सुरेश लोटलीकर (लोकसभा, लोकप्रभासह अनेक नामवंत प्रकाशनांसाठी व्यंगचित्रे दिलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार)
मी जेव्हा व्यंगचित्र काढायला सुरुवात केली तेव्हा व्यंगचित्रांच्या दुनियेचे सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते. ‘मार्मिक’ घराघरात पोहोचलं होतं. आर. के. लक्ष्मण हे टाइम्स म्हणजे इंग्रजी भाषकात प्रसिद्ध होते. नंतर अतिशय लोकप्रिय झालेले आणि प्रसिद्ध पावलेले मारिओ मिरांडा स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होते. शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे हे बाळासाहेबांचे समवयस्क असले तरी त्या दोघांचे विषय, आशय आणि चित्रशैली वेगळ्या होत्या. त्यांची साम्राज्ये अजून निर्माण झाली नव्हती. त्यामुळे त्या काळच्या आमच्यासारख्या नवख्या, नवशिक्या आणि उमद्या व्यंगचित्रकारांचा आदर्श नि:संशयपणे बाळासाहेब होते आणि त्यांच्याच व्यंगचित्र कलेचा प्रभाव आणि दबाव आमच्यावर होता. व्यंगचित्राची कल्पना आणि त्या कल्पनेचं चित्रीकरण कसं असावं याचा ठाम विचार करण्याची पद्धत बाळासाहेबांचीच. कॅरिकेचरिंगचे फंडे, म्हणजे प्राथमिक धडे बाळासाहेबांकडूनच मिळाले. राजबिंड्या नेहरूंना मवाळ, स्वप्नाळू दाखवणं, कृष्ण मेननच्या कुरळ्या केसांतून त्यांच्या विचारांचा गुंता दाखवणं, त्या वेळच्या समस्त मध्यमवर्गाच्या आदरणीय एसेम जोशींना एकदम किरकोळ आणि बेदखल दाखवणं अशी ही कॅरिकेचरिंगची कला होती. पुढे डेव्हिड लो यांच्या चित्रांचा अभ्यास करताना तेव्हा हा डेव्हिड लोचा ठसा स्पष्टपणे जाणवला.