कोरोना रोखण्यासाठी मास्क महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले. मात्र अजूनही अनेकजण बिनधास्तपणे मास्कशिवाय फिरत आहेत. त्यामुळे पालिकेने विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मास्क नसेल तर दोनशे रुपये दंड घेऊन रीतसर पावती तर दिली जाईलच आणि याचवेळी मास्कही लावला जाईल. बेजबाबदार नागरिकांना जरब बसवण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान आतापर्यंत विनामास्क 4 लाख 85 हजार जणांवर कारवाई करून 10 कोटी 7 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
विनामास्कवर कारवाई आणखी वाढवणार
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी 14 ऑक्टोबर 2020 रोजी बैठक घेऊन विना मास्क फिरणाऱया व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱया नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱया अधिकाऱयांना समाविष्ट करण्यात आले आहे. विना मास्क नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शलही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्वाची ठरत असल्यामुळे विनामास्क फिरणाऱयांविरोधात कारवाई कडक करून कारवाईची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
सौजन्य : दैनिक सामना