कुणाचे नशीब कधी आणि कसे पालटेल काही सांगण्याची सोय नाही. समुद्रात अनेक वर्षे मासेमारी करणार्या एका मच्छिमाराचे नशीब अचानकच पालटले. आपण जे मासेमारीचे हे काम करतोय त्या कामामुळेच आपण कधीतरी करोडपती होऊ असे त्या मच्छिमाराच्या कधी मनातही आले नसेल. पण त्याचे नशीब असेच अचानक पालटले. समुद्रात मासेमारी करताना एका व्हेल माशाने त्याच्यावर उलटी केली… पण यामुळे हा मच्छिमार चक्क कोट्यवधींचा मालक झाला. कमालच ना!
मंडळी, झालंय तरी तसंच… नुकतीच घडलेली ही घटना थायलंडमधली आहे. तेथे हा करोडपती मच्छिमार राहातो. रातोरात तो करोडपती बनला. त्याचं झालं असं की, नारीस नावाचा हा मच्छिमार आपले जाळे घेऊन नेहमीसारखा समुद्रात जाऊन मासे पकडायला लागला होता. त्याच दरम्यान त्याची नजर समुद्रात थोड्या वर आलेल्या एका छोट्या बेटासारख्या भागावर गेली. त्याला वाटले पाण्यावर तरंगणारे हे छोटे बेट असेल. पण त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला धक्काच बसला. त्याने लगेच जाणले की ही तर कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तो साधारण १०० किलो वजनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा एम्बरग्रीसचा तुकडा होता.
काही संशोधक हा तुकडा म्हणजे व्हेल माशाने केलेली उलटी असावी असे मानतात, तर काही संशोधकांच्या मते हा तुकडा व्हेल माशाने केलेले शौच असावे. जे त्याची आतडी पचवू शकत नाहीत ते बाहेर फेकले जाते. त्यातलाच हा प्रकार असावा असे काहीजणांचे मत आहे. मात्र शास्त्रोक्त नजरेने पाहायचे तर हा पदार्थ व्हेल मासा काहीवेळा रेक्टमद्वारे बाहेर टाकतो, तर काहीवेळा तो त्याच्या उलटीद्वारे बाहेर पडतो. काळपट रंगासारखा दिसणारा हा एम्बरग्रीस म्हणजे व्हेल माशाच्या आतड्यांतून निघणारा एक कठीण पदार्थ आहे. तो मेणासारखा असून ज्वलनशीलही आहे. या मच्छिमाराने या पदार्थाबाबत एका व्यापार्याशी संपर्क साधला तेव्हा तो म्हणाला, हा पदार्थ मौल्यवान निघाला तर मी त्याची २३ हजार ७४० पाऊंड प्रति किलोच्या हिशोबाने रक्कम देईन… म्हणजे हा मच्छिमार करोडपतीच झाला की…