गेले वर्षभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता. त्यानंतर आता सर्व काही सुरळीत होतंय असं वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील लाटेपेक्षा या लाटेने अधिक रौद्ररुप धारण केले आहे. अनेक सेलिब्रिटीही यावेळी करोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. करोनाचा प्रभाव सगळीकडेच जाणवत आहे. याचा प्रभाव आता सिनेसृष्टीवरही होऊ लागला आहे. येत्या २३ एप्रिलला ‘झिम्मा’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे प्रदर्शन पुढे गेले आहे. या सिनेमातील कलाकारांनी एकत्र येऊन एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘झिम्मा चा प्रवास सुरु झाला, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला… हा प्रवास थिएटरपर्यंत रंगत जाणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा आपण सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकलो… आता वेळ आली आहे एकमेकांची काळजी घेण्याची… कोरोनाशी दोन हात करण्याची… सगळं काही सुरळीत झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने, आनंदाचा खेळ म्हणजेच झिम्मा खेळूया! सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया… लवकरच भेटूया ‘चित्रपटगृहातच!’