देशातील कोरोनाच्या वाढत्या फैलावावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी संताप व्यक्त केला. 80 टक्के लोक मास्क वापरतच नाहीत, जे वापरतात त्यांचा मास्क तोंडावर लटकलेला दिसतो. कोरोना दिवसागणिक वाढत आहे; परंतु केंद्र व राज्य सरकारांना त्याचे काहीही पडलेले नाही. ते फक्त नियम बनवण्यातच गुंग असल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला.
देशभरात कोरोनावर करण्यात येत असलेल्या उपायांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राजकोट येथे कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत पाच रुग्णांचा कोळसा झाल्याच्या वृत्ताचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाने उपाययोजनांवरून तीव्र संताप व्यक्त केला. कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडाही वाढतच आहे.
परिस्थिती गंभीर असूनही लोक कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. मास्कचा वापर होताना दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग कुठेही दिसत नाही. यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यांना नियमांची कडक अंमलबजावणी करावी लागेल, असे स्पष्ट केले. देशातील दहा राज्यांमध्येच कोरोनाचे 70 टक्के रुग्ण आहेत असेही ते म्हणाले.
सौजन्य : दैनिक सामना