मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱया ‘तेजस एक्स्प्रेस’ला आता आयआरसीटीसीने पर्यटन पॅकेजेस जोडण्यात आली आहेत. गुजरातला जाणाऱया प्रवाशांना आता केवडिया, अहमदाबाद, अंबाजी, राणी की वाव, साबरमती, साबरमती आश्रम अशा विविध ठिकाणी भेट देता येणार आहे. पर्यटनास प्रोत्साहन देणारे हे पॅकेजेस 3 ते 4 दिवसांचे आहेत.
आयआरसीटीसीमार्फत चालविण्यात येणारी पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ आता 14 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तेजस एक्स्प्रेस ट्रेन क्र. 82902/01 आठवडय़ातून चार वेळा शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार अशी धावते. तिला मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, नाडीयाड आणि अहमदाबाद असे थांबे देण्यात आले आहेत. यातील केवडिया टूर तीन रात्री व चार दिवसांची असून त्यात लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदा म्युझियम, पिक्चर्स गॅलरी, स्टॅच्यू ऑफ युनिटी-पावागड आणि चंपानेर पाहता येणार आहे. हेरिटेज टूर अहमदाबाद ही तीन रात्री व चार दिवस अशी असून यात अहमदाबाद तसेच अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, कंकरिया तलाव, माधेरा सूर्य मंदिर-राणी व वाव पाहता येईल. अहमदाबादसह केवडिया ही टूर तीन रात्री व चार दिवसांची असून त्यात लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदा म्युझियम, पिक्चर्स गॅलरी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, कंकरिया तलाव दाखविण्यात येतील. तर अहमदाबादसह अंबाजी दर्शन ही सहल तीन रात्री व चार दिवसांची असून त्यात अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, कंकरिया तलाव आणि अंबाजी दर्शन असे पॅकेज असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना