वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱया धिंगाण्याच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लावला असताना मास्कशिवाय फिरणाऱयांविरोधातही पालिकेने कारवाई तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांत नाईटक्लबमधील गर्दीवर केलेल्या कारवाईत मास्क नसलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एप्रिलपासून सुरू केलेल्या या कारवाईत आतापर्यंत 8 लाख 20 हजार जणांवर कारवाई करण्यात आली असून 16 कोटी 76 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना रोखण्यात मास्क महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र तरीदेखील अनेक जण बेजबाबदारपणे विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे पालिकेने स्वतःचे कर्मचारी-अधिकारी आणि क्लिनअप मार्शलच्या माध्यमातून जोरदार कारवाई सुरू केली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तर दररोज 20 ते 24 हजार जणांवर कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून जोरदार कारवाई सुरू आहे.
अशी होतेय कारवाई
कोविडमुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना महापालिकेने मास्क सक्तीचे केले असताना आजही शेकडो जण सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता फिरत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांकडून 200 रुपयांचा दंड वसूल करून रीतसर पावती देण्यात येत आहे. शिवाय त्यांना मास्कही मोफत दिला जात आहे.
अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम के पश्चिम प्रभागात सर्वाधिक कारवाई झाली आहे. येथे 54 हजाराहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली असून 11 लाख 35 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. यानंतर कुर्ला एल प्रभागातून 47 हजार 472 जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून 9 लाख 69 हजाराचा दंड वसुल करण्यात आला आहे.
तर के पूर्व अंधेरी जोगेश्वरी पूर्व येथे 47 हजार 472 जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून 9 लाख 63 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, 23 डिसेंबर रोजी 13 हजार 459 जणांवर कारवाई करण्यात आली असून 26 लाख 91 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सौजन्य- सामना