नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हुडहुडी भरवणाऱया थंडीने मुंबईतून अचानक दडी मारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे मुंबईकर दिवस-रात्र घामाघूम होऊ लागले आहेत. शहराच्या कमाल तापमानाचा पारा पस्तिशीपार गेला आहे. याच वेळी किमान तापमानाने दहा वर्षांतील जानेवारीतील विक्रम मोडीत काढला आहे. पुढील तीन-चार दिवस उष्णतेची ही लाट कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबईकरांनी नवीन वर्षातील पहिल्या आठवडय़ात गारव्याचा आनंद घेतला. मात्र पूर्वेकडून आलेल्या वाऱयांनी शहरातील थंडी पळवून लावली आणि मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही सुरू झाली. या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच मुंबईत मागील दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वोच्च किमान तापमानाची नोंद झाली. मंगळवारी सांताक्रूझच्या कमाल तापमानाने 35.3 अंशांची विक्रमी पातळी गाठली. गेल्या वर्षीच्या जानेवारीत 34.5 अंश इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. हवामान खात्याच्या नोंदीनुसार बुधवारी सांताक्रूझमध्ये 34.6 आणि कुलाब्यात 31 अंश इतके कमाल तापमान होते. तसेच कुलाब्यात सलग दुसऱया दिवशी किमान तापमान 23 अंशांच्या सर्वोच्च पातळीवर होते.
किमान तापमानाने गाठली 10 वर्षांतील सर्वोच्च पातळी
मुंबई हे समुद्र किनारपट्टीजवळील शहर असल्याने थंडीच्या मोसमात वातावरण बदलून अचानक तापमानात वाढ होते. पुढील दहा दिवस किमान आणि कमाल तापमान 20 आणि 32 अंशांच्या आसपास राहील, असे कुलाबा येथील हवामानशास्त्र्ा विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.