उदय मोहिते (‘मिड डे’चे मुख्य रेखाटनकार आणि आता मुक्त व्यंगचित्रकार)
स्व. बाळासाहेबांची व्यंगचित्रं पाहिली की मला तलवारीची आठवण येते. तलवार घाव घालते, इजा करते, रक्त काढते. ब्रश किती मऊ असतो, तो काही इजा करत नाही, रक्त काढत नाही, पण बाळासाहेबांसारख्या कलावंताच्या हातून त्यात शाई भरली गेली की कोथळाच निघतो रक्त न काढता. त्यांची व्यंगचित्रं ही अशी धारदार असायची. त्यांच्या व्यंगचित्रांनी सजलेला ‘मार्मिक’ यायचा ती एक वेगळीच मजा होती. दर आठवड्याला उत्सुकता असायची की आता कुणाचं वस्त्रहरण होणार! बाळासाहेब अगदी कमी रेषांमध्ये जबरदस्त फटकारे मारायचे, ते आम्हा व्यंगचित्रकारांसाठी फार आदर्श काम होतं. हे किती अवघड काम आहे ते व्यंगचित्रकारच जाणतात. साहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत.
ते म्हणायचे, दोन ओळींच्या मधलं वाचायला जो शिकतो तो खरा व्यंगचित्रकार. तेही शिकतो आहोत आणि कुठे अडलं की त्यांच्या ‘फटकारे’च्याच मदतीने त्यातून सोडवणूक करून घेतो आहोत.