राज्य सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे आता कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे आता ‘मुंबईच्या विकासा’ची लढाई सुरू झाली असून ही लढाईही आपण जिंकूच असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या कसोटीच्या काळात राज्याचे नेतृत्व करीत असताना ‘मावळ्यां’नी दिलेल्या योगदानामुळेच कोरोनाविरोधातील लढाई आपण जिंकत आलो आहोत असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. मुंबईच्या विकासात ‘मावळ्यां’ची भूमिका महत्त्वाची ठरेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईला वेगवान बनवणाऱ्या कोस्टल रोडच्या कामातील दोन महाबोगद्यांचे काम ‘मावळा’ नावाच्या अजस्र टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 2012-13च्या निवडणुकीत आपण कोस्टल रोडचे प्रेझेंटेशन दिले होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत तेव्हा अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र आता हा मार्ग प्रत्यक्षात निर्माण होत आहे. 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आजचा क्षण महत्त्वाचा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात 1995 मध्ये युतीचे सरकार असताना मुंबईची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी तब्बल 55 उड्डाणपूल बांधले. हे उड्डाणपूलही आता कमी पडू लागलेत. त्यामुळे कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईच्या विकासात मावळ्यांची कामगिरी महत्त्वाची
कोणतेही काम पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्या मावळ्यांची गरज असते. तसे या कामात ‘मावळा’ यंत्राचे काम असेल. त्याबरोबर रणांगणात मावळे लढत असतात. तसेच पालिकेच्या या कामात आयुक्तांपासून वरीष्ठ अधिकारी, तज्ञ, काम करणारी कंपनी, अभियंते, कर्मचारी हे सगळेच असे मावळे आहेत. पालिका वेळेआधीच हे काम पूर्ण करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पालिकेने कोरोनाकाळातही कोस्टल रोडचे काम अविरत सुरू ठेवल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
मुंबईकरांसाठी सर्वेत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणार!
कोस्टल रोडमुळे उपनगरातील नागरिकांना वाहतूक कोंडीत न अडकता थेट मुंबईत येता येणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईकरांना जास्तीत जास्त दर्जेदार सेवा-सुविधा देण्यासाठी जगातून शक्य तितके सर्वेत्तम अत्याधुनिक जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.