अभिनेत्री असूनही वैरी नव्हे, तर पक्क्या मैत्रिणी असलेल्या सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे या दोघी ‘मितवा’ आणि ‘ती अॅण्ड ती’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र दिसल्या होत्या. त्या आता पुन्हा एकदा एका नव्या प्रोजेक्टमधून एकत्र येणार आहेत असे कळते. ‘फ्रेश लाईम सोडा’ असे त्यांच्या नव्या मराठी सिनेमाचे नाव आहे. प्रार्थना बेहरेनेच सोशल मिडीयावरील आपल्या पेजवर अकाऊंटवरुन या आगामी प्रोजेक्टचं फर्स्ट पोस्टर शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिलीये.
विशेष म्हणजे प्रार्थनाचे पती अभिषेक जावकरच या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन करत आहेत. त्यांचीच निर्मिती संस्था रेड बल्ब स्टुडिओज या मराठी सिनेमाची निर्मिती करतेय. हा सिनेमा सिनेमागृहातच प्रदर्शित होईल असेही प्रार्थनाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. ‘प्रवास स्वप्नांचा’ अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा प्रवासात घडणाऱ्या गोष्टीवर बेतलेला असू शकतो.