शिवसेनेचे उपनेते, ठाण्याचे माजी महापौर व माजी आमदार अनंत तरे आज अनंतात विलीन झाले. कोळीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणेकरांसह असंख्य शिवसैनिकांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी मुंबईसह रायगड तसेच पालघर जिह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
अनंत तरे यांचे सोमवारी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण ठाणे शहरावर शोककळा पसरली. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा तरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. आज गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के यांनीही अंत्यदर्शन घेतले.
आज दुपारी आनंद पार्प येथील निवासस्थानापासून अनंत तरे यांची अंत्ययात्रा निघाली. फुलांनी सजवलेल्या ट्रकवर त्यांचे पार्थिव ठेवले होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे अनेक पदाधिकारी व नगरसेवक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. कोळी समाजाचे अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱयांनीही आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला. कोळीवाडा येथील स्मशानभूमीत अनंत तरे यांचे पुत्र जयेश यांनी त्यांना मंत्राग्नी दिला.
सौजन्य : दैनिक सामना