जवळपास ८० वर्षांपासून आबालवृद्धांमध्ये ‘टॉम अॅण्ड जेरी’ ही कार्टुन मालिका जगभरात लोकप्रिय आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे दोघेही करतात, पण त्यात जेरी (उंदीर) टॉमला (मांजर) दरवेळी मात देतो. ते पाहून प्रेक्षक हसून हसून बेजार होतात. कार्टुन चॅनेलवर ‘टॉम अॅण्ड जेरी’ सुरू झाले की लहान मुलांना आजही मोठी धमाल येते. टॉम आणि जेरी यांच्या याच व्यक्तिरेखा आता लवकरच रिलीज होणार्या ‘टॉम अॅण्ड जेरी’ नावाच्या चित्रपटात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. यात लाईव्ह अॅक्शन आणि अॅनिमेशन यांचे अनोखे मिश्रण पाहायला मोठी गंमत येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरवर भरपूर लाईक्स येण्याची अपेक्षा होती. पण झाले भलतेच… या ट्रेलरवर अनलाइक्सचा पाऊसच पडतोय.
या नव्या चित्रपटात विल्यम हॅना आणि जोसेफ बरेरा यांनी तयार केलेल्या टॉम आणि जेरी या प्रसिद्ध कार्टुन पात्रांना २०२१च्या काळात आणले गेले असून न्यूयॉर्कच्या एका मोठ्या हॉटेलात ते दाखवण्यात आले आहेत.
नुकत्याच दाखल झालेल्या ट्रेलरमध्ये या अनोख्या चित्रपटाच्या कथानकाची झलक पाहायला मिळते.
टॉम (मांजर) हे न्यूयॉर्कमधल्या एका अशा हॉटेलमध्ये उतरते जेथे एका भव्यदिव्य लग्नाची तयारी सुरू असते. पण हॉटेलमध्ये जेरीने (उंदीर) मांडलेल्या उच्छादामुळे मालक त्रासलेला असतो. तो टॉमला जेरीला खतम करण्याची सुपारी देतो आणि सिनेमात धमाल सुरू होते. ट्रेलर पाहूनच लक्षात येते की जेरीने टॉमला भंडावून सोडले आहे. त्यावेळी होणारी दोघांचीही धावपळ मोठ्या पडद्यावर पाहायला लहान मुलांना नक्कीच मजा येईल.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य हे की त्यात फक्त टॉम आणि जेरी या व्यक्तिरेखाच कार्टुनमध्ये आहेत. बाकी सर्व माणसे खरीखुरी (लाइव्ह अॅक्शन) आहेत. या हॉलीवूडपटाचे हे आगळे वैशिष्ट्य असूनही का कुणास ठाऊस सोशल मिडायावर प्रेक्षक त्याला डिसलाइक्सच्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. अर्थात काही थोड्या लोकांना ही अॅनिमेशन पात्रे मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकताही लागली आहे.
या चित्रपटात क्लो ग्रेस मोरेट, मायकल पेना, रॉब डेलाने, कॉलिन जोस्ट आणि केन जियोंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा हॉलीवूडपट ५ मार्च, २०२१ रोजी रिलीज होणार आहे. मुळात हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच सिनेमागृहे बंद असल्यामुळे वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओने आपल्या या सिनेमाची रिलीज डेट पुढच्या वर्षी ढकलली. आताही मार्चपर्यंत सर्व सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने खुली झालेली असतील असा त्यांचा होरा आहे.