हिवाळा सुरू झालाच आहे. त्यातच कोरोनाचे संकट अजूनही कमी झालेले नाही. अशा स्थितीत स्वत:ला स्वस्थ ठेवणे हे मोठे आव्हान आहे. थंडीच्या दिवसांत वायुप्रदुषणामुळे फुफ्फुसे आणि हृदयाला जास्त धोका संभवतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे हृदयविकार किंवा दम्याचा विकार असलेल्यांना हे दिवस महाकठीण म्हटले पाहिजेत. मात्र या लोकांनीही स्वत:ची नीट काळजी घेतली तर यातूनही ते सहीसलामत बाहेर पडू शकतात. हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खूपच खराब असते. या स्थितीत श्वासाशी संबंधित विकार बळावण्याची शक्यता जास्तच… यामुळे या थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याची खास काळजी घ्यायला हवी. अशा लोकांनी नेमके काय करावे ते पाहूया…
नियमित योगा
दररोज सकाळी लवकर उठून अनुलोम विलोम, चक्रासन, सर्वांगासन वगैरे योगासने जरूर करा. नियमितपणे योगाभ्यास केल्यामुळे श्वासाशी संबंधीत असलेल्या सर्व समस्यांमधून आराम मिळू शकतो. योगाभ्यास आणि नियमित योगा यामुळे फुफ्फुसेही आरोग्यदायी राहातात.
आरोग्यदायी काढा
थंडीचे दिवस आले की आयुर्वेदिक आरोग्यदायी काढे प्यायची सवय लावून घ्या. दररोज नियमित हे काढे जरूर प्या. यामुळे शरीरातील विषाक्त कण बाहेर फेकले जातात. काढ्यांमुळे गळ्याच्या समस्याही दूर होऊ शकतात.
रोज वाफ घ्या
दररोज वाफ घ्यायला विसरू नका. वायूप्रदुषणातून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा हा एक सोपा आणि रामबाण इलाज आहे. वाफ घेताना कोमट पाण्यात निलगिरीचे तेल टाकून त्याची वाफ घेतली तर शरीराला त्याचा जास्त फायदा होईल हेही लक्षात असू द्या.