देशाच्या उत्तर भागात असलेल्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाल्याने उत्तर हिंदुस्थानातील अनेक प्रदेशांमध्ये तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे दक्षिणेतील तीन राज्यांना चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर हिंदुस्थानात तुफान बर्फवृष्टी
हवामाना विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड आणि हिमाचलच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी होताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या आसपास थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली आहे. पश्चिम दिशेच्या वाऱ्यांमुळे पर्वतीय क्षेत्रात पाऊस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दुसरीकडे जम्मू-कश्मीरच्या श्रीनगर भागात पारा शून्याहून खाली गेला आहे. येथील पीर पंजाल पर्वतरांगांत बर्फवृष्टी झाल्याने येथील रस्ते बंद करण्यात आले आहेत. यात मुगल रोड, श्रीनगर लेह मार्ग यांचा समावेश आहे.
कोणत्या भागात काय परिणाम
उत्तर हिंदुस्थानात कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यातील अनेक प्रदेशांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे दिल्ली, हरयाणा, पंजाब या राज्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. दिल्लीत 6.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. हे गेल्या 17 वर्षांमधील नोव्हेंबरमधले सर्वाधिक कमी तापमान आहे. पंजाब आणि हरयाणातही तापमानात घट झाली आहे. हरयाणाच्या हिसार भागात सगळ्यात कमी म्हणजे (5.9 अंश सेल्सियस) इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन असलेल्या माऊंट अबू येथेही पारा शून्यावर पोहोचला आहे.
दक्षिण हिंदुस्थानात चक्रीवादळाचा इशारा
दक्षिण हिंदुस्थानाच्या तीन राज्यांमध्ये निवार नावाच्या एका चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात निवारचा धोका असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. तसंच या तिन्ही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सौजन्य : दैनिक सामना