माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवताना यशराज फिल्म्स बॅनरशी तीन चित्रपटांचा करार केला आहे हे सर्वांना माहीत आहेच. त्यातल्याच दुसर्या चित्रपटातचे चित्रीकरण मानुषीने आता सुरू केले आहे. यात तिची जोडी अभिनेता विकी कौशल याच्यासोबत दिसणार आहे. हा एक सामाजिक कॉमेडी चित्रपट असून त्यातून एक राजकीय संदेशही दिला जाणार असल्याचे बोलले जातेय.
मानुषी छिल्लर आणि विकी कौशल यांच्या या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्णा ‘विक्टर’ आचार्य करणार आहेत. त्यांनी यापूर्वी ‘धूम-३’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांना दिग्दर्शन दिलंय. यातला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सपशेल आपटला होता. मानुषी छिल्लरच्या नव्या चित्रपटाबाबतची माहिती तिच्या त्याच सिनेमात काम करणार्या अभिनेता यशपाल शर्मा याने सोशल माध्यमांवर दिली. याबाबत तो कॅप्शनमध्ये म्हणतो, मानुषीच्या या सिनेमाचे कथानक खूपच छान आहे. त्यात व्हिक्टर त्याचे दिग्दर्शन करणार म्हणजे बेस्टच… यात मी निगेटीव्ह रोल करतोय. आम्ही या सिनेमाचे शूटिंग यशराज स्टुडिओमध्ये सुरू केलंय.’
विकी कौशलबाबत म्हणायचे तर यशराज फिल्म्ससोबत त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. मानुषीने यशराज फिल्म्स बॅनरच्या आपल्या पहिल्या ‘पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. यात अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत आहे.