कोरोनामुळे महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणारे अध्यापक बेरोजगार झाले आहेत. सुमारे 20 हजार अध्यापकांवर नोकरीअभावी उपासमारीची वेळ आली असून या अध्यापकांना कायमस्वरूपी रुजू करून सरकारने मानधन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंटस् युनियन (मासु) या संघटनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये नेट सेट उत्तीर्ण उमेदवार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. कोरोना काळात या तासिका तत्त्वावर काम करणाऱया अध्यापकांना रोजगार गमवावा लागला आहे. राज्यातील सुमारे 20 हजार अध्यापक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना 11 महिने कंत्राटीपद्धतीने नेमावे आणि त्यांना किमान 25 ते 30 हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच तासिका तत्त्वावरील अध्यापकांना पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू आणि कश्मीर या राज्यांच्या धर्तीवर कंत्राटी पद्धतीने नेमून त्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
सौजन्य- सामना