कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे देशात लॉकडाऊन करावे लागले होते. त्यात सर्व व्यवसाय आणि धंदे बंद पडलेच, पण लोकांनाही घरातच बसून राहावे लागले. या कठीण दिवसांत अनेकांच्या हातचे कामही गेले. कलाकारांनी या आठेक महिन्यांत घरातच राहून आपल्या फिटनेसवर भर दिला. निवांत मिळालेल्या वेळेचा त्यांनी सदुपयोग केला. आता हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झालेली असली तरी बहुतांश कलाकार सावधगिरी म्हणून अजूनही क्वारंटाईनच आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हीदेखील नुकतीच दापोलीत आपल्या आजोळी गेली आहे. येथेही तिने आपले वर्कआऊट सोडलेले नाही. व्यायाम करतानाही तिचा भर प्रामुख्याने योगाभ्यासावर जास्त आहे. योगा हा नैसर्गिक व्यायाम असल्याने त्याचा फायदा होतोच, असा फिटनेस मंत्र देत तिने आपल्या वर्कआऊटचे काही फोटो नुकतेच चाहत्यांशी शेयर केले आहेत. दापोलीत तिचे घर असून तेथे तिचा फार्मही आहे. या फार्म हाऊसवर ती शांतपणे योगाभ्यास करतेय असे या फोटोंवरून दिसते. योगासनांमुळे केवळ शरीरालाच व्यायाम मिळतो असे नाही, तर त्यामुळे मनही शांत होते. याचा फायदा नृत्ये करताना होतो असे ती सांगते.