राज्यात थंडीची तीव्रता चांगलीच वाढली आहे. बहुतांश भागांत किमान तापमान अचानक 10 अंशांच्या खाली गेल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. सोमवारी मुंबई, ठाण्याच्याही तापमानात मोठी घट झाली. सांताक्रूझमध्ये चालू हंगामातील सर्वात कमी म्हणजेच 18 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तसेच परभणीत 5.6 अंश, तर पुण्यात 9.2 अंश तापमान नोंदवले गेले.
राज्यात विदर्भासह बहुतांश भागांत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात अचानक मोठी घसरण होत आहे. सोमवारी मुंबई, ठाण्याचेही तापमान सरासरीच्या खाली गेल्याने पहाटेच्या सुमारास नागरिक चांगलेच कुडकुडले. सांताक्रूझमध्ये 18 अंश, कुलाब्यात 21.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबई शहर व उपनगरात मागील काही दिवस पारा 20 अंशांच्या वर राहिला होता. जवळच्या ठाणे जिह्याच्या तापमानात 20 अंशांपर्यंत घट झाली. हवामान खात्याकडील नोंदीनुसार, सोमवारी डहाणूमध्ये 19.2 आणि माथेरानमध्ये 15.4 अंश तापमान होते. राज्याच्या ग्रामीण भागात बऱयाच ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली गेला. विदर्भात 9.5, जळगाव-10, नाशिक-9.1, बारामती-9.2 अंश किमान तापमानाची नोंद झाली.
पुढील दोन दिवस आणखी गारठा
राज्यात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होईल. रात्रीसह दिवसाच्या तापमानात मोठी घट होईल. मात्र त्यानंतर किमान तापमान पुन्हा सरासरीच्या पातळीवर येईल, असे हवामान खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
सौजन्य- सामना