बेरंग घरात नेहमी एका कोपर्यात फुरंगटून बसलेला असतो.
त्याला सतत फुरंगटून बसायची इतकी सवय जडली आहे की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी अनेक कोपरे असलेलं अष्टकोनी घर केलंय आणि घरातही फर्निचरऐवजी कोपरेच बनवले आहेत. जरा आकर्षक वाटावं म्हणून प्रत्येक कोपरा वेगवेगळ्या रंगाचा बनवलेला आहे. बेरंगाचा जसा मूड होईल तशा कोपर्यात तो जाऊन बसतो. नुसतंच उदास वाटत असेल तर राखाडी रंगाच्या कोपर्यात, निराशा दाटून आली असेल तर काळ्या कोपर्यात आणि संतापाने उकळत असला तर लाल रंगाच्या कोपर्यात जाऊन बसायचं हा त्याचा नेहमीचा परिपाठ.
त्या कोपर्यात बसून तो दिवसभर ‘हे चालणार नाही, ते योग्य नाही, याचा तपास दिल्लीत लागावा, त्याचा तपास दिल्लीतून व्हावा,’ असं पुटपुटत असतो. मध्येच लहर आली की तो मैदानात जातो… ही सगळी भानगड मैदानातूनच सुरू झालेली आहे… सगळ्या मुलांच्या खेळण्याचं हे मैदान आहे… तिथे एक नियम आहे… जो मोठी टीम बनवून येईल, त्याला मैदानात खेळायला मिळेल… बाकीच्यांनी कडेला काही व्यायाम करा, धावा, पळा, हा हा हू हू हास्ययोग करा किंवा क्यँ क्यँ केकाटयोग करा. मुख्य मैदानात खेळायला काही मिळणार नाही…
मैदानाचा रखवालदार तात्या खरं तर बेरंगाचा लांबचा नातेवाईक आहे… त्याने बेरंगाला सांगितलं होतं, तू सगळ्यात मोठी टीम बनवून आण. मी तुला खेळायला देतो. तसं त्याला खेळायलाही मिळालं होतं. पण नंतर टीम फुटली. हा सगळीकडे मीच मोठा, मीच शहाणा, माझ्यामुळेच टीम आहे, आता मैदान माझ्या वडिलांचंच झालं, अशा थाटात वागायला लागला तर कशी टीम राहणार त्याच्याबरोबर. टीम फुटली तेव्हा याने दुसरी टीम बनवून मैदानात जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी तात्यालाही फितवला आणि भल्या पहाटे तात्याने याला मैदानात घेतला. नंतर तात्याला असा काही झाडला मैदानाच्या मॅनेजमेंटने की काही विचारू नका.
आताही हा दिसला की तात्या तंबाखूचा बार तोंडात भरून सावध होतो आणि सांगतो, हे बघ, या वयात मी भल्या पहाटे उठून तुला प्रवेश दिला होता मैदानात. तू म्हणालास, टीम येतेय मागोमाग, मी विश्वास ठेवला. टीम आलीच नाही. मला शिव्या पडल्या. अजून इथली पोरंटोरं जाता येता मला कोंबडतात्या म्हणून हिणवतात… कोंबडा पण पहाटे आरवतो ना, म्हणून! आपल्याला लाज वाटण्याची सवय नाही म्हणून ठीक आहे. दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली गेली असती त्याची.
बेरंग पाय आपटत म्हणतो, असं कसं, सगळ्यात मोठी टीम माझ्याकडेच आहे की. इथे जे लोक गोळा होतात ते माझा खेळ पाहायला.
तात्या म्हणतात, ते बरोबर आहे. पण तुझी टीम एकच आहे. इतरांनी तीनचार टीम्स एकत्र करून मोठी टीम बनवली आहे. तशी तू बनव. यांच्यातले काही प्लेयर फोड. तुझ्याकडे घे. पण ते तुझ्याकडे आलेत याची खात्री करून घे. नाहीतर भलतंच काहीतरी फुटायचं.
बेरंग म्हणतो, अहो तुम्ही खेळ बघा ना त्यांचा. अजिबात अनुभव नाहीये त्यांना. कसेही खेळतात. आऊट झाले तरी आऊट देत नाहीत. सगळ्या मैदानाचा सत्यानाश करून टाकलाय त्यांनी. पिच उखडून ठेवलंय. खरं तर त्यांना तुम्ही हुसकावून काढलं पाहिजे मैदानातून.
तात्या म्हणतात, अरे, तसं केलं तरी मैदान मोकळंच राहणार. तुला नाही चान्स मिळणार. रोज इथे येतोस. रोज हेच सांगतोस आणि रोज घरी जाऊन कुठल्यातरी कोपर्यात फुरंगटून बसतोस. अशाने तब्येत खराब होईल तुझी. इकडे मैदानाच्या बाहेरून सारखा सारखा आऊट आऊट ओरडून ओरडून घसा खराब होईल तुझा. पुढे गाणार कसा तू?
बेरंग म्हणतो, पण मला गायचं नाहीच आहे पुढे?
तात्या म्हणतात, असं होय! मला वाटलं आता तूही गायनात करियर करतोस की काय!
बेरंग पुन्हा पाय आपटून म्हणतो, तात्या मला चिडवू नका. माझा गेम तुम्हाला माहिती आहे. मी घणाघाती चौकार आणि षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अतिशय अभ्यासू खेळाडू आहे.
तात्या म्हणतात, त्याचं मला कौतुक आहे रे. पण सांघिक खेळामध्ये एकाचा अभ्यास चालत नाही. टीम लागते. शिवाय सारखं सारखं आऊट ओरडूनही चालत नाहीत. कधीकधी दुसर्याच्या बॅटिंगलाही टाळ्या वाजवाव्यात, बोलिंगचं कौतुक करावं, फील्डिंगला दाद द्यावी. खेळाच्या मैदानात खिलाडूपणा शिकला पाहिजे. नुसतं खेळाचं कौशल्य असून काय उपयोग! असे अनेक गुणवान खेळाडू प्रॅक्टिस नेटच्या बाहेर पडू शकत नाहीत. तुझं तसं होऊ देऊ नकोस.
मग बेरंग पुन्हा फुरंगटतो आणि पाय आपटत घराकडे निघतो़…
तो तुम्हाला दिसला तर तो कुठल्यातरी कोपर्यात शिरून फुरंगटून बसण्याआधी त्याला वाटेतच गाठा आणि त्याला छान रंगांमध्ये रंगवून टाका… ‘रंगी रंगला बेरंग’ अशी त्याची अवस्था करा… त्याला हसू फुटेल, त्याच्यात उमदेपणा येईल, अशी तेवढीच एकमात्र शक्यता राहिली आहे… कराल ना एवढं!