. त्यात पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या काही निर्णयांवर टीका करण्यात आली होती. प्रत्येक व्हीडिओमध्ये स्पष्टपणे ‘एआय जनरेटेड व्हीडिओ’ असा डिस्क्लेमर दाखवण्यात आला होता. हे व्हीडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आले होते. मात्र हे व्हीडिओ केंद्र सरकारच्या दबावाने काढून टाकण्यात आले. हे व्हीडिओ सत्य दाखवत असल्यामुळे मोदी घाबरले असल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे.

एआय इम्पॅक्ट समिटनंतर देशात आता गलगोटिया शब्द नकारात्मक अर्थाने चर्चेत आला आहे. दुसर्‍याचे ते माझे म्हणणे किंवा याचा निर्माता मीच आहे असे भासवणे हे गलगोटियाचे लक्षण मानले जाणार आहे. मोदींनी काँग्रेसच्या काळातील काही योजनांचे नामांतर करताना गुलामीच्या चिन्हापासून दूर जाण्यासाठी ते केले असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात रेसकोर्स रोडचे लोककल्याण मार्ग, औरंगजेब रोडचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्ग, तीन मूर्ती चौकाचे तीन मूर्ती हैफा चौक, राजपथाला कर्तव्य पथ, केंद्रीय सचिवालयास कर्तव्य भवन, राजभवनला लोकभवन, पंतप्रधान कार्यालयाला सेवा तीर्थ, निर्मल भारत अभियानला स्वच्छ भारत मिशन, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुज्जीवन अभियानचे अमृत (कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल अभियान), राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, इंदिरा आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना, मूलभूत बचत बँक ठेव खाते योजनेचे प्रधानमंत्री जन धन योजना, राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमचे बेटी बचाओ बेटी पढाओ, मुगलसराय रेल्वेस्टेशनचे दीनदयाल उपाध्याय जंक्शन, अलाहाबादचे प्रयागराज, पैâजाबादचे अयोध्या केले. काही ठिकाणी विमानतळाची नावे बदलली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे नामांतरण विकसित भारत जी राम जी केले गेले. मोदींनी गेल्या १२ वर्षांत असली आकसपूर्ण नामांतरं करण्यापलीकडे काय केले यावर उत्तर भोपळा असे येईल. नेहरूंच्या काळातील आयआयटी, एम्स, जेएनयू, आयआयएम, एनसीईआरटी कुठे आणि मोदींनी डोक्यावर घेतलेल्या गलगोटियासारख्या संस्था कुठे, याची इतिहास निश्चितच दखल घेईल.

Previous Post

तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज

Next Post

भाजपचा ‘चंद्रपूर पॅटर्न’ भिवंडीत कसा उलटला?

Next Post
भाजपचा ‘चंद्रपूर पॅटर्न’ भिवंडीत कसा उलटला?

भाजपचा ‘चंद्रपूर पॅटर्न’ भिवंडीत कसा उलटला?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.