राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षे सत्तेचे स्वप्न बघत राहावे, असा टोला शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना लगावला.
पुणे जिह्यातील किवळे येथे शनिवारी एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी आम्ही फासे पलटवणार, शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू या फडणवीस यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता, देसाई यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचे स्पष्ट केले.
फडणवीस यांना चार वर्षे स्वप्न बघत रहावे लागेल. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे असे अंदाज व्यक्त करण्याखेरीज आता तरी त्यांच्या हातात काही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला